वाहतूक कोंडीने फलटणकर जिवावर उदार

संदीप कदम
सोमवार, 17 जुलै 2017

पालिका प्रशासनाने आक्रमक होण्याची गरज 
शहरातील रस्ते अतिक्रमणमुक्त करण्यासाठी पालिका प्रशासनाने आक्रमक होण्याची गरज असून, अंतर्गत मार्गाच्या सुशोभिकरणासह पादचाऱ्यांना स्वायत्ता देण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया नागरिकांमधून येत आहेत.

फलटण शहर - वाढत्या शहराबरोबर लोकसंख्येचा विचार करता शहरातील रस्त्यांचे नियोजन न झाल्यामुळे वाहतूक कोंडीसह अपघातांना आमंत्रण मिळत आहे. अस्ताव्यस्त पार्किंगला शिस्त लावण्यासाठी पोलिस प्रशासन व पालिकेच्या संयुक्त विद्यमाने केलेले नियोजन फोल ठरत असून, पादचाऱ्यांना आपला जीव मुठीत घेवून रस्त्याच्या मधोमध चालावे लागत आहे.

शहराचे प्रवेशद्वार समजल्या जाणारा नाना पाटील चौक अतिक्रमणाच्या विळख्यात अडकला असून, पालिकेकडून कोणताही ठोस निर्णय न घेतल्याने या चौकात नेहमीच वाहतुकीची कोंडी पाहावयास मिळते. अवजड वाहणे, लांब पल्ल्याच्या प्रवासी बस यांना याच ठिकाणावरून जावे लागत असून अपुऱ्या जागेमुळे अपघाताला सामोरे जावे लागत आहे. तर कॉलेजमधील विद्यार्थीं याच चौकातून एस. टी. स्टॅंडकडे जात असतात. त्यावेळीही चौकात भरपूर गर्दी असते. परिणामी अचानक होत असलेल्या कोंडीचे मृत्यूच्या सापळ्यात रूपांतर होत आहे. या नित्याच्या गोष्टी झाल्या असून, वाहतूक यंत्रणेलाही मागचे पाऊल घेण्यास भाग पडत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

शहराच्या अंतर्गत प्रमुख मार्गांमध्ये रिंगरोड, शिंगणापूर रोड ते आंबेडकर चौक, नाना पाटील चौक ते शिवाजी चौक, बारामती चौक ते मलठण, शिवाजी चौक ते कीर्ती स्तंभ, गजानन चौक, माळजाई रोड, जुना सातारारोड हे मार्ग नेहमी वर्दळीचे असतात. या मार्गांचा विचार केला असता माळजाईमार्ग वगळता कोणत्याच रोडला फुटपाथ नाही. शहरामधील रस्ते सकाळी साडेसहापासून ११ वाजेर्यंत गजबलेले असतात. यावेळेत शाळकरी मुले ते नोकरदार यांची धावपळ या रस्त्यांवरून पाहण्यास मिळते. तर शहरातील रिंगरोड व शिंगणापूर रोड, पुणे-पंढरपूर रोडवरून अवजड वाहनांची वाहतूक सुरू असते. यावेळी अंतर्गत रस्त्यांवरूनही शहरातील वाहतूक सुसाट असते. अपुरे रस्ते व पार्किंगसाठी प्रशासनाने रस्त्यांवर केलेल्या अतिक्रमणांमुळे या ठिकाणाहून पादचाऱ्यांना जाण्यास रस्ताच उरत नाही.

शहरवासीयांच्या माथी कायम विविध स्वरूपातून आर्थिक लूट करणाऱ्या प्रशासनाने नागरिकांना सुविधा देण्यावर भर देणे गरजेचे आहे. परंतु, याठिकाणी प्रशासकीय यंत्रणाच आपसात संगनमत करून आर्थिक फायद्यासाठी आपल्या कलाने नियमावली व शहरांतर्गत रचनेत बदल करताना दिसत आहे. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रासाचा सामना करावा लागत आहे. तर नागरिकांत असुरक्षिततेची भावना निर्माण होवू लागली आहे. 

Web Title: satara news phaltan traffic