‘राष्ट्रवादी’चे विजयी ‘नियोजन’

‘राष्ट्रवादी’चे विजयी ‘नियोजन’

२२ जागा जिंकल्या; उदयसिंह पाटील, देसाई आघाडीला झटका

सातारा - नियोजन समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपच्या मदतीने २२ जागा जिंकत वर्चस्व सिद्ध केले. भाजपने तीन, तर काँग्रेसने तीन जागा जिंकत सर्वांना धक्का दिला. सातारा विकास आघाडीने एक जागा जिंकली. आमदार देसाई व खासदारांच्या सातारा विकास आघाडीची एकी होऊनही देसाईंना सर्वसाधारणमधील एक जागा गमवावी लागली. उदयसिंह पाटील यांना मतांची बेरीज जुळली नाही, तर सर्वांचे लक्ष लागलेल्या जिजामाला निंबाळकरांनी विजय मिळविला.

जिल्हा नियोजन समितीच्या ४० जागांपैकी अकरा जागा यापूर्वीच बिनविरोध झाल्या होत्या. त्यामध्ये राष्ट्रवादीच्या आठ, भाजपची एक तर काँग्रेसच्या दोन जागांचा समावेश होता. आज उर्वरित २९ जागांसाठी झालेल्या मतमोजणीत राष्ट्रवादीने २२, भाजपने तीन, काँग्रेसने तीन, तर उदयनराजे भोसले यांच्या साविआला एक जागा जिंकता आली. 

सकाळी १० वाजता मोजणी सुरू झाली. सर्वप्रथम नगरपंचायतीची मोजणी झाली. यामध्ये राष्ट्रवादीच्या शोभा माळी (७२ मते) नऊ मतांनी विजयी झाल्या. विरोधातील रेश्‍मा कोकरे (काँग्रेस) यांना ६३ मते मिळाली. शोभा माळी यांनी राष्ट्रवादीची विजयी माळ लावली आणि त्यानंतर सर्वसाधारण प्रवर्गातून राष्ट्रवादीचे संजय पिसाळ २० मतांनी निवडून आले. त्यांना ७८ मते, तर काँग्रेसचे मनोहर शिंदे यांना ५८ मते मिळाली. त्यानंतर नगरपालिकेची मतमोजणी झाली. यात अनुसूचित जाती प्रवर्गातून राष्ट्रवादीचे (नविआ) बाळू खंदारे सर्वाधिक १२४ मतांनी विजयी झाले. त्यांना १५६ मते, तर विरोधातील भाजपचे मिलिंद काकडे यांना ३२ मते मिळाली. नागरिकांच्या मागास प्रवर्ग स्त्री राखीवमधून लीना गोरे (राष्ट्रवादी, नविआ) यांना १०३, तर विरोधातील (शिवसेना) शारदा ढाणक यांना ८५ मते मिळाली. सौ. गोरे १८ मतांनी विजयी झाल्या. नागरिकांच्या मागास प्रवर्गातून राष्ट्रवादीचे आनंद कोरे यांना ११९, तर काँग्रेसचे विजय वाटेगावकर यांना ६९ मते मिळाली. कोरे ५० मतांनी निवडून आले.

पालिका मतदारसंघातील स्त्री राखीवमधून राष्ट्रवादीच्या पल्लवी पवार यांना १०८ तर साविआच्या स्नेहा नलवडे यांना ७८ मते मिळाली.

येथे पल्लवी पवार ३० मतांनी विजयी झाल्या. येथे दोन मते अवैध ठरली.
पालिकेच्या सर्वसाधारण प्रवर्गातून राष्ट्रवादीचे चरण गायकवाड यांना ११७, तर काँग्रेसचे अशोक जाधव यांना ६७ मते, तर राष्ट्रवादीतील पण शेखर गोरे यांचे धनाजी माने यांना दोन मते मिळाली. पालिकेच्या पाचही जागा जिंकत राष्ट्रवादीने आघाडी घेतली.

जिल्हा परिषद मतदारसंघाच्या मोजणीत सुरवातीला अनुसूचित जाती स्त्री राखीवची मतमोजणी झाली. येथे २२ चा कोटा होता. येथे भाजपच्या रेश्‍मा शिंदे यांना ३७, वनिता पलंगे यांना २२ मते मिळाल्याने त्या विजयी झाल्या. पण, तिसऱ्या उमेदवार मधू कांबळे यांना चार मते मिळाली. त्या राष्ट्रवादीच्या उमेदवार असूनही त्यांच्या कोट्यातील १८ मते रेश्‍मा शिंदेंकडे वळली. त्यामुळे सौ. कांबळे पराभूत झाल्या. अनुसूचित जाती प्रवर्गात २२ मतांचा कोटा होता. यात राष्ट्रवादीचे शेखर गोरेंचे उमेदवार बापू जाधव यांना ४२, तर भाजपचे सागर शिवदास यांना २१ मते मिळाली. त्यामुळे बापू जाधव विजयी झाले. येथे पाच मते बाद झाली. 

जिल्हा परिषद मतदारसंघातील सर्वसाधारण प्रवर्गात मतांचा कोटा सात होता, तर नऊ जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात होते. पहिल्या फेरीत सात मते मिळाल्याने उदय कबुले, मंगेश धुमाळ, मानसिंगराव जगदाळे (राष्ट्रवादी) तर मनोज घोरपडे (भाजप) विजयी झाले. दुसऱ्या फेरीत सहा मते मिळालेले रमेश पाटील, बाबासाहेब पवार, शिवाजी चव्हाण (राष्ट्रवादी) आणि जिजामाला निंबाळकर (काँग्रेस) या विजयी झाल्या. तिसऱ्या फेरीत निवास थोरात हे पाच मते मिळाल्याने विजयी झाले. कोट्यापेक्षा कमी मते मिळाल्याने शंभूराज देसाई आघाडीचे विजय पवार (चार), उदयसिंह पाटील (तीन) (कविआ) हे पराभूत झाले.

नियोजन समितीतील बलाबल
एकूण जागा     ४०
राष्ट्रवादी     ३०
काँग्रेस     ५ 
भाजप     ४
सातारा विकास आघाडी     १

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com