कोयना धरण पाणीसाठा मजबूत स्थितीत

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 जुलै 2017

पाटण - कोयना धरण परिसरात मॉन्सूनच्या पावसाने दमदार हजेरी लावल्याने २५ दिवसांत पाणीपातळी ६९ फुटाने वाढली असून, पाणीसाठ्यात ४५ टीएमसी पाण्याची आवक झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत पावणे अकरा टीएमसी जादा पाणीसाठा झाल्याने कोयना धरणाचा पाणीसाठा मजबूत स्थितीत पोचला आहे. त्यामुळे महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी सिंचन व वीजनिर्मितीस पुन्हा सज्ज असल्याचे सिद्ध झाले आहे.

पाटण - कोयना धरण परिसरात मॉन्सूनच्या पावसाने दमदार हजेरी लावल्याने २५ दिवसांत पाणीपातळी ६९ फुटाने वाढली असून, पाणीसाठ्यात ४५ टीएमसी पाण्याची आवक झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत पावणे अकरा टीएमसी जादा पाणीसाठा झाल्याने कोयना धरणाचा पाणीसाठा मजबूत स्थितीत पोचला आहे. त्यामुळे महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी सिंचन व वीजनिर्मितीस पुन्हा सज्ज असल्याचे सिद्ध झाले आहे.

गेल्या वर्षी धरण पूर्ण क्षमतेने भरलेले असतानाही २६ एप्रिलला वीज निर्मितीचा पाणी कोटा संपल्याने चौथा टप्पा बंद करण्यात आला होता. त्या वेळी धरणात २९.१९ टीएमसी पाणीसाठा होता. एक जून ते ३१ मे या अहवाल वर्षात वीजनिर्मितीसाठी ६६.१० टीएमसी व सिंचनासाठी ३२.१८ टीएमसी पाण्याचा वापर करण्यात आला होता. त्याचबरोबर कर्नाटकला दुष्काळात मदत म्हणून ३.१८ टीएमसी पाणी दिले होते.

जूनच्या पहिल्या आठवड्याचा अपवाद सोडला, तर मॉन्सूनच्या पावसाने २६ जूनपर्यंत दडी मारली होती. २६ जूनला दमदार पावसास सुरवात झाली त्या वेळी कोयना धरणात १९.४३ टीएमसी पाणीसाठा होता. २६ जून ते सात जुलै या ११ दिवसांत पडलेल्या दमदार पावसाने कोयना धरणात १७.५१ टीएमसी पाण्याची आवक झाली व पाणीपातळी ३५ फुटाने वाढली होती. त्यानंतर मात्र सात दिवस पावसाने पुन्हा उघडीप घेतल्याने पाणीसाठ्याचा वेग मंदावला होता. या कालावधीत फक्त ३.६९ टीएमसी पाणी धरणात आले होते. १४ जुलै रोजी पुन्हा दमदार पावसास सुरवात झाली व १८ जुलैपासून झालेल्या मुसळधार पावसाने धरणाने अर्धशतक पूर्ण केले. १४ जुलै ते २१ जुलै या सात दिवसांत विक्रमी पाऊस झाल्याने धरणाच्या पाणीपातळीत २८ फुटाने वाढ होताना २३.९९ टीएमसीने पाणीसाठ्यात भर पडली. २६ जून ते २१ जुलै या कालावधीत पाणीपातळीत ६९ फुटाने वाढ झाली असून, ४५.१९ टीएमसी पाण्याची आवक झाली आहे. गेल्या वर्षी या दिवशी कोयना धरणात ५३.८३ टीएमसी पाणीसाठा व २१११.०७ फूट पाणीपातळी होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत पाणीपातळी जास्त असून, १०.७९ टीएमसी पाणीसाठा जास्त असल्यामुळे या वर्षी गेल्या वर्षीच्या तुलनेत कोयना धरण मजबूत स्थितीत असल्याचे सिद्ध होते. 

वीज व सिंचनाचा मार्ग सुकर
मॉन्सूनच्या पावसाने दमदार हजेरी लावल्याने कोयना धरणाची आजची स्थिती पाहता वर्षभरासाठी लागणारी वीज व सिंचनासाठीचे पाणी पुढील काळात पावसामुळे उपलब्ध होईल, यामध्ये कोणतीही शंका नाही.

Web Title: satara news patan koyna dam water