एक राजे अज्ञातवासात, दुसरे लंडनला !

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 मे 2017

मध्यंतरी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर हेही ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेले होते. तेथून ते परत आले ते थेट जीएसटीच्या अधिवेशनात व्यस्त झाले. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात प्रमुख नेत्यांच्या अनुपस्थिती जाणवू लागली आहे

सातारा : खंडणीच्या गुन्ह्यात अटक टाळण्यासाठी खासदार उदयनराजे भोसले हे अज्ञातवासात आहेत, तर दररोजच्या राजकीय धकाधकीच्या वातावरणातून रिलॅक्‍स होण्यासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हे कुटुंबासह लंडनला पर्यटनाला गेले आहेत. वातावरणात प्रचंड उकाडा असतानाही दोन्ही राजे साताऱ्यात नसल्याने राजकीय वातावरणात थंडावा जाणवत आहे. 

राजकीय घडामोडीत अलीकडे खासदार उदयनराजेंची साताऱ्यातील अनुपस्थिती जाणवू लागली आहे. आपल्या वेगळ्या स्टाईलमुळे उदयनराजे नेहमी चर्चेत असतात. त्यांच्या राजकीय फटकेबाजीनेही अनेकांची झोप उडते. ते कधी कुणावर निशाणा साधतील, याचा नेम नाही. पण खंडणीचा गुन्ह्यात जामीन मिळत नसल्याने ते सध्या अज्ञातवासात आहेत. त्याची अनुपस्थिती त्यांच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना अस्वस्थ करत आहे. महाराज कधी येणार.., कधी येणार मालक... अशी चर्चा त्यांच्या निष्ठावंतांत ऐकायला येत आहे. 

पालिका निवडणुकीपासून खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजेंत शीतयुद्ध सुरू होते. उदयनराजेंच्या अनुपस्थितीत त्यांचे निष्ठावंतांनी यामध्ये उडी घेऊन पत्रकाव्दारे ते पुढे सुरू ठेवले. पण उदयनराजेंना जामीन मिळण्यात अडचण आल्यानंतर हा वाद थांबला आहे. यादरम्यान, गेल्या आठवड्यात आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले कुटुंबासोबत लंडनला पर्यटनासाठी गेले आहेत.

एकूणच दोन्ही राजे साताऱ्यात नसल्याने राजकीय वातावरण थंडच आहे. मध्यंतरी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर हेही ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेले होते. तेथून ते परत आले ते थेट जीएसटीच्या अधिवेशनात व्यस्त झाले. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात प्रमुख नेत्यांच्या अनुपस्थिती जाणवू लागली आहे

Web Title: Satara News: Numb Politics in Satara