उपद्रवींच्या बंदोबस्तासाठी कासला पोलिस चौकी

शैलेन्द्र पाटील
सोमवार, 22 जानेवारी 2018

सातारा - 'सकाळ'च्या पुढाकाराने लोकसहभागातून हाती घेतलेल्या कास स्वच्छता मोहिमेला आज शेकडो सातारकरांच्या साक्षीने सुरवात झाली. उपद्रवी लोकांच्या बंदोबस्तासाठी कासच्या डाक बंगल्यात आता पोलिस नेमण्यात येतील. जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी "जागेचा प्रश्‍न सुटत असेल तर चौकीस मंजुरी घेऊन तत्काळ कर्मचारी नेमण्यात येतील,' अशी ग्वाही दिली. नगराध्यक्षा माधवी कदम यांनी या नियोजित पोलिस चौकीकरिता पायाभूत सुविधांची पूर्तता एक महिन्यात करण्याची हमी दिली.

प्रदूषणाच्या विळख्यात अडकत चाललेल्या कास तलाव परिसर स्वच्छतेची मोहीम "सकाळ'ने लोकसहभागातून हाती घेतली. त्याचा प्रारंभ आज विविध मान्यवरांच्या व शेकडो सातारकरांच्या साक्षीने झाला. या उपक्रमाच्या औपचारिक उद्‌घाटनावेळी विविध संघटना, संस्थांचे प्रतिनिधी, पर्यावरणवादी कार्यकर्त्यांनी कासच्या स्वच्छतेबरोबरच पर्यावरणास हानिकारक ठरणाऱ्या उपद्रवी लोकांचा बंदोबस्त व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. कासमध्ये स्वच्छता झाल्यानंतर पुन्हा येथे कचरा पडणार नाही, याकरिता कायमस्वरूपी योजना असावी. त्यामध्ये विविध शासकीय विभागांचा सहभाग असावा. ही योजना तयार करून अंमलबजावणी करण्यासाठी एखादी बहुसदस्यीय समिती असावी, आदी सूचना यावेळी पुढे आल्या. या सूचनांच्या अनुषंगाने संदीप पाटील बोलत होते. 'कास तलावाजवळ पोलिस चौकी करता येईल. त्यामुळे बामणोली व परिसरातील ग्रामस्थांनाही ते सोयीचे ठरणार आहे. जागेचा प्रश्‍न सुटत असेल तर चौकीस मंजुरी घेऊन तत्काळ कर्मचारी नेमण्यात येतील,' असे श्री. पाटील यांनी स्पष्ट केले. "सकाळ'ने हाती घेतलेला उपक्रम खरोखरच स्तुत्य आहे.

"सकाळ'सारख्या सशक्‍त माध्यमाने लोकसहभागाचे व व्यापक जनजागृतीचे काम हाती घेतले आहे. त्याचा फायदा समाजाला निश्‍चित होईल. तसेच ते पर्यावरण रक्षणासाठी साह्यभूत ठरेल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला. जिल्हा पोलिस दलाच्या वतीने महिन्यातून एक दिवस पोलिस कर्मचारी कासला श्रमदान करतील, अशी ग्वाही श्री. पाटील यांनी दिली.

नगराध्यक्षा माधवी कदम यांनी पोलिस चौकीकरिता पालिकेच्या मालकीच्या डाक बंगल्यातील दोन खोल्या उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविली. "तांत्रिक बाबींची पूर्तता करून महिनाभरात पोलिस चौकीसाठी पायाभूत सुविधा निर्माण करून देण्यात येतील. त्याचबरोबर कासमध्ये येणाऱ्या लोकांसाठी आवश्‍यक नियमावली करणे, त्याची अंमलबजावणी करणे, कास परिसर स्वच्छ व प्लॅस्टिकमुक्त राखणे याकरिता वन विभाग, नगरपालिका, पोलिस, स्थानिक ग्रामस्थांच्या सहभागातून सर्वसमावेशक योजना तयार करूया. त्यासाठी आवश्‍यक सहकार्य देण्याची पालिकेची तयारी असेल, अशी ग्वाहीही माधवी कदम यांनी दिली. "सकाळ'चे सहयोगी संपादक श्रीकांत कात्रे यांनी स्वागत करून मोहिमेबाबत भूमिका स्पष्ट केली. शाखा व्यवस्थापक राजेश निंबाळकर यांनी आभार मानले.

कास मोहिमेत सहभागासाठी आवाहन....
कास तलावाला कचऱ्याच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी "सकाळ'ने लोकसहभागातून स्वच्छतेची हाक दिली आहे. प्रत्येक रविवारी कासमध्ये सकाळी साडेसात ते साडेदहा या वेळेत श्रमदान चालेल. त्यात सहभागी होण्यासाठी समन्वयक शैलेन्द्र पाटील (मो. 9881133085) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: satara news police chowki in kas