सातारा पालिकेचे ‘गरज सरो अन्‌ वैद्य मरो’

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 ऑक्टोबर 2017

सातारा - शहर व परिसरातील गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने अंतिम क्षणी जिल्हा परिषदेच्या प्रतापसिंह शेती शाळेतील जागेत तळे खोदण्यात आले. त्यासाठी संरक्षक भिंतही पाडली गेली. मात्र, आता त्याला दोन महिन्यांचा कालावधी उलटला तरीही पालिकेने त्याकडे लक्ष दिले नाही. ‘गरज सरो अन्‌ वैद्य मरो’ या पालिकेच्या कार्यपध्दतीमुळे शेती शाळेचे नुकसान होत आहे.

सातारा - शहर व परिसरातील गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने अंतिम क्षणी जिल्हा परिषदेच्या प्रतापसिंह शेती शाळेतील जागेत तळे खोदण्यात आले. त्यासाठी संरक्षक भिंतही पाडली गेली. मात्र, आता त्याला दोन महिन्यांचा कालावधी उलटला तरीही पालिकेने त्याकडे लक्ष दिले नाही. ‘गरज सरो अन्‌ वैद्य मरो’ या पालिकेच्या कार्यपध्दतीमुळे शेती शाळेचे नुकसान होत आहे.

गणेशोत्सव जवळ आला की दरवर्षी मूर्तींचे विसर्जन कोठे करायचे, हा प्रश्‍न पालिकेसमोर उभा असतो. गत अनेक वर्षे प्रतापसिंह शेती शाळेतील जागेत हे विसर्जन तळे खोदले जात आहे. यावर्षीही जमीन देण्यास विरोध वाढला होता. मात्र, जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी अखेरीस या वर्षासाठी ही जागा देण्याचा निर्णय घेतला. ऑगस्ट अखेरीस पालिकेने सुमारे २५ ते ३० गुंठे जमिनीत तळे खोदले. तसेच बाजूची सिमेंटच्या फरशीनुसार बनविलेली संरक्षक भिंतही काढण्यात आली. जेसीबीद्वारे हा खड्डे खोदण्यात आला. त्यामध्ये प्लॅस्टिक कागद अंथरून त्यात पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे शहर व परिसरातील गणेश मंडळांच्या, काही घरगुती गणेशभूर्तींचे विसर्जन करण्यात आले. तद्‌नंतर नवरात्रोत्सवही पार पडला. हे तळे बुजविण्यात यावे, यासाठी प्रतापसिंह शेती शाळा व्यवस्थापन, जिल्हा परिषदेमार्फत पालिकेकडे पत्रव्यवहार करण्यात आला आहे. गणेशोत्सव होऊन दोन महिने, तर नवरात्रोत्सवाला महिन्याचा कालावधी उलटला आहे. तरीही पालिकेने या पत्रांवर गांभीर्याने पावले उचलली नाहीत.

त्यामुळे तळ्यातील साठलेल्या पाण्याला दुर्गंधी येऊ लागली आहे. शिवाय, त्यामुळे मच्छरांचे प्रमाणही वाढत असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. 

‘शेती शाळेतील तळे बुजविणे, संरक्षक भिंत पूर्ववत बांधण्यासाठी पालिकेला पत्रव्यवहार केला आहे. संरक्षक भिंत नसल्याने इतर लोकांचा उपद्रव वाढला आहे. पार्किंगसाठी वापरलेली जागा, शेततळ्याची जागेची उत्पादकता कमी होत आहे.’’
- राजेंद्र जाधव, ग्रामसेवक, शेती शाळा.

१.३५ लाखाचे नुकसान
तळे खोदण्यास घेतलेल्या जागेत ऊस लागण केली होती. हा ऊस काढण्यात आल्याने जिल्हा परिषदेचे एक लाख ३५ हजारांचे नुकसान झाले आहे. दरवर्षीच तेथे तळे काढले जाते, त्यामध्ये ‘प्लॅस्टर ऑफ पॅरिस’च्या मूर्तींचे विसर्जन करून त्यात पुरल्या जातात. त्यामुळे त्या मातीच्या उत्पादकतेवरही परिणाम झाला आहे. पालिका, जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्याला हवे.

संरक्षक भिंत नसल्याने...
बाहेरील लोकांचा उपद्रव वाढला
अतिक्रमणधारकांची वहिवाट वाढली
भाकड जनावरांमुळे पिकांचे नुकसान
शेतजमीन मशागतीची कामे रखडली

Web Title: satara news municipal work