अंगणवाडी सेविकांची भाऊबीज रक्कम दुप्पट - पंकजा मुंडे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 जानेवारी 2018

खंडाळा - राज्याच्या आगामी अर्थसंकल्पात अंगणवाडी सेविकांना सहा हजार 500 रुपये वाढीव मानधन, तसेच भाऊबीजची रक्कम दुप्पट करण्यासंबंधी तरतूद केली जाईल. त्याचबरोबर मागील फरकासह रक्कम अदा करणार आहे, असे ग्रामविकास, महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांनी आज येथे जाहीर केले. यापुढे अंगणवाडी सेविकांनी मोर्चे काढू नयेत, असे आवाहनही त्यांनी केले. 

खंडाळा - राज्याच्या आगामी अर्थसंकल्पात अंगणवाडी सेविकांना सहा हजार 500 रुपये वाढीव मानधन, तसेच भाऊबीजची रक्कम दुप्पट करण्यासंबंधी तरतूद केली जाईल. त्याचबरोबर मागील फरकासह रक्कम अदा करणार आहे, असे ग्रामविकास, महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांनी आज येथे जाहीर केले. यापुढे अंगणवाडी सेविकांनी मोर्चे काढू नयेत, असे आवाहनही त्यांनी केले. 

नायगाव (ता. खंडाळा) येथे "माझी कन्या भाग्यश्री' योजना रथयात्रेचा समारोप व भाग्यश्री मेळाव्यात त्या बोलत होत्या. कार्यक्रमास पालकमंत्री विजय शिवतारे, पशुसंवर्धन व दुग्धोत्पादनमंत्री महादेव जानकर, "महिला व बालविकास'च्या राज्यमंत्री विद्या ठाकूर, आमदार मकरंद पाटील व संगीता ठोंबरे, राज्य बाल हक्क आयोगाचे अध्यक्ष प्रदीप घुगे, महिला व बालविकास आयुक्त लहुराज माळी, जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक- निंबाळकर, उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, अर्थ व शिक्षण समितीचे सभापती राजेश पवार, "समाज कल्याण'चे सभापती शिवाजी सर्वगोड, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे, सभापती मकरंद मोटे, उपसभापती वंदना धायगुडे, सरपंच निखिल झगडे उपस्थित होते. 

श्रीमती मुंडे म्हणाल्या, ""अंगणवाडी सेविकांच्या आहार बिलाचाही प्रश्न लवकरच मार्गी लागेल. यापुढे बचत गटांसाठी शून्य टक्के व्याजदराने कर्ज देण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. बचत गटांच्या माध्यमातून महिलांनी रोजगार उभा करावा. "माझी कन्या भाग्यश्री' योजनेतून पात्र लाभार्थी मुलीच्या खात्यावर वयाच्या अठराव्या वर्षी एक लाख 46 हजार रुपये जमा होतील.'' नायगाव येथे भव्य सृष्टी उभारून पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. 

मुलीच्या जन्माचे स्वागत करावे व आर्थिक सत्तेमध्ये मुलींना वाटा द्यायला हवा. त्यासाठी समाजाने समाजाने स्वतःची मानसिकता बदलायला हवी, असे आवाहान विजय शिवतारे यांनी केले. या वेळी विद्या ठाकूर, संजीवराजे नाईक- निंबाळकर, निखिल झगडे यांची भाषणे झाली. 

या वेळी "माझी कन्या भाग्यश्री' या योजनेतील लाभार्थींना प्रातनिधिक स्वरूपात प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. प्रचार व प्रसिद्धीसाठी झालेल्या वक्‍तृत्व, घोषवाक्‍य, पथनाट्य, चित्रकला, निबंध व रांगोळी स्पर्धेतील विजेत्यांना गौरविण्यात आले. ज्योती आंबेकर यांनी प्रास्ताविक केले. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे यांनी आभार मानले. कार्यक्रमापूर्वी पंकजा मुंडे व उपस्थितांनी सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकास अभिवादन केले. कार्यक्रमास जिल्हा परिषद महिला व बालविकास अधिकारी जावेद शेख, सुवर्णा पाटील, प्रकल्प संचालक नितीन थाडे, सरपंच निखिल झगडे, आदेश जमदाडे उपस्थित होते. 

Web Title: satara news pankaja munde anganwadi employee