पिंपोड्यात सत्ता टिकवण्याचे ‘राष्ट्रवादी’समोर आव्हान

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 ऑक्टोबर 2017

रामराजे नाईक-निंबाळकरांचा आदेश!
राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या व मोठ्या गावची सत्ता ताब्यात राहावी, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील वरिष्ठांकडूनही प्रयत्न सुरू आहेत. विधान परिषदचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी या निवडणुकीत लक्ष घातले आहे. त्यांनी नेते व कार्यकर्त्यांची बैठक घेऊन व्यक्तिगत मतभेद बाजूला ठेऊन ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवण्याचा आदेश दिला आहे.

पिंपोडे बुद्रुक - राजकीयदृष्ट्या संवेदनशील समजल्या जाणाऱ्या येथील ग्रामपंचायतीची निवडणूक अतिशय चुरशीची होण्याची शक्‍यता आहे. विरोधक एकवटल्याने राष्ट्रवादी काँग्रेससमोर सत्ता टिकवण्याचे आव्हान आहे. सरपंचपद थेट जनतेतून निवडले जाणार असल्याने सरपंच आपलाच हवा, यासाठी दोन्ही गटांनी कंबर कसली आहे. 

एकूण पाच हजार ८८५ मतदारसंख्या असलेल्या या ग्रामपंचायतीचे सरपंचपद अनुसूचित जातीसाठी राखीव असून, त्यासाठी तीन तर सदस्यपदाच्या १५ जागांसाठी पाच वॉर्डमधून ३० उमेदवार आमनेसामने आहेत. सहा महिन्यांपूर्वी विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीची निवडणूक रंगतदार झाली होती. त्यात ‘राष्ट्रवादी’ला हार पत्करावी लागली होती. तत्पूर्वी माजी सरपंच विकास साळुंखे यांनी पारंपरिक विरोधक असलेल्या सुरेशराव साळुंखे आणि अशोकराव लेंभे यांच्याशी हातमिळवणी केली. ‘राष्ट्रवादी’चे दोन पारंपरिक विरोधक एकत्र झाले असतानाही संजीव साळुंखे, सुरेश निकम, सागर लेंभे, विजय लेंभे, दीपक पिसाळ यांच्या सोसायटी गटाने ‘राष्ट्रवादी’ला धोबीपछाड दिला होता. मात्र, त्यानंतर झालेल्या पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीत ‘राष्ट्रवादी’ला गावात मोठे मताधिक्‍य मिळाले होते. पिंपोडे बुद्रुक हे उत्तर कोरेगावमधील राजकीयदृष्ट्या संवेदनशील महत्त्वाचे गाव आहे. त्यामुळे येथील ग्रामपंचायत ताब्यात असल्यास ‘राष्ट्रवादी’चे राजकारण सोपे होते. सुरेशराव साळुंखे व अशोकराव लेंभे यांचे राजकारण मोडीत काढून विकास साळुंखे यांनी १५ वर्षांपूर्वी सत्ता हस्तगत केली होती. मात्र, दरम्यानच्या काळात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. यावेळी विकास साळुंखे यांनी पंचायत समितीचे उपसभापती संजय साळुंखे यांच्या साथीने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. पंचायत समिती निवडणुकीनंतर उपसभापतींनीही गावात विकासकामांचा धडाका लावला आहे. सरपंचपदासाठी ‘राष्ट्रवादी’कडून नैनेश कांबळे तर सोसायटी गटाकडून शैलेश कांबळे सरपंचपदाची निवडणूक लढवत आहेत. रिपब्लिकन पक्षाचे तालुकाध्यक्ष नरेंद्र वाघांबरे यांच्या अपक्ष उमेदवारीने निवडणुकीत रंगत आणली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जयेंद्र लेंभे, माजी संचालक चंद्रकांत निकम व खरेदी-विक्री संघाच्या संचालिका शैला निकम यांनी सोसायटी गटात नुकताच प्रवेश केला. त्यामुळे सोसायटी गटाची ताकद वाढली आहे. तर विकास साळुंखे व संजय साळुंखे यांनीही एकनिष्ठ कार्यकर्त्यांची फौज उभी केली आहे. भवानी, गणेश, राम, मठ व भैरवनाथ या चारही वॉर्डात चुरस पाहावयास मिळणार आहे.

Web Title: satara news NCP grampanchayat election