राष्ट्रवादीचा गावोगावी हल्लाबोल

प्रवीण जाधव
बुधवार, 28 मार्च 2018

सातारा - विदर्भ व मराठवाड्यातील हल्लाबोलनंतर राष्ट्रवादी काँग्रेसची ही यात्रा पुढील आठवड्यात सातारा जिल्ह्यात येत आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादीला जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळण्याची ही एक नामी संधी आहे. त्यातच खासदार उदयनराजे भोसले यांनी वाढदिवसाला जमवलेल्या गर्दीतून दिलेले आव्हान लक्षात घेता राष्ट्रवादीची साताऱ्यातील ताकद दाखवून देण्यासाठी नेत्यांनी कंबर कसली आहे. त्यासाठी गावोगावी बैठका सुरू आहेत.  

सातारा - विदर्भ व मराठवाड्यातील हल्लाबोलनंतर राष्ट्रवादी काँग्रेसची ही यात्रा पुढील आठवड्यात सातारा जिल्ह्यात येत आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादीला जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळण्याची ही एक नामी संधी आहे. त्यातच खासदार उदयनराजे भोसले यांनी वाढदिवसाला जमवलेल्या गर्दीतून दिलेले आव्हान लक्षात घेता राष्ट्रवादीची साताऱ्यातील ताकद दाखवून देण्यासाठी नेत्यांनी कंबर कसली आहे. त्यासाठी गावोगावी बैठका सुरू आहेत.  

राष्ट्रवादीची हल्लाबोल यात्रा आठ व नऊ एप्रिल या कालावधीत जिल्ह्यात येत आहे. आठ तारखेला दहिवडी, कोरेगाव, सातारा तालुक्‍यांत कार्यक्रम आहेत. त्यात साताऱ्यामध्ये जिल्हा परिषदेच्या मैदानावर जाहीर सभेचे नियोजन केले आहे. नऊ तारखेला पाटण, कऱ्हाड आणि वाई तालुक्‍यांत सभा होतील. दोन दिवसांत एकूण सहा सभांचे नियोजन आहे. ‘हल्लाबोल’च्या माध्यमातून पक्ष त्या- त्या ठिकाणच्या लोकप्रतिनिधी व नेत्यांची ताकद आजमावणार आहे. 

विदर्भ व मराठवाड्यात पक्षाच्या या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळाला. या परिसराच्या तुलनेत पश्‍चिम महाराष्ट्रात त्यातही सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादीची ताकद खूपच जास्त आहे. त्यामुळे आंदोलन यशस्वी करण्याचे जिल्ह्यातील नेत्यांपुढे मोठे आव्हान असेल. त्यामुळे त्या- त्या ठिकाणच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांना कामाला लावले आहेच. परंतु, स्वत: नेत्यांनीही गावोगावी बैठकांचा धडाका लावला आहे. प्रत्येक कार्यकर्त्यावर जबाबदारी निश्‍चित केली जात आहे. आंदोलनात अभिनवता आणण्यासाठी काय करता येईल, याचाही विचार केला जात आहे.आठ एप्रिलला माण व कोरेगावमध्ये सभा होणार आहेत. मात्र, या दिवशी सर्वांत महत्त्वाची सभा असणार आहे ती साताऱ्याची. खासदार उदयनराजे भोसले यांनी वाढदिवसाच्या कार्यक्रमात खासदार शरद पवार यांच्याबरोबर मुख्यमंत्री व सर्वपक्षीय नेत्यांना निमंत्रण दिले होते. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे आमदार व नेत्यांनाही बोलावण्यात आले होते. मात्र, पक्षाध्यक्ष सोडले, तर राष्ट्रवादीचे आमदार या कार्यक्रमाला फिरकले नाहीत. आमदारांच्या या बंडाची चांगलीच चर्चा झाली. आमदारांच्या बंडातही उदयनराजेंनी कार्यक्रमाला मोठी गर्दी जमवली. दोघांच्याही कृती एकमेकाला आव्हान देणाऱ्याच होत्या. 

खासदारांच्या वाढदिवसाला झालेल्या गर्दीला उत्तर देण्याची नामी संधी आमदारांनी हल्लाबोल यात्रेच्या माध्यमातून शोधली आहे. त्यामुळे पक्ष नेतृत्वाला विनंती करून नियोजित सभांची संख्या कमी करण्यात आली आहे. साताऱ्याची सभा मोठी करतो, असा निरोप पक्षश्रेष्ठींना दिला गेला आहे. पक्षाला दिलेला शब्द खरा करून दाखविण्याची वेळ आता आमदारांवर आली आहे. त्यासाठी आमदारांनीही कंबर कसली आहे. त्यात शिवेंद्रसिंहराजे भोसले व शशिकांत शिंदे आघाडीवर दिसतात.

उदयनराजे कोणती भूमिका घेणार?
आमदारांची तयारी सुरू असली तरी, खासदार गट अद्याप या आंदोलनाच्या तयारीत उतरलेला दिसत नाही. मात्र, ऐनवेळी भूमिका घेण्यात उदयनराजे वाक्‌बगार आहेत. त्यामुळे आंदोलनाच्या बाबतीत ते कोणती भूमिका घेणार, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र, हल्लाबोलच्या निमित्ताने जिल्हा परिषद मैदानावर नेत्यांची जुगलबंदी रंगणार, हे निश्‍चित.

हल्लाबोल यात्रेचा कार्यक्रम
ता. आठ एप्रिल -     दहिवडी, कोरेगाव, सातारा तालुके
ता. नऊ एप्रिल -      पाटण, कऱ्हाड, वाई तालुके

Web Title: satara news ncp hallabol agitation