सातारा : बस स्थानकासमोरील पदपथावर मांडव टाकून उभारण्यात आलेले हेच ते बेकायदा स्टॉल.
सातारा : बस स्थानकासमोरील पदपथावर मांडव टाकून उभारण्यात आलेले हेच ते बेकायदा स्टॉल.

जागा ‘पीडब्ल्यूडी’ची; भाडे घेतोय तिसराच !

साताऱ्यात बस स्थानकासमोर पदपथावर बेकायदा स्टॉलची उभारणी
दहा दिवसांसाठी प्रत्‍येकी चार ते पाच हजार रुपये भाडे

सातारा - व्यवसायासाठी कोणाला स्टॉल हवा का स्टॉल... बस स्थानकासारख्या मध्यवर्ती परिसरात... रोजचे ५०० रुपये भाडे; विजेपोटी १०० रुपये वेगळे..., कोणत्याही कारवाईपासून संरक्षणाची हमी...,

‘पीडब्ल्यूडी’ विचारणार नाही..., पोलिस पाहणार सुद्धा नाहीत..., अगदीच कोणी आलं तर आम्ही आहोतच! मंडळी, बस स्थानकासमोरील पदपथावर उभ्या असलेल्या राखी स्टॉलसाठी फुटलेला हा दर. जागा ‘पीडब्ल्यूडी’ची आणि दलाली घेऊन मिजास मारतोय तिसराच! 

साताऱ्यात गोलबागेजवळ, अजिंक्‍य गणपती मंदिराच्या दारात ‘मुंबई पोलिस ॲक्‍ट’ धाब्यावर बसवून झोपडपट्टीदादाने राखी स्टॉलसाठी केलेल्या अतिक्रमणाचा विषय गाजत असताना आता मुख्य बस स्थानकासमोर, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित असलेल्या रस्त्यांवरील बेकायदा स्टॉलची माहिती सुजान नागरिकांनी ‘सकाळ’च्या निदर्शनास आणून दिली. सर्वसामान्य माणूस रोजीरोटीसाठी व्यवसाय करत असतो. मात्र, काही मंडळी सर्वसामान्यांच्या टाळूवरील लोणी खाणारी असतात. या बेकायदा स्टॉलबाबतही तसाच काहीसा प्रकार झाला आहे. शिवाय पदपथावर मांडव आडवण्याचा प्रकार घडला आहे. 

खात्रीशीर सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राजकीय मंडळीत उठबस असलेल्या एका दलालाने बस स्थानकासमोरील मोक्‍याच्या जागेवर मांडव टाकून छोट्या- छोट्या आकाराचे स्टॉल भाड्याने दिले आहेत. दहा दिवसांसाठी चार ते पाच हजार रुपये भाडे आकारले जात आहे. याशिवाय स्टॉलवर विजेच्या वापरासाठी रोजचे १०० रुपये वेगळे आकारले जातात. ही वीज आली कोठून हा वेगळाच प्रश्‍न आहे. बस स्थानकासारख्या शहराच्या मोक्‍याच्या व गर्दीच्या ठिकाणी हे स्टॉल असल्याने विक्रेत्यांनी उड्या टाकून संबंधितांकडून स्टॉल पटकावले. मात्र, त्यासाठी संबंधित दलालाचा खिसा त्यांना गरम करावा लागला. 

सार्वजनिक बांधकाम विभागाने त्यांच्या अखत्यारीतील रस्त्यावर अशा स्टॉलला परवानगी कशी दिली? जागा वापर भाड्यापोटी सरकारी तिजोरीत किती पैसे जमा झाले? रस्त्यातील ही जागा भाडेतत्त्वावर देताना लिलाव काढण्यात आले होते का? असे अनेक प्रश्‍न या स्टॉलच्या निमित्ताने उपस्थित झाले. त्याची खातरजमा करण्यासाठी आमच्या प्रतिनिधीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. अशी कोणतीही जागा आम्ही भाड्याने दिलेली नाही, कधी देतही नाही. सार्वजनिक रस्त्यात व्यवसाय करू देण्याचा प्रश्‍नच नाही. हे स्टॉल बेकायदेशीर व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या परवानगीशिवाय उभारण्यात आले असल्याचे या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

पदपथावर मांडव टाकून तो अडवण्यात आला
संबंधित दलाल राजकीय क्षेत्राशी संबंधित 
जागा अडवून अप्रत्यक्षपणे खंडणी गोळा करण्याचा प्रकार 
‘सार्वजनिक बांधकाम’ व वाहतूक शाखेची परवानगी नाही
वीज कंपनीने स्टॉलला दिलेले कनेक्‍शन कोणाच्या नावे?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com