सातारा जिल्हा रुग्णालयात औषधांचा तुटवडा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 जून 2017

रुग्णांना अपुरी औषधे घेऊन परतावे लागते घरी; चुकीच्या धोरणाचा परिपाक

रुग्णांना अपुरी औषधे घेऊन परतावे लागते घरी; चुकीच्या धोरणाचा परिपाक

सातारा - शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे जिल्हा रुग्णालयात सर्वच विभागांच्या औषधांचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे रुग्णांना अपुरी औषधे घेऊनच घरी परतावे लागत आहे.गेल्या काही दिवसांपासून जिल्हा रुग्णालयाला विविध समस्यांनी घेरले आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता, उपलब्ध वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कामाच्या नियोजनातील गोंधळ, कामाच्या वेळेत त्यांच्या दांड्या यामुळे रुग्णांना ताटकळत थांबावे लागते. तसेच काही वेळा हेलपाटेही मारावे लागत आहेत. सफाई कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे जिल्हा रुग्णालय अस्वच्छतेचे आगार बनत चालले आहे. रुग्णालयातील दुर्गंधीमध्ये वाढ होत आहे. या सर्व समस्यांचा रुग्ण व त्यांचे नातेवाईक सामना करत असतानाच औषधांच्याबाबत शासनाच्या चुकीच्या धोरणांचा फटकाही सहन करावा लागत आहे.

गेल्या काही महिन्यांपासून जिल्हा रुग्णालयात औषधांची कतरता जाणवत आहे. वारंवार मागणी करूनही शासनाकडून औषध पुरवठा होत नाही. त्यामुळे लहान मुलांसह विविध आजारांच्या औषधांचा तुटवडा जाणवत आहे. त्वचा रोगाचीही औषधे अत्यंत कमी प्रमाणात उपलब्ध आहेत. शेतात काम करताना बुरशीसारखे आजार शेतकऱ्यांना वारंवार होत असतात.

त्यासाठी आवश्‍यक असलेल्या क्रिमही उपलब्ध नाहीत. त्यामुळे रुग्णांना हेलपाटे मारावे लागत आहेत. अगदी अपघात विभागामध्ये अपघातग्रस्त रुग्णाला तातडीने आवश्‍यक असलेल्या औषधांचीही पुरेशी उपलब्धता जिल्हा रुग्णालयामध्ये नाही. विविध प्रकारच्या ॲन्टीबायोटिक्‍सच्या औषधांचाही तुटवडा आहे. 

जिल्हा रुग्णालयामध्ये चिठ्ठीमुक्त दवाखाना असे फलक दिमाखात झळकत आहेत. त्याचबरोबर बाहेरून औषधे सांगितल्यास टोल फ्री क्रमांकावर तक्रार करा, असे सांगणारेही फलक आहेत. एकीकडे औषधांचा तुटवडा आणि फलक चिठ्ठीमुक्त दवाखान्याचे अशी परिस्थिती आहे. त्यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांनाही अनेकदा बाहेरून औषधे लिहून देता येत नाहीत. आयुष विभागातही विविध प्रकारच्या औषधांची कमतरता आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात दरराजे एक हजारपेक्षा जास्त रुग्ण उपचारासाठी येत असतात. सुमारे ४०० रुग्ण रुग्णालयात उपचारासाठी दाखल असतात. त्यामुळे शासनाकडून कमी प्रमाणात मिळणारी औषधे पुरेशी होत नाहीत. अशा परिस्थितीत स्थानिक पातळीवर औषधांची खरेदी करून यापूर्वी गरज भागविली जात होती. मात्र, सध्या शासनाने स्थानिक पातळीवरील औषधांच्या खरेदीवरही अंकुश बसवला आहे. त्यामुळे रुग्णांना औषधे कशी उपलब्ध करून द्यायची, असा प्रश्‍न रुग्णालय प्रशासनासमोर उभा राहिला आहे. रुग्णालयाच्या या परिस्थितीबाबत वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अनेकदा जिल्हा शल्यचिकित्सकांकडे तक्रारी केल्या आहेत. त्यानुसार त्यांनीही वरिष्ठ कार्यालयाशी पत्रव्यवहार केला आहे. मात्र, अद्याप त्यावर तोडगा निघालेला नाही.

जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपाची गरज
संपूर्ण जिल्ह्यातील सर्वसामान्य रुग्णांसाठी जिल्हा रुग्णालयात संजीवनीचे काम करत आहे. मात्र, औषधांच्या कमतरतेमुळे रुग्णांचे हाल होऊ लागले आहेत. पावसाळ्यामध्ये आजारांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत असते. अशा परिस्थितीत औषधांची कमतरता सर्वसामान्य रुग्णांच्या जिवावर बेतू शकते. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रश्‍नात लक्ष घालून तातडीने तोडगा काढण्याची गरज आहे.

Web Title: satara news medicine shortage in satara district