मोहिते गट चार्ज; दक्षिणेत राष्ट्रवादीला बळ

सचिन शिंदे
शुक्रवार, 6 ऑक्टोबर 2017

कऱ्हाड - यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या राजकारणात वेगवगळ्या संकाटांवर मात करत राजकीय प्रवास करणारे युवा नेते व कारखान्याचे माजी अध्यक्ष अविनाश मोहिते यांच्या पाठीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार यांची पडलेली कौतुकाची थाप बऱ्याच राजकीय संकेतांना जन्म देणारी ठरली आहे. श्री.

कऱ्हाड - यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या राजकारणात वेगवगळ्या संकाटांवर मात करत राजकीय प्रवास करणारे युवा नेते व कारखान्याचे माजी अध्यक्ष अविनाश मोहिते यांच्या पाठीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार यांची पडलेली कौतुकाची थाप बऱ्याच राजकीय संकेतांना जन्म देणारी ठरली आहे. श्री. पवार यांचा रेठरे बुद्रुक येथे काल झालेला दौरा कऱ्हाड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील ‘राष्ट्रवादी’च्या ताकदीला बळ देणारा, मरगळलेल्या अविनाश मोहिते म्हणजेच संस्थापक गटाला संजीवनी देणारा, कोण कुठे आहे माहीत नाही, मात्र मी आहे, काळजी नको, असा दिलासा देऊन नव्या राजकीय भाकितांची चर्चा घडवणारा, कऱ्हाड दक्षिणेतील सारी राष्ट्रवादी एका छताखाली आणणारा अशा सर्वांगाने महत्त्वाचा ठरला आहेच. त्याहीपेक्षा कृष्णा कारखान्याच्या घडमोडींसह तेथील सत्तास्थानाला फुंकर घालून नव्या राजकीय ज्वाळांना जन्म देणारा ठरणार काय, अशी चर्चा आता कृष्णेकाठी रंगू लागली आहे. 

मध्यंतरी कृष्णा कारखान्यात अविनाश मोहिते यांच्या कालावधीत आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे आरोप श्री. मोहिते यांच्यावर झाले. त्यांना अटकही झाली, ते ९४ दिवस कारागृहात होते. त्यानंतर त्यांची जामिनावर सुटका झाली. तांत्रिकदृष्ट्या अडचणीचा ठरलेला त्यांच्यावरील आरोप त्यांना अटकेपर्यंत घेऊन जाणारा ठरला. त्यामागची कारणे आता हळूहळू समोर येतीलही; मात्र त्या प्रकारामुळे अविनाश मोहिते यांच्यासह त्यांचा गट सध्या अस्वस्थ होता व आहे. त्यांच्या गटात अद्यापही उत्साहाचे वातावरण नव्हते. त्या आरोपात किती तथ्य आहे, तो भाग अद्यापही तपासावर आहे. त्यामुळे अविनाश मोहिते यांच्या समर्थकांत निर्माण झालेली अस्वस्थता अधिक स्पष्ट होत होती. मात्र, श्री. पवार यांच्या दौऱ्यामुळे ती आता दूर होण्यास मदत होणार आहे. कालच्या श्री. पवार यांचा एका तासाचा कालावधी त्यासाठी पुरेसा आहे. त्या काळात घडलेल्या घटनांची आता चर्चा रंगते आहे. 

अविनाश मोहिते यांच्या घरात काल सगळ्यात जास्त ‘फोकस’ झाले होते ते वाळव्याचे आमदार व माजी मंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीवरच. त्यांची उपस्थिती सूचक तर होतीच, त्याहीपेक्षा ती अधिक सक्रिय दिसली. मोहिते यांच्या घरात वडिलधाऱ्याच्या जबाबदारीने माजी मंत्री पाटील यांनी केलेला वावर मोहिते यांच्यासह त्यांच्या गटाला ऊर्जितावस्थेत नेईल, असे वातावरण निर्माण करणारा होता. ज्येष्ठ नेते पवार यांनी अविनाश मोहिते यांच्या आई-वडिलांनाही काळजी नको, असा सल्ला देत सूचकपणे केलेल्या विधानावर आता चर्चा रंगते आहे. 

श्री. पवार यांचा दौरा म्हणजे कऱ्हाड तालुक्‍यातील राष्ट्रवादी काँग्रेस एका छताखाली आणण्याचा त्यांनी केलेला प्रयत्न आहे. त्यात त्यांना अपेक्षित यश आल्याचे अनेकांच्या उपस्थितीवरून जाणवून गेले. आमदार बाळासाहेब पाटील, जनता उद्योग समूहाचे प्रमुख राजेश पाटील-वाठारकर, राष्ट्रवादीचे ॲड. आनंदाराव ऊर्फ राजाभाऊ पाटील-उंडाळकर, माजी सभापती देवराज पाटील यांच्यासह राष्ट्रवादीच्या तालुक्‍यातील दुसऱ्या व तिसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांनीही लावलेली उपस्थिती बरेच काही सांगून जाते. कोण कुठे आहे, यापेक्षी आम्ही अविनाश मोहिते यांच्या सोबत आहोत, असाच संदेश श्री. पवार यांनी काल राजकीय वर्तुळात दिला.

भाजपला भेदण्यासाठी...
काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा मतदारसंघच असल्याने भाजपने या मतदारसंघात ‘फिल्डिंग’ लावली आहे. त्यांनी याच मतदारसंघात तीन मोठी पदे दिली आहेत. त्यात पक्षाचे सरचिटणीसपद व पंढरपूर येथील विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर ट्रस्टच्या अध्यक्षपदी अतुल भोसले, जिल्हाध्यक्षपदी विक्रम पावसकर, सहकार परिषदेच्या अध्यक्षपदी शेखर चरेगावकर यांची वर्णी लागली आहे. भाजपचा त्रिवेणी संगम भेदून कऱ्हाड दक्षिणेत ठोस पर्याय देण्यासाठी राष्ट्रवादीकडून वेगळ्या पद्धतीची आखणी केली जात आहे. त्यात पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबत असतील किंवा नाही, याची खात्री आताच देणे कठीण असले तरी कालच्या दौऱ्यातून त्यासाठीचे संकेत देण्याचा प्रयत्न श्री. पवार यांनी केला आहे.

Web Title: satara news ncp politics