मोरघर तलावाला "बेशरम'चा विळखा 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 सप्टेंबर 2017

""पाझर तलाव परिसरातील शेतकऱ्यांच्या फायद्याचा असल्याने त्याचे खऱ्या अर्थाने संरक्षण होणे गरजेचे आहे. त्यासाठी आम्ही युवक व गावातील सर्व मंडळांचे कार्यकर्ते संघटित होऊन तलावातील बेशरम वनस्पती काढण्याचा प्रयत्न करणार आहे.''  
-प्रशांत मोरे, मोरघर

सायगाव - सायगावसह आनेवाडी, मोरघर विभागातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेल्या मोरघर पाझर तलाव पूर्ण क्षमतेने भरला आहे. मात्र, हा तलाव बेशरम वनस्पतींच्या विळख्यात सापडला आहे. 

येथील परिसर हा डोंगराळ आहे. त्यामुळे येथे उताराची, मुरमाड शेती आहे. मात्र, असे असूनही या परिसरातील शेतकरी या तलावाच्या जिवावर बगायती शेती करून बऱ्यापैकी उत्पन्न काढून आपला उदरनिर्वाह करतात. कडक उन्हाळ्यातही या पाझर तलावाने या परिसरातील लोकांची, जनावरांची तहान भागवली आहे. तर परिसरातील विहिरींची पाणीपातळी कधी खालवली नाही. आजही हा तलावामध्ये मोठ्या प्रमाणात पाणीसाठा होत असल्यामुळे शेतकऱ्यांना वरदान ठरला आहे. मात्र, आज तलावातील परिस्थिती बेशरम वनस्पतीमुळे फारच गंभीर बनली आहे. तलावाच्या चारही बाजूला मोठ्या प्रमाणात बेशरम वनस्पती पसरली आहे. याकडे कुणाचेही लक्ष नसल्याने या वनस्पतीमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. अनेकदा या विभागात झालेल्या आढावा बैठकीत या विषयावर चर्चा झाल्या. लोकांनीही गाळ व ही बेशरम वनस्पती काढण्याची मागणी केली. मात्र, याकडे संबंधित विभागाने दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे. त्यामुळे या तलावाच्या जिवावर शेती पिकवणारे शेतकरी कमालीचे नाराज झाले आहेत. जर येथील वनस्पती काढली व गाळ काढला तर पाणीपातळी वाढून पाणीसाठाही मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. 

परिसरातील नेतेमंडळींनी केवळ गावच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून गावात येऊ नये तर ठोस कामांकडे त्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी प्रशांत मोरे, अमर गायकवाड, विकास गायकवाड, विनोद गायकवाड, सुभाष पालवे, मनोहर पालवे, नीलेश गायकवाड यांच्यासह ग्रामस्थ करत आहेत. 

Web Title: satara news Morghar lake