दिवाळीच्या तोंडावर "महावितरण'चा लपंडाव! 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 ऑक्टोबर 2017

संभाव्य भारनियमनाचे वेळापत्रक 
संभाव्य भारनियमनाचे वेळापत्रक "महावितरण'ने जाहीर केले असले तरी गरजेनुसारच त्याची अंमलबजावणी केली जाते. सातारा शहरातील संभाव्य भारनियमनाचे वेळापुत्रक पुढीलप्रमाणे - 

सोमवार ते गुरुवार - शुक्रवार ते रविवार 
साडेसात ते नऊ व अडीच ते सव्वाचार - नऊ ते 10.45 व 4.15 ते 5.45 

सातारा - दिवाळीच्या ऐन तोंडावर "महावितरण'ने साडेतीन ते पाच तासांपर्यंत भारनियमन सुरू केले आहे. विजेच्या रोजच्या उपलब्धतेनुसारच भारनियमनाच्या वेळापत्रकाची अंमलबजावणी केली जात आहे. तरीही सणासुदीच्या तयारीची धांदल सुरू असताना विजेचा सुरू झालेला लंपडाव भगिनी व व्यापारी वर्गाला त्रासदायक ठरला आहे. दरम्यान, ऐन दिवाळीत भारनियमन करण्याची आवश्‍यकता भासू नये, याकरिता कंपनीने पर्यायी व्यवस्था केली असल्याचे "महावितरण'च्या वरिष्ठ सूत्रांनी स्पष्ट केले. 

गेल्या आठवड्यापासून नागरिकांना विजेच्या खेळखंडोब्याला तोंड द्यावे लागत आहे. कधी सकाळी, कधी सायंकाळी भरनियमन केले जात आहे. रात्री आठ वाजण्याच्या सुमारासही काही काळासाठी का होईना "महावितरण' नागरिकांना स्वत:च्या अस्तित्वाची जाणीव करून देत आहे. "पिक अवर' म्हणजे ऐन धामधुमीच्या वेळी विजेचा खेळखंडोबा सुरू झाल्याने नागरिकांना गैरसोयीला तोंड द्यावे लागत आहे. सकाळी व सायंकाळबरोबरच सातारकरांना रात्रीही विजेचा लपंडाव सोसावा लागत आहे. कृषी ग्राहकांना आठ ते दहा तास भारनियमन आहे. कृषी वगळता इतर वापरासाठी भारनियमन गरजेपुरतेच केले जाते. 

गृहिणी व नोकरदार महिला वर्ग दिवसभरातील आपली दैनंदिन कामे रात्री लवकर आटोपून दिवाळीचा फराळ तयार करण्यात मग्न असतात. अशातच वीज गेल्याने खोळंबा होतो. काही वेळा दुपारीही ही परिस्थिती उद्‌भवते. या संदर्भात "महावितरण'च्या प्रतिनिधींशी संपर्क साधला असता त्यांनी विजेचा तुटवडा जाणवत असला तरी आवश्‍यकतेनुसारच भारनियमन केले जात आहे. बऱ्याचवेळा मागणी एवढाच पुरवठा असतो, तेव्हा भारनियमन केले जात नाही, असे त्यांनी सांगितले. 

कोळशाच्या कमतरतेमुळे राज्यभरात वीजनिर्मितीमध्ये तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे विजेची मागणी आणि उपलब्धता याची सांगड घालताना वीज कंपनीला भारनियमन करावे लागत आहे. "ऑक्‍टोबर हिट'मुळे विजेचा वापर वाढला आहे. त्यातच दिवाळीचा सण तोंडावर असल्याने मोठ्या प्रमाणात वीज वापरली जात आहे. या परिस्थितीत औष्णिक ऊर्जा प्रकल्पांना कोळशाचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे मागणी व पुरवठ्यात तफावत येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दिवाळीच्या काळात भारनियमन करण्याची आवश्‍यकता भासणार नाही. त्याकरिताची पर्यायी व्यवस्था "महावितरण'ने केली असल्याचे "महावितरण'च्या या सूत्रांनी स्पष्ट केले. 

"लोड मॅनेजमेंट सेल' व कळवा (मुंबई) येथील "लोड डिस्पॅच सेंटर' यांच्यामार्फत राज्याची विजेची एकूण मागणी व उपलब्धता याचा लेखाजोखा मिनिटा-मिनिटाला कळतो. त्याप्रमाणे ते भारनिमनाचा निर्णय घेऊन उपकेंद्रांना कळवतात. त्यानुसार भरनियमनाची अंमलबजावणी केली जाते, असेही त्यांनी सांगितले.

Web Title: satara news mseb electricity