पर्यायी रस्ते अडथळेमुक्त करणार 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 एप्रिल 2018

पोवई नाक्‍यावरील कोंडी फुटणार; "सकाळ' कार्यालयात संबंधित विभागांच्या प्रतिनिधींची ग्वाही, नागरिकांना स्वयंशिस्तीचे आवाहन 

कोंडीमुक्त साताऱ्यासाठी पोवई नाक्‍याला जोडणाऱ्या आठ रस्त्यांना पर्यायी रस्ते अडथळेमुक्त करण्याची ग्वाही "सकाळ' कार्यालयात आज झालेल्या बैठकीत सर्व संबंधित विभागांच्या प्रतिनिधींनी दिली. शहराच्या विकासाच्या दृष्टीने ग्रेड सेपरेटरचे काम महत्त्वाचे असून त्यासाठी नागरिकांनी स्वयंशिस्त पाळून सहकार्य करावे, असे आवाहनही प्रशासनाच्या वतीने करण्यात आले. पोवई नाक्‍यावर जाताना शक्‍यतो दुचाकींचा वापर करावा. निर्धारित वेळेपेक्षा 15 मिनिटे लवकर निघावे, अशा सूचनाही यावेळी चर्चेतून पुढे आल्या. 

पोवई नाक्‍यावरील ग्रेड सेपरेटरच्या कामामुळे पर्यायी रस्त्यांवर रहदारीचा मोठा ताण आला असून त्यामुळे सातारकरांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. याबाबत "सकाळ'ने आज सचित्र वृत्त प्रसिद्ध करून नागरिकांना येणाऱ्या अडचणींवर प्रकाश टाकला. या पार्श्‍वभूमीवर निर्माण झालेली प्रश्‍नांची कोंडी फोडण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, सातारा नगरपालिका, पोलिस विभाग, व्यापारी व नागरिकांच्या प्रतिनिधींना निमंत्रित करण्यात आले होते. यावेळी चर्चेतून पुढे आलेले मुद्दे... 

प्रत्येक रस्त्याला पर्यायी मार्ग 
सुरेश घाडगे (सहायक निरीक्षक, शहर वाहतूक शाखा) : पोवई नाक्‍याला मिळणाऱ्या प्रत्येक रस्त्यावरील वाहतूक तीन पर्यायी मार्गाने वळविण्याची काळजी घेण्यात आली आहे. या मार्गावर वाहनचालक त्यांच्या सोईच्या रस्त्याने जातील. त्यामुळे एकाच रस्त्यावर होणारी संभाव्य कोंडी टाळण्याचा आमचा प्रयत्न आहे. वाहतूक नियंत्रणासाठी सर्व पर्यायी मार्गावर कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. वाहनचालकांनी स्वयंशिस्त पाळणे गरजेचे आहे. 

पर्यायी रस्ते एकेरी करावेत 
माधवी कदम (नगराध्यक्षा, सातारा) :
महाराजा सयाजीराव विद्यालयासमोर लोखंडी पादचारी पूल मंजूर असून ग्रेड सेपरेटरच्या कामानंतर पूल उभारणी सुरू होईल. पोवई नाक्‍यावर पर्यायी रस्ते अरुंद आहेत. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी हे रस्ते एकेरी करावेत. वाहतूक सुरळीत होण्याच्यादृष्टीने रस्त्यातील अडथळे काढण्यात येतील. सार्वजनिक बांधकाम विभाग व पोलिसांना पालिकेचे आवश्‍यक सर्व सहकार्य राहील. 

 

मोकळ्या जागांवर पार्किंग करा 
श्रीकांत आंबेकर (सभापती व नगरसेवक, पोवई नाका परिसर) :
राजपथावर रयत शिक्षण संस्थेसमोर "रयत'चे खेळाचे मैदान आहे. कर्मवीर रस्त्याला टिळक मेमोरियल चर्च, सिव्हिल हॉस्पिटल रस्त्याला सेंट पॉल स्कूल, सभापती निवास या ठिकाणी मोकळ्या जागा आहेत. संबंधितांच्या सहकार्याने या जागा पार्किंगसाठी वापरात आणाव्यात. यापैकी सोईच्या ठिकाणी नागरिकांनी वाहन उभे करूनच मग पोवई नाका परिसरात चालत जावे. 

पालिका-पोलिसांनी समन्वय साधावा 
राजेंद्र चोरगे (संस्थापक, बालाजी ट्रस्ट, सातारा) :
बस स्थानक परिसरातील खंडोबाचा माळ, तसेच अन्य खुल्या जागांवर तात्पूर्ती पार्किंग व्यवस्था केल्यास रस्त्यांवरील पार्किंगचा भार कमी होईल. त्यामुळे हे रस्ते रहदारीसाठी अधिक वापरता येतील. या कामी नगरपालिका व पोलिस यांनी समन्वयाने काम करावे. ग्रेड सेपरेटरच्या कामामुळे पोवई नाक्‍यावरील वाहतुकीचा मोठा ताण कमी होणार आहे. विकासाच्या कामासाठी प्रशासनाला नागरिकांचे सहकार्यही तितकेच महत्त्वाचे आहे. 

रस्त्यावरील मंडई हटवावी 
फारुख खान (सहायक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, सातारा) ः
पोलिस, पालिकेमध्ये समन्वय ठेवत ग्रेड सेपरेटरचे काम सुरू आहे. आशिया खंडात केवळ मुंबई आणि सातारा येथेच अशा प्रकारचे वाहतुकीचे मार्ग आहेत. भविष्यातील वाहतुकीचा विचार करून या कामाचे नियोजन केले आहे. सकाळी सहापासून रात्री 11 पर्यंत काम सुरू आहे. हे काम लवकर मार्गी लागण्यासाठी नागरिकांचे सहकार्य आवश्‍यक आहे. तहसील कार्यालयासमोर रस्त्यावर मंडई बसते. नगरपालिका, पोलिसांनी ते थांबवावे. 

अंतर्गत रस्त्यांवर रिक्षा थांबे करा 
मधुकर शेंबडे (वाहतूक मित्र, सातारा) ः
विकासकामे लवकर व्हावीत, यासाठी जनतेचे सहकार्य आवश्‍यक आहे. प्रत्येकाने स्वयंशिस्तीने वाहने चालविल्यास अडथळे कमी होतील. पालिका, पोलिसांनी सर्वत्र रस्त्यांची, ठिकाणांची माहिती देणारे फलक लावावेत. दहा तासांपेक्षा जास्त काळ एकाच जागेवर वाहने लावल्यास दंड आकारावा. अंतर्गत रस्त्यावर रस्त्यावरील रिक्षा थांबे करावेत. शाळा, महाविद्यालयांनी महिन्यातून एक दिवस नो व्हेईकल डे पाळावा. शहरात झालेली अतिक्रमणे काढावीत. 

कास रस्त्याकडे जाणारी पर्यटकांची वाहतूक जास्त असते. फुलांच्या हंगामात पर्यटनाला अडथळा होऊ नये, यासाठी जूनपर्यंत पोवई नाका ते लॉ कॉलेजपर्यंतचे काम पूर्ण केले जाणार आहे. त्यानंतर बस स्थानकाकडील रस्त्याचे काम हाती घेतले जाईल. काम सुरू असताना तेथून वाहतूक करताना नागरिकांनी शिस्तीने प्रवास करावा. दोन वर्षांच्या आत हे काम पूर्ण करण्यासाठी कंपनी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. 
- एम. एन. खान (प्रोजेक्‍ट मॅनेजर, टी ऍण्ड टी कंपनी) 

नगरपालिकेने पार्किंगची सुविधा द्यावी 
नागरिकांनी चारचाकींऐवजी दुचाकी वाहनांचा अधिक वापर करावा. टिळक मेमोरियल चर्च येथे नगरपालिकेने पार्किंगचे आरक्षण टाकले आहे. याठिकाणी लवकरात लवकर पार्किंगची सुविधा उपलब्ध झाल्यास नागरिकांना वाहने पार्किंग करून नजीकच्या बॅंका, शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालयांतील कामकाजास ये-जा करणे सोपे होईल. रस्त्याचे खोदकाम करताना जलवाहिनी, दूरध्वनी केबल्सची संबंधित यंत्रणेने काळजी घ्यावी. 
- विक्रांत राठी, विजय येवले, अनिल राजपाल, रियाज मुल्ला, अंकुश साळुंखे, पोवई नाका व्यापारी संघ, सातारा 

Web Title: satara news Pawai naka traffic issue