"प्लॅस्टिक' उच्चाटनासाठी नागरिकांनी कसली कंबर! 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 जून 2018

सातारा - प्लॅस्टिक बंदीचे स्वागत करत आज नागरिकांनी सोबतच्या पिशवीतून डबे बाहेर काढून "रविवार' साजरा केला. भाजी मंडई, मच्छी मार्केट एवढेच काय आज बहुतांश ठिकाणी घंटागाडीत कचरा टाकण्यासाठीही कॅरीबॅगऐवजी "डस्टबीन'चा वापर पाहायला मिळाला. स्वत:च्या आरोग्यासाठी "प्लॅस्टिक'ला आता घरातून बाहेर काढल्याचे समाधान आहे, अशा प्रतिक्रिया नागरिकांतून उमटल्या. 

सातारा - प्लॅस्टिक बंदीचे स्वागत करत आज नागरिकांनी सोबतच्या पिशवीतून डबे बाहेर काढून "रविवार' साजरा केला. भाजी मंडई, मच्छी मार्केट एवढेच काय आज बहुतांश ठिकाणी घंटागाडीत कचरा टाकण्यासाठीही कॅरीबॅगऐवजी "डस्टबीन'चा वापर पाहायला मिळाला. स्वत:च्या आरोग्यासाठी "प्लॅस्टिक'ला आता घरातून बाहेर काढल्याचे समाधान आहे, अशा प्रतिक्रिया नागरिकांतून उमटल्या. 

शासनाने कालपासून प्लॅस्टिक बंदीची अंमलबजावणी सुरू केल्यानंतर येथे आठ व्यावसायिकांना 40 हजार रुपये दंड झाला. धडक कारवाईमुळे व्यावसायिकांची धांदल उडाली. कॅरिबॅग नकोचा निरोप किरकोळ विक्रेत्यांकडून कानोपकानी शहरभर पसरला. त्यामुळे दुपारनंतर विक्रेत्यांनीच कॅरिबॅगविरोधात बंद पुकारले होते. कॅरिबॅग मिळत नसल्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत असली, तरी नागरिकांनी या निर्णयाचे मनापासून स्वागत केले. प्लॅस्टिक बंदीच्या अनुषंगाने "सकाळ'ने समाज मनाचा कानोसा घेतला. 

करंजे येथील रूपाली नाईक म्हणाल्या, ""प्लॅस्टिकच्या दुष्परिणामांची धग लोकांना जाणवू लागली आहे. शासनाने उचललेले पाऊल योग्यच आहे. प्लॅस्टिक वापराच्या सवयीमुळे आता आमची थोडी गैरसोय होणार असली, तरी प्लॅस्टिकला पर्याय आहेत. त्याचीही सवय होऊन  जाईल.'' 

येथील कार्यकर्ते रियाज तडसरकर यांनी प्लॅस्टिक वापराचे दुष्परिणाम सजीवांबरोबरच निसर्गावरही होत आहेत. त्यामुळे बंदी ही काळाची गरज असल्याचे सांगितले. ""शासनाने एका फटकाऱ्यात पाच हजार रुपये दंड, अशी टोकाची भूमिका घेण्याऐवजी टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी केली असती तर व्यापारी- व्यावसायिक- नागरिकांना पुरेसा वेळ मिळाला असता. प्रबोधनातून हे साधता आले असते आणि मग बंदी आदेश व दंडाची अंमलबजावणी करायला हवी होती. नागरिकांकडे आज मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक आहे. ते गोळा करण्यासाठी पालिकेने शहरा कलेक्‍शन सेंटर उघडावीत, अशी मागणी श्री. तडसरकर यांनी केली. 

तनिष्का गटाच्या सदस्या प्रिया विभूते म्हणाल्या, ""यापूर्वीही आपण लोक प्लॅस्टिकशिवाय जगू शकत होतो. आपण फारस आळशी व सवयीचे गुलाम झालो. बंदीच्या निमित्ताने शासनाने आपल्याला सुधारण्याची, चांगल्या सवयी लावून घेण्याची संधी दिली आहे. आपल्या पिढीने प्लॅस्टिकचा भस्मासूर व त्याचे दुष्परिणाम पाहिले. किमान पुढील पिढी निरोगी पाहण्यासाठी आपल्याला प्लॅस्टिकला गुडबाय म्हणावे लागेल.'' 

शासनाने कुरकुरे, चिप्स आदी खाद्यपदार्थांच्या प्लॅस्टिक वेस्टनावर बंदी घालायला हवी होती. कारण कास- महाबळेश्‍वर- ठोसघर अशा निसर्गपर्यटनस्थळी कचऱ्याच्या ढिगांमध्ये याच कागदाचा कचरा अधिक असतो, अशी प्रतिक्रिया विलासपूरमध्ये राहणाऱ्या  गृहिणी उत्कर्षा कुलकर्णी यांनी व्यक्त केली. 

सोनगाव (ता. सातारा) येथील महिंद्रकुमार मुळीक म्हणाले, ""प्लॅस्टिक बंदीची काटेकोर अंमलबजावणी करायला हवी. कारण हा निर्णय शासनाच्या हिताचा म्हणून नव्हे तर लोकांच्या हिताचा आहे.'' 

सोशल मीडियावर चुटकुले... 

सोशल मीडियावर कालचा दिवस प्लॅस्टिक बंदीवरील चुटकुल्यांचा होता. प्लॅस्टिक बंदी करताना शासनाने "फ्लेक्‍स'ला का सोडले, असा प्रश्‍न सोशल मीडियावर गंभीरपणे विचारला जात होता. शासनाने फ्लेक्‍सवर बंदी घातली असती, तर रोज रोज बघाव्या लागणाऱ्या नको त्या चेहऱ्यांपासून सुटका तरी झाली असती, अशी टिपणी केली गेली. 

Web Title: satara news plastic ban