रुग्ण, कर्मचाऱ्यांच्या घशाला कोरड

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 मार्च 2018

व्हॉल्व्ह खराब झाल्यामुळे पाणीपुरवठा होत नाही. तो तातडीने बदलण्यासाठी जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी पाहणी केली. पुढील मंगळवारी काम करून देण्याचे आश्‍वासन त्यांनी दिले आहे. तोपर्यंत टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येईल.
- डॉ. श्रीकांत भोई, जिल्हा शल्यचिकित्सक

सातारा - जिल्हा रुग्णालयातील पाण्याच्या कमतरतेमुळे सर्वसामान्य रुग्णांचे हाल होत आहेत. त्यातच आता रुग्णांची सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. गेल्या वीस दिवसांत यावर तोडगा न निघाल्याने वैतागलेल्या कर्मचाऱ्यांनी आज जिल्हा शल्यचिकित्सकांच्या दालनासमोर ठिय्या मारला.

जिल्हा रुग्णालयामध्ये गेल्या काही महिन्यांपासून अधूनमधून पाण्याची ओरड होत आहे. त्यामुळे स्वच्छतेबरोबर रुग्णांच्या पिण्याच्या पाण्याचाही प्रश्‍न निर्माण होत आहे. त्यातच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था अपुरी पडत आहे. रुग्णांच्या पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी, यासाठी जिल्हा रुग्णालयातील वॉर्डमध्ये वॉटर कुलर बसविलेले होते. मात्र, सध्या तेही बंद आहेत. त्यामुळे दररोज रात्री पाण्यासाठी इकडे-तिकडे भटकणारे रुग्णांचे नातेवाईक जिल्हा रुग्णालयात दिसत आहेत. याबाबत रुग्णालय व्यवस्थापनाकडून तोडगा निघालेला नाही. रुग्णालयाची ही अवस्था असताना रुग्णांची सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही पुरेसा पाणीसाठा उपलब्ध होत नाही. त्यामुळे त्यांना पाण्यासाठी आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या परिसरातच कर्मचाऱ्यांची शासकीय निवासस्थाने आहेत. या निवासस्थानांना गेल्या २० दिवसांपासून पाणीपुरवठा होत नाही. याबाबत कर्मचाऱ्यांनी अनेकदा रुग्णालय व्यवस्थापनाकडे तक्रार केली. मात्र, पाण्याची उपलब्धता करण्यात आली नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांना वर्गणी काढून खर्चाच्या पाण्यासाठी टॅंकर मागवावा लागत आहे. तसेच पिण्याच्या पाण्यासाठी जार विकत आणले जात आहेत. गेले २० दिवस पाणी टंचाईचा सामना करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा संयमाचा बांध आज फुटला. अनेकदा तक्रारी करूनही तोडगा न निघाल्यामुळे कर्मचाऱ्यांनी आज जिल्हा शल्यचिकित्सकांच्या दालनासमोर जिल्हाध्यक्ष सुरेखा चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सहकुटुंब ठिय्या मारून पाणी प्रश्‍न सोडविण्याची मागणी केली.

Web Title: satara news patient employee agitation