फलटण, खंडाळ्यात भूसंपादनाने खळबळ

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 जानेवारी 2018

सातारा - मोहोळ ते आळंदी या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरण, बायपास व सहापदरीकरणासाठी जमीन संपादनासाठी अधिसूचना आज वृत्तपत्रातून जाहीर झाली. त्यामुळे फलटण व खंडाळा तालुक्‍यांतील शेतकऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. कालवे, रेल्वे, औद्योगिक वसाहत व रस्त्यांसाठीच्या जमीन संपादनाने पिचलेल्या शेतकऱ्यांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. त्याचा आगामी काळात प्रशासनाला सामना करावा लागणार आहे.

सातारा - मोहोळ ते आळंदी या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरण, बायपास व सहापदरीकरणासाठी जमीन संपादनासाठी अधिसूचना आज वृत्तपत्रातून जाहीर झाली. त्यामुळे फलटण व खंडाळा तालुक्‍यांतील शेतकऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. कालवे, रेल्वे, औद्योगिक वसाहत व रस्त्यांसाठीच्या जमीन संपादनाने पिचलेल्या शेतकऱ्यांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. त्याचा आगामी काळात प्रशासनाला सामना करावा लागणार आहे.

मोहोळ ते आळंदी या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरी व सहापदरीकरणासाठी जमीन संपादनाची अधिसूचना आज जाहीर करण्यात आली आहे. या महामार्गावर फलटणजवळ बायपासही करण्यात येणार आहे. महामार्गाचा किलोमीटर ११७ ते १७६ एवढा रस्ता सातारा जिल्ह्यातून जात आहे. राजुरी ते बाळूपाटलाची वाडीपर्यंतचा हा रस्ता आहे. त्यामध्ये फलटण तालुक्‍यातील राजुरी, बरड, निंबळक, पिंपरद, विडणी, कोळकी, धुळदेव, सस्तेवाडी, चौधरवाडी, फरांदवाडी, वडजल, काशीदवाडी, निंभोरे, सुरवडी, खराडी, तडवळ, काळज, तरडगाव, कापडगाव, कोरेगाव तर, खंडाळा तालुक्‍यातील लोणंद व बाळूपाटलाचीवाडी या गावांतील जमीन संपादित केली जाणार आहे.

संपादित केल्या जाणाऱ्या जमिनीच्या मालकांना जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील भूसंपादन अधिकारी क्रमांक १६ यांच्याकडे २१ दिवसांत आक्षेप व तक्रारी करण्याचे आवाहन अधिसूचनेमध्ये करण्यात आले आहे. त्याचबरोबर या अधिसूचनेमध्ये असलेल्या जमिनीचे मोजणी नकाशे व इतर माहिती वरील कार्यालयात पाहण्यास उपलब्ध असल्याचेही या अधिसूचनेत म्हटले आहे. आज सकाळी या अधिसूचनेची माहिती मिळाल्यानंतर संबंधित परिसरातील शेतकऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. 

फलटण व खंडाळा तालुक्‍यांमध्ये यापूर्वी कालवे, औद्योगिक वसाहत, रेल्वे त्याचबरोबर महामार्गासाठी जमिनी संपादित केलेल्या आहेत. काही शेतकऱ्यांच्या यापूर्वीच दोन-चार एकर जमिनी संपादनाच्या नावाखाली काढून घेतल्या गेल्या आहेत. आता संपादनाचा आणखी बडगा आल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. आज सकाळपासून नेमका कसा व कोठून रस्ता जाणार, कोणाची किती जमीन जाणार, याची चर्चा परिसरात सुरू होती. मोबदला किंवा पुनर्वसन कशा पद्धतीने होणार, याचीही चर्चा आहे. त्यामध्ये फलटणमध्ये प्रस्तावित बायपासमध्ये अनेक शेतकऱ्यांच्या जास्त जमिनी जाण्याची शक्‍यता आहे. रेल्वेत गेलेली जमीन, रिंगरोडचा सर्व्हे यामुळे आधीच हे शेतकरी चिंतेत होते. त्यामुळे एकंदरच सर्वच शेतकऱ्यांमध्ये नाराजीची भावना आहे. शेतकऱ्यांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यामुळे आगामी काळात प्रशासनाला शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागण्याची शक्‍यता आहे.

अद्याप नकाशा उपलब्ध नाही
अधिसूचनेमध्ये नकाशा पाहण्यासाठी उपलब्ध असल्याचे म्हटले आहे. त्यानुसार संबंधित रस्त्यामध्ये संपादित होणाऱ्या जमिनीच्या नकाशाबाबत भूसंपादन कार्यालयात चौकशी करण्यात आली. मात्र, अद्याप नकाशा उपलब्ध नसल्याचे तेथील कर्मचाऱ्यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. दरम्यान, याबाबतची माहिती सोमवारी देण्यात येईल, असे भूसंपादन उपजिल्हाधिकारी मंजूषा मिसकर यांनी सांगितले.

Web Title: satara news phaltan khandala Land Acquisition issue