पवार-उदयनराजे जवळीकीने ‘राष्ट्रवादी’ अस्वस्थ

पुणे-सातारा प्रवासात शरद पवार व उदयनराजे भोसले.
पुणे-सातारा प्रवासात शरद पवार व उदयनराजे भोसले.

धक्कातंत्रात माहिर असलेले खासदार उदयनराजे भोसले यांनी गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासह मोटारीतून प्रवास करून जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांना मोठा धक्का दिला. उदयनराजे यांनी गेल्या आठवड्यातच श्री. पवार यांची पुण्यात भेट घेतली होती. त्याठिकाणी दोघांत सुमारे तासभर चर्चा झाली होती. या दोन्ही नेत्यांमधील वाढत्या जवळीकीमुळे सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये अस्वस्थता तर सातारा विकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांत चैतन्य वाढले आहे. काय झाला असेल दोन तासांच्या प्रवासात खल, याविषयी राष्ट्रवादीच्या जिल्ह्यातील नेत्यांसह पक्षाच्या कार्यकर्त्यांना उत्सुकता आहे. 

लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस व उदयनराजे यांच्यात दरी वाढत गेली. जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या कार्यक्रमांत उदयनराजे अभावानेच दिसायचे. सातारा पालिका निवडणुकीत आमदार व खासदार यांच्यातील मनोमीलन तुटले. त्यानंतर उदयनराजेही राष्ट्रवादीशी दोन हात राखून होते. जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुकीचा प्रचार प्रारंभ श्री. पवार यांच्या उपस्थितीत अजिंक्‍यतारा साखर कारखान्यावर झाला. या कार्यक्रमाचे उदयनराजेंना साधे निमंत्रणही नव्हते. मध्यंतरी उदयनराजे, विजयसिंह मोहिते-पाटील ही मंडळी कोल्हापूरकर छत्रपतींच्या वाटेने भाजपच्या तंबूत जाणार, अशी आवई उठली होती. खासदार भोसले यांनी आगामी लोकसभा कोणत्या पक्षातून लढवावी, याची छुपी चाचपणी सुरू केल्याचीही वदंता होती. त्यांचे जवळचे काही कार्यकर्तेही खासगीत हा विषय चर्चेत काढून शक्‍यतांचा अंदाज घेत होते. 

‘लोणंद प्रकरणा’मुळे काही काळ उदयनराजेंना बॅकफुटवर जावे लागले. जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या गोटात आगामी लोकसभेचा सक्षम उमेदवार कोण, यावर चर्चा झडू लागल्या. सामान्य कार्यकर्त्यांमध्येही हीच भावना होती. उदयनराजेंसारख्या आक्रमक नेतृत्वाला भाजपमध्ये संधी आणि स्थान मिळेल, अशी शक्‍यता नाही. भाजपने नारायण राणे यांना अनेक महिने खेळवून अखेर त्यांना थेट पक्षात न घेता स्वतंत्र पक्ष काढायला भाग पाडले. गोपीनाथ मुंडेंसारखा उदयनराजेंवर प्रेम करणारा नेता आता महाराष्ट्रात नाही. भाजपचा कोणताही निर्णय आता केंद्रातून होतो. त्यामुळे उदयनराजेंनी भाजपकडे पाठ केली असावी. 

उदयनराजेंनी एकदम ‘यु टर्न’ घेतल्याने जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अस्वस्थता वाढू लागली. गेल्याच आठवड्यात पुण्यात श्री. पवार यांची उदयनराजेंनी भेट घेऊन चर्चा केली. या चर्चेचा तपशील समजू शकला नसला तरी अर्थातच हवापाण्याच्या गोष्टी झाल्या असण्याची शक्‍यता नाही. या चर्चेचा पुढील अध्याय आज श्री. पवार व उदयनराजे यांच्या एकत्रित प्रवासात झाला. अर्थात या प्रवासात खासदार विजयसिंह मोहिते-पाटील हेही सोबत मोटारीत होते. उदयनराजे यांच्या आजच्या खेळीने केवळ जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते व पदाधिकारीच नव्हे तर उदयनराजे गटाचे पदाधिकारी व कार्यकर्तेही बुचकळ्यात पडले. उदयनराजेंच्या आजच्या ‘कम बॅक’मुळे सातारा विकास आघाडीतील पदाधिकाऱ्यांच्या चेहऱ्यांवर आश्‍चर्यमिश्रित चैतन्य होते. या दोन्ही नेत्यांतील चर्चेचा अंदाज सर्वजण घेत होते. यापुढील राजकारण आता कोणते वळण घेणार, याची चर्चा या धक्कातंत्राने सुरू झाली.

भाऊबंदकी चर्चेत!
पुण्याहून साताऱ्याला येईपर्यंत खासदार उदयनराजे भोसले श्री. पवार यांच्या गाडीत होते. त्यानंतर रयत शिक्षण संस्थेचा कार्यक्रम उरकून कऱ्हाडच्या दिशेने जाताना श्री. पवार यांच्या वाहनांचा ताफा शेंद्रे (ता. सातारा) येथील अजिंक्‍यतारा कारखान्यानजीक थांबला आणि त्यांच्या गाडीत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले बसल्यावर ताफा कऱ्हाडकडे रवाना झाला. यामुळे श्री. पवार यांनी या दौऱ्यात स्वतःसोबत फिरवलेली राजघराण्याची भाऊबंदकीही यानिमित्ताने चर्चेत आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com