फलटणला ‘अजेंड्या’वरील योजनांना गतीची गरज

व्यंकटेश देशपांडे 
रविवार, 9 जुलै 2017

फलटण - शहर आंतरराष्ट्रीय कीर्तीवर पोचविण्यासाठी विधान परिषद सभापती रामराजे नाईक- निंबाळकर यांचे प्रयत्न मनापासून आहेत. तद्वत फलटणचे ‘स्मार्ट सिटी’त रूपांतर होण्यासाठी त्यांच्या कल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी राज्य शासनाच्या योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी फलटण पालिकेच्या ‘अजेंड्या’वर असलेल्या विविध योजनांना गतिमान करण्याची आवश्‍यकता आहे. 

फलटण - शहर आंतरराष्ट्रीय कीर्तीवर पोचविण्यासाठी विधान परिषद सभापती रामराजे नाईक- निंबाळकर यांचे प्रयत्न मनापासून आहेत. तद्वत फलटणचे ‘स्मार्ट सिटी’त रूपांतर होण्यासाठी त्यांच्या कल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी राज्य शासनाच्या योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी फलटण पालिकेच्या ‘अजेंड्या’वर असलेल्या विविध योजनांना गतिमान करण्याची आवश्‍यकता आहे. 

फलटण शहर आज चारही दिशाने वाढत असून, वाढत्या नागरीकरणामुळे  पालिकेच्या व्यवस्थेवर ताण आला असल्याचे दिसून येते आहे. तथापि आज शहराला पाणीपुरवठा योग्य प्रकारे होत आहे. किंबहुना नीरा उजवा कालव्यावर अवलंबून असणारी शहराची पाणीपुरवठा योजना ऐन दुष्काळातही शहराला ६० दिवस पाणी पुरवेल, अशा प्रकारच्या नियोजनातूनच ४२ कोट रुपये खर्चाची पाचव्या टप्प्याची योजना राबविल्याचे चित्र आहे. शहरातील काही रस्ते रुंद झाले आहेत; पण रस्त्यांच्या दुतर्फा फळवाले, अन्य फेरीवाले आणि वाहनांच्या पार्किंगमुळे रस्ते अरुंद दिसू लागलेले आहेत. अशा स्थितीत शहरात पार्किंग झोन उभारण्याबाबत झालेली चर्चा केवळ कागदावरच न राहता त्याची अंमलबजावणी कधी होणार, अशा प्रतीक्षेत नागरिक आहेत. 

शहराची वाटचाल ‘स्मार्ट दिशे’ने होत असताना भुयारी गटार योजनेसाठी शासनाकडून ११८ कोटी रुपये टप्प्याटप्प्याने उपलब्ध होणार आहेत. त्याची कार्यवाही सध्या सुरू असली, तरी ती अधिक गतिमान होणे आवश्‍यक आहे. बऱ्याच ठिकाणी गटार योजनेला योग्य प्रकारचा उतार दिला नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे पाण्याचे वहन पूर्ण क्षमतेने होणार नाही. शहरातील संपूर्ण सांडपाणी बाणगंगा नदीमध्ये आणि खडक हिऱ्याच्या ओढ्याजवळ अशा दोन ठिकाणी एकत्र करून त्याचे ‘रिसायकलिंग’ करण्यात येणार असून, त्याचा पुर्नवापर करण्याच्या दृष्टीने योजना आलेली आहे; पण बऱ्याच ठिकाणी शहरातील ओढ्यांना पालिकेच्या हद्दीबाहेरचे गृहप्रकल्प जोडले गेले आहेत. त्यांचे काय करायचे याबाबत मतमतांतरे आहेत; पण काही झाले तरी आगामी तीन वर्षांत शहरातील बंदिस्त गटार योजना पूर्ण क्षमतेने कार्यरत होऊन पाण्याचा पुनर्वापर करण्यात येणार आहे. एकूण ही बाब शहराच्या सार्वजनिक आरोग्यासाठी अत्यंत लाभदायी असली, तरी ती गतिमान होण्यासाठी पालिका प्रशासनाने पावले उचलणे आवश्‍यक आहे. 

विकासात्मक शहर म्हणून फलटणचा उल्लेख होतो आहे. आगामी काळात रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या विजेच्या खांबांवरून गेलेल्या वीज वाहिन्या ‘अंडरग्राउंड’ करण्याचे नियोजन झाले आहे. केवळ नियोजनच नव्हे तर त्यासाठीही राज्य शासनाकडून रामराजे नाईक- निंबाळकर यांच्या माध्यमातून निधीही उपलब्ध झालेला आहे. अशा स्थितीत ही योजना गतिमान करण्यासाठी काय करता येईल याचे नियोजन पालिका प्रशासनाने करण्याची आवश्‍यकता आहे. सध्या त्याबाबतचा सर्व्हे सुरू आहे, अशी चर्चा आहे. शहरातील सर्व वीज वाहिन्या जमिनीखालून गेल्या तर तुटलेल्या विजेच्या तारा, पडणारे विजेचे खांब यापासूनचे धोके टळतील यात शंका नाही. 

सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने शहराची लोकसंख्या आणि दैनंदिन कामासाठी बाहेरून शहरात येणारे पुरुष, महिलांची संख्या पाहाता शहरात महिलांसाठी स्वच्छतागृहे नाहीत. सध्य स्थितीमध्ये असलेल्या स्वच्छतागृहांची दुरवस्था आहे. या बाबी शहराच्या आरोग्याच्या दृष्टीने भूषणावह नाहीत. शहरात महिलांसाठी योग्य संख्यात्मक प्रमाणात स्वच्छतागृह बांधण्याच्या दृष्टीने यापूर्वीच्याही पालिकेच्या मंडळाने निर्णय घेतलेला होता; परंतु त्याची अंमलबजावणी होताना दिसली नाही. अशा स्थितीत ती बाब प्रकर्षाने पूर्ण करण्यासाठी सद्यःस्थितीमधील पालिका प्रशासनाने त्वरित हलचाल करणे गरजेचे आहे.

शहरात २० हजार वृक्ष लागवडीचे नियोजन
शहरात २० हजार वृक्षांची लागवण करण्याच्या दृष्टीने नियोजन झाले आहे. त्याची सुरवात मागील आठवड्यात झाली आहे. आगामी काळात निर्धारित संख्या पूर्ण होईल यात शंका नाही; परंतु आतापर्यंत कागदावर आलेली सर्व नियोजित कामे व उपलब्ध निधी याचा मेळ बसवून नियोजित कामे गतिमान करण्याची आवश्‍यकता आहे.

Web Title: satara news phaltan news