सरदारही नाही अन्‌ सैनिकही!

प्रवीण जाधव
गुरुवार, 29 मार्च 2018

तालुक्यांत पक्षाची नव्याने बांधणी करावी लागणार
या वेळच्या निवडणुका या ‘मनसे’साठी अटीतटीच्या आहेत. पक्षाचे आगामी काळातील अस्तित्व त्यावर अवलंबून असेल. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर राज ठाकरे यांनी भाजपमुक्त महाराष्ट्रासाठी कामाला लागण्याचा निर्णय घेतला आहे. सैनिकच नसल्याने जिल्ह्यात या भूमिकेची मांडणी करणार कोण, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यामुळे सर्वसामान्य कार्यकर्त्यांना सर्व प्रकारची ताकद देत पक्षाची नव्याने बांधणी पक्षनेतृत्वाला करावी लागणार आहे.

सातारा - भाजपमुक्त महाराष्ट्र करण्यासाठी कामाला लागण्याचे आदेश गुढीपाडव्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिले. मात्र, संदीप मोझर व त्यांच्या समर्थकांच्या राजीनाम्यानंतर जिल्ह्यात सरदारही नाही आणि सैनिकही नाही, अशी जिल्ह्यातील ‘मनसे’ची अवस्था झाली आहे. त्यामुळे अध्यक्षांच्या भूमिकेनुसार ‘मनसे’युक्त सातारा करण्याचे आव्हान पक्षासमोर आहे. 

राज ठाकरे यांनी ‘मनसे’ची स्थापना केल्यानंतर शिवसेनेत असलेले काही कार्यकर्ते ‘मनसे’त दाखल झाले. शिवसेनेच्या युवा शाखेचे जिल्हाध्यक्ष रणजितसिंह भोसले यांच्यावर पक्षाची जबाबदारी देण्यात आली. सुरवातीला काही काळ त्यांनी संघटना वाढीसाठी चांगले प्रयत्न केले. प्रत्येक तालुक्‍यात पक्ष पोचला. पक्षाचे कोणतेही आंदोलन असो प्रत्येक तालुक्‍यात पडसाद उमटायचेच. मात्र, स्वत:ला मानणाऱ्या सैनिकांनाच बळ देण्याच्या प्रवृत्तीमुळे त्यांच्या विरोधातही जिल्ह्यात नाराजी निर्माण झाली. त्यातच आंदोलनांमध्ये झालेल्या कारवाईत पक्षाकडून बळ न मिळाल्यामुळे त्यांनीही पक्षाला रामराम केला. त्यानंतर खटावच्या धैर्यशील पाटील यांच्या माध्यमातून ‘मनसे’चे नाव जिल्ह्यात कुठे तरी घेतले जायचे. 

राज ठाकरेंना मनापासून मानणाऱ्या, त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या व कोणत्याही अपेक्षेशिवाय काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना बाजूला ठेवण्याचा प्रयत्न ‘मनसे’च्या जिल्हा व राज्य पदाधिकाऱ्यांकडून झाला. आंदोलनात गुन्हे अंगावर घेतलेल्यांना काय सहन करावे लागते, याची कधीही पक्षनेतृत्वाने दखल घेतली नाही. तालुक्‍यातील चांगल्या कार्यकर्त्यांना ताकद देऊन पक्षसंघटना गावागावांपर्यंत पोचविण्यासाठी ‘मनसे’च्या स्थापनेपासून कधीच प्रयत्न झाल्याचे दिसले नाहीत. त्या उलट नेहमी चुकीच्या गोष्टींमध्ये नाव येणाऱ्या कार्यकर्त्यांनाच ताकद दिली गेली. त्यामुळे ‘मनसे’ची जिल्ह्यातील प्रतिमा डागाळली गेली. सर्वसामान्य कार्यकर्ता ‘मनसे’पासून दूर जाऊ लागला. पक्षांतर्गत राजकारण व कार्यकर्त्याला न्याय देण्यात राज्य पदाधिकाऱ्यांना आलेले अपयश यामुळे बहुतांश कार्यकर्त्यांनी शिवसेनेची वाट धरली किंवा स्थानिक नेत्यांच्या गोटात सामील होणे स्वीकारले. त्यामुळे ‘मनसे’ला जिल्ह्यात अपेक्षित यश मिळवता आले नाही.

त्यानंतर संदीप मोझर यांनी ‘मनसे’चा रस्ता धरला. त्यामुळे जिल्ह्यात ‘मनसे’ची ताकद निर्माण होईल, अशी आशा निर्माण झाली होती. ‘मनसे’च्या माध्यमातून शेतकरी, सर्वसामान्य महिलांच्या प्रश्‍नावरून झालेल्या आंदोलनातून पक्ष सर्वसामान्यांमध्ये रुजण्यास सुरवातही झाली होती. कार्यकर्त्यांना ताकदही मिळायला लागली होती. युवकांचे संघटन उभे राहात होते. मात्र, माशी शिंकलीच.

राजीनामा देण्यापूर्वीच मोझर यांनी राज ठाकरे यांची जिल्ह्यात सभा घेतली. त्यामुळे चांगले वातावरण निर्माण झाले होते. जिल्ह्यात ‘मनसे’चे काही उमेदवार उभे राहतील, अशी अपेक्षा पहिल्यांदा निर्माण झाली होती. परंतु, त्यांनी व त्यांच्यापाठोपाठ १०७ पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले. त्यामुळे जिल्ह्यात ‘मनसे’ला वालीच उरला नाही.

Web Title: satara news mns party politics