कांद्याने केला शेतकऱ्यांचा वांदा!
बिजवडी - गेल्या वर्षापासून कांदा उत्पादनात "कही खुशी कही गम'चे वातावरण आहे. उन्हाळी हंगामातील कांद्याचे दर गडगडल्याने शेतकरी हवालदिल झाल्याचे चित्र आहे. दराअभावी शेतकऱ्यांनी विक्रीऐवजी कांदा ऐरणीत साठवण्यावर भर दिला आहे.
जिल्ह्यात माण, खटाव व कोरेगाव तालुक्यांत मोठ्या प्रमाणात कांद्याचे पीक घेतले जाते. शेतकऱ्यांना पैसे मिळवून देणारे हे पीक आहे.
बिजवडी - गेल्या वर्षापासून कांदा उत्पादनात "कही खुशी कही गम'चे वातावरण आहे. उन्हाळी हंगामातील कांद्याचे दर गडगडल्याने शेतकरी हवालदिल झाल्याचे चित्र आहे. दराअभावी शेतकऱ्यांनी विक्रीऐवजी कांदा ऐरणीत साठवण्यावर भर दिला आहे.
जिल्ह्यात माण, खटाव व कोरेगाव तालुक्यांत मोठ्या प्रमाणात कांद्याचे पीक घेतले जाते. शेतकऱ्यांना पैसे मिळवून देणारे हे पीक आहे.
जून महिन्यात केलेल्या हळव्या कांद्याला चांगले दर मिळाल्याने बहुतांश उत्पादकांना चांगला फायदा झाला होता. कांद्याचे दर भरमसाट वाढल्याने उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कांद्याची लागण केली. जून महिन्यापासून लागवड केलेल्या कांद्याला चांगला दर मिळाल्याने अनेकांनी पुन्हा हळवा कांद्याची लागण केली होती, तर काहींनी उन्हाळी कांद्याची लागवड केली. त्याही कांद्याला चांगला दर मिळाला. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत कांद्याचे दर टिकून होते. मात्र, उशिरा लागण केलेले व बाजारपेठेत एकाच वेळी आवक वाढल्याने कांद्याचे दर गडगडले. किमान दोन हजार रुपयांपर्यंत चाललेले दर आता 500 ते 600 रुपये क्विंटलवर येऊन ठेपल्याने कांदा उत्पादक हवालदिल झाला आहे. अनेकांनी दर गडगडल्याने कांदे थैल्यात भरून निवाऱ्याला ठेवले आहेत. काहींनी कांद्याच्या ऐरणी लावल्या आहेत.
शेतकरी आर्थिक संकटात
कांदा भरताना मजुरी, थैली, प्रवासभाडे, काही प्रमाणात हमाली असे एकूण क्विंटलला 200 रुपयांवर खर्च येतो. त्या व्यतिरिक्त कांद्याला बियाणे, खते, शेतीची मशागत, भांगलण, काढणी, काटणी, पाणी यासाठी केलेला खर्च वेगळाच आहे. कांद्यावर होणारा खर्च व सध्याच्या दराचे गणित जुळत नसल्याने शेतकरी वर्ग आर्थिक संकटात सापडला आहे. चांगल्या प्रतीच्या कांद्याला प्रति क्विंटल 500 ते 600 रुपये दर दिल्यानंतर कमी प्रतीच्या कांद्याचे दर व्यापारी त्यांच्या मनाप्रमाणे ठरवत आहेत.
आकडे बोलतात...
कांद्याचे एकूण क्षेत्र (हेक्टर) (रब्बी हंगाम) - 9242 हेक्टर
एकूण अपेक्षित उत्पादन (हेक्टर) - 175 ते 250 क्विंटल
सध्याचा घाऊक दर (क्विंटल) - 800 ते 900
किरकोळ बाजारातील दर (क्विंटल) - 1200 ते 1500
शासनाकडून कांद्याला किमान दीड हजार रुपयांवर हमीभाव मिळणे गरजेचे आहे. तरच शेतकरी वर्गाला कांदा पीक परवडेल. आता कांद्याचे दर गडगडल्याने उत्पादक आर्थिक संकटात सापडला आहे.
- संतोष भोसले, कांदा उत्पादक, बिजवडी
कांद्याचे दर पडल्याने आम्ही 350 थैल्या कांद्याची ऐरण तयार करून ठेवल्या आहेत. 15 ऑगस्टच्या दरम्यान चांगले दर आला की ती ऐरण फोडून कांदे बाजारपेठेत पाठवू. - डॉ. विजयकुमार पाठक, कांदा उत्पादक, वारूगड