राष्ट्रवादीविरोधात सर्वपक्षीय एकत्र

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 जून 2017

सातारा - लोकसंख्येच्या निकषात जिल्हा नियोजन समितीत सदस्यांच्या आठ जागा वाढल्या आहेत. या वाढलेल्या जागा लक्षात घेऊन या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात भाजप, शिवसेनेसह मित्रपक्षांना एकत्र आणण्याचा प्रयोग शिवसेनेचे पाटणचे आमदार शंभूराज देसाई हे करणार आहेत. दुसरीकडे काँग्रेसकडून कोणतीच भूमिका जाहीर नाही. ऐनवेळी काँग्रेस ‘राष्ट्रवादी’सोबत जाणार की भाजप, सेना युतीशी हात मिळवणी करणार, यावर निवडणुकीचे चित्र अवलंबून आहे.

लोकसंख्येच्या निकषानुसार यावेळेस नियोजन समितीच्या जागा वाढल्या आहेत. २०११ च्या जनगणनेनुसार जिल्ह्याची लोकसंख्या ३० लाखांहून अधिक असल्याने जिल्हा नियोजन समितीच्या ३२ वरून ४० जागा झाल्या आहेत. त्यामध्ये ग्रामीण क्षेत्रातून ३३, संक्रमणकालीन क्षेत्रात दोन, लहान नागरी क्षेत्रातून पाच अशा एकूण ४० जागा असतील. एकूण जिल्हा नियोजन समितीचे आठ सदस्य वाढले आहेत. या वाढलेल्या जागांमुळे या निवडणुकीकडे सर्वच पक्षांनी लक्ष देण्याचा निर्णय घेतला आहे. 

जिल्हा परिषद व नगरपंचायतींत राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व असल्याने ‘राष्ट्रवादी’चे वर्चस्व मोडीत काढण्यासाठी भारतीय जनता पक्ष, शिवसेना व मित्रपक्षांना एकत्र करून ‘राष्ट्रवादी’च्या विरोधात सर्व पक्ष एकवटणार आहेत. त्यासाठी पाटणचे शिवसेनेचे आमदार शंभूराज देसाई यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी भाजपसह मित्रपक्षांच्या सदस्यांशी चर्चा करण्यास सुरवात केली आहे. पण, जिल्ह्यात ‘राष्ट्रवादी’नंतर काँग्रेसचे सदस्य आहेत. अद्याप काँग्रेसच्या नेत्यांनी कोणतीच भूमिका जाहीर केलेली नाही. त्यामुळे काँग्रेस ‘राष्ट्रवादी’सोबत जाणार की भाजप, शिवसेना युतीसोबत राहणार, याची उत्सुकता आहे. त्यासाठी पालकमंत्री विजय शिवतारे, सहपालकमंत्री सदाभाऊ खोत आणि आमदार शंभूराज देसाई यांनी विरोधकांची मोट बांधण्याची तयारी केली आहे. जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी ४०, काँग्रेस सात, भाजप सात, शिवसेना दोन आणि आघाडीचे सात तर अपक्ष दोन सदस्य आहेत. अपक्षांपैकी खंडाळ्यातील अपक्षाने ‘राष्ट्रवादी’सोबत हातमिळवणी केली आहे. तर दुसरा शिवसेनेचा अपक्ष आहे. ही आकडेवारी पाहता ‘राष्ट्रवादी’ची ताकद मोठी असल्याने आमदार देसाईंची रणनीती ‘राष्ट्रवादी’ला अडविण्यात यशस्वी होणार का, याचीच उत्सुकता आहे.

महिलांसाठी ५० टक्के जागा
नियोजन समितीतील आरक्षणानुसार ४० सदस्यांपैकी २० जागा महिलांसाठी असतील. त्यामध्ये सर्वसाधारणसाठी २२ पैकी ११ महिला, नागरिकांचा मागास प्रवर्ग १३ जागांपैकी सात महिला, अनुसूचित जातीच्या चार जागांपैकी दोन महिला तर अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी एक जागा असेल.

Web Title: satara news ncp