डोंगरी ३६ गावांत वर्षापूर्वीच प्लॅस्टिकबंदी

डोंगरी ३६ गावांत वर्षापूर्वीच प्लॅस्टिकबंदी

सातारा - सरकारी प्लॅस्टिक बंदी आता झाली असली, तरी ते प्लॅस्टिकच्या दुष्परिणामांबाबत यापूर्वीपासूनच जागरूक आहेत. घरात निर्माण होणारा प्लॅस्टिक   कचरा कोणीही बाहेर जाऊ देत नाहीत. शाळकरी मुलांनी, बायाबापड्यांनी साठवलेले प्लॅस्टिक ‘रिसायकल’साठी पाठवले जाते. वर्षभरात सुमारे एक हजार किलो प्लॅस्टिक व त्यामुळे पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम टाळण्यात यश आले आहे. 

चाळकेवाडी पठार व त्या टापूतील ३६ गावांत पर्यावरणाशी सुसंगत दिनचर्या ठेवत ग्रामस्थांनी स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने ही प्लॅस्टिकविरोधी चळवळ यशस्वी चालवली आहे. 

घरातच साठवतात प्लॅस्टिक 
पवन उर्जा प्रकल्प क्षेत्रात प्रसिद्ध ‘सुझलॉन’च्या सुझलॉन फाउंडेशनच्या सहकार्याने साताऱ्यातील आधार सामाजिक संस्था समन्वयाचे काम करते. ठोसेघर, चाळकेवाडी परिसरातील डोंगरी गावांत ‘आधार’चे काम आहे. वर्षभरापूर्वी सुझलॉन फाउंडेशनने ‘या गावांमध्ये काय बदल करून दाखवाल’ असा सवाल ‘आधार’ला केला आणि येथेच या प्लॅस्टिक मुक्तीची बिजे रुजली. लोकांनी आपल्या घरात निर्माण होणारा प्लॅस्टिक कचरा घराबाहेर टाकायचा नाही. तो घरातच साठवला जातो. शालेय विद्यार्थीही या उपक्रमात हिरिरीने सहभागी आहेत. 

प्लॅस्टिकच्या बदल्यात उपकरणे
गोळा झालेले प्लॅस्टिक नेण्यासाठी ‘आधार’चा प्रतिनिधी गावागावांत जातो. गोळा झालेले प्लॅस्टिक दर सहा महिन्यांनी प्रक्रियेसाठी जेजुरी औद्योगिक वसाहतीत रुद्र एन्वायरमेंटल सोल्युशन लिमिटेड या कंपनीत पाठवले जाते. तेथे या प्लॅस्टिकवर प्रक्रिया करून तेल तयार केले जाते. हे तेल इंधन म्हणून बॉयलर पेटविण्यासाठी उपयोगी ठरते. या बदल्यात ‘आधार’ संस्थेने शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक उपकरणे, खेळणी, गोष्टीची पुस्तके, बुद्धिबळ प्रशिक्षण आदी साहित्य उपलब्ध करून देऊन विद्यार्थ्यांच्या शाश्‍वत विकासासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. 

वर्षात ३५० किलो ‘कार्बन’ची बचत 
‘आधार’ संस्थेने गेल्या वर्षभरात ३०० व ७५० असे एक हजार ५० किलो प्लॅस्टिक गोळा करून पुनर्प्रक्रियेसाठी पाठवले आहे. तज्ज्ञांच्या अहवालानुसार हे प्लॅस्टिक ग्रामस्थांनी बंब, चूल अथवा कचऱ्यात जाळले असते तर त्यातून सुमारे ३५० किलो कार्बन डायऑक्‍साईड वातावरणात मिसळले असते. तेवढे प्रदूषण टाळण्यात यश आले आहे. 

...याठिकाणी चालतो उपक्रम
सातारा तालुक्‍यातील ठोसेघर, चिखली, चाळकेवाडी, बामणेवाडी, रेवंडे, पवारवाडी, पाडेकरवाडी, मोरेवाडी, जांभेकरवाडी, घाटेवाडी, डफळवाडी, निनाईसडा, कळकीसडा, सडादुसरे, सडादाढोली, सडावाघापूर, बोडकेसडा, तसेच पाटण तालुक्‍यातील जोगेटेक, हुबरणे, वनकुसवडे, गोठणे, आटोली, पाचगणी, आंबेघर, काहीर, रामेल, मरड, मराठवाडी, भिकाडी, अवसरी, बागलेवाडी, काठीटेक, केंजळवाडी, जांभळेकरवाडी, डफळवाडी, भोकरवाडी या गावांत प्लॅस्टिक मुक्तीचा उपक्रम चालतो. 

घरातून प्लॅस्टिक बाहेर जाऊ द्यायचे नाही, हे या प्लॅस्टिकमुक्तीचे सूत्र आहे. लोकांना सवय लागेपर्यंत वाट पाहावी लागली; परंतु छोटी-छोटी मुलं आनंदाने या उपक्रमात सहभागी झाली. ते पाहून मोठ्यांचाही हुरूप वाढला. ग्रामस्थांना प्लॅस्टिक मुक्तीचे महत्त्व पटल्याने आमचं काम सोपं झालंय.
- सचिन कांबळे, प्रकल्प समन्वयक, आधार सामाजिक संस्था

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com