मायणीत राजकीय डावपेचांना उधाण

मायणीत राजकीय डावपेचांना उधाण

मायणी - ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर व जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र गुदगे यांच्यात राजकीय डावपेचांची लढाई सुरू झाली आहे. माजी आमदार भाऊसाहेब गुदगे यांच्या पुतळा अनावरणाच्या निमित्ताने सुरेंद्र गुदगे यांनी आयोजित केलेल्या समारंभाला प्रत्युत्तर देण्यासाठी डॉ. येळगावकरांनी मूठ आवळली असून, लवकरच तोडीस तोड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याची चर्चा आहे. त्याची लोकांना उत्सुकता लागली आहे.   

ऑक्‍टोबर-नोव्हेंबरमध्ये येथील ग्रामपंचायत निवडणूक होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर राजकीय जुळवाजुळव सुरू झाली आहे. नेते व प्रमुख कार्यकर्ते एकमेकांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवत आहेत. डावांना प्रतिडाव टाकले जात आहेत. कोणत्याही स्थितीत पंचायतीत सत्ता बदल होऊ देणार नसल्याचा निर्धार गुदगे गटाने केला आहे. तर गत पंचवार्षिकला थोड्या फरकाने आलेले अपयश यंदा धुवून काढण्याचा चंग डॉ. येळगावकर गटाने बांधला आहे. निवडणूक तोंडावर आल्याने एकमेकांवर डाव-प्रतिडाव टाकण्यास सुरवात झाली आहे. सत्तेसाठीची गणिते मांडून ती सोडवण्यासाठी दोन्ही बाजूंनी यंत्रणा कामाला लागली आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी नाना संधी शोधल्या जात आहेत. एकमेकांवर आरोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. मार्गी लावलेल्या विविध विकासकामांच्या याद्या लोकांपर्यंत पोचवल्या जात आहेत. दोन्ही गटांच्या संबंधित वित्तीय संस्थांतील भ्रष्टाचाराची प्रकरणे शोधली जात आहेत. संस्थांची कायदेशीर चौकशी लावून शेरास सव्वाशेर असल्याचे सिद्ध करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. जिल्हा परिषद निवडणुकीनंतर थंडावलेल्या राजकीय कुरघोड्यांना आता पुन्हा ऊत येवू लागला आहे. त्यामुळेच कायदेशीर बाबींमध्ये अडकून राजकीय हालचाली करण्यास उसंत मिऴू नये, अशीही खबरदारी घेण्यात येत आहे. काही प्रमुख कार्यकर्त्यांनाही नामोहरण करण्याचा डाव खेळला जात असून, त्यांच्या बेकायदा कृत्याची काही प्रकरणेही राजकीय हेतूने चव्हाट्यावर आणली जात आहेत. एकूणच, येनकेन प्रकारेन परस्परांना जेरीस आणण्याचे नानाविध प्रयत्न सुरू झाले आहेत. तसेच, भव्य कार्यक्रमांचे आयोजन करून राजकीय ताकद दाखवण्याचा प्रयत्नही सुरू आहे. त्याचाच भाग म्हणून माजी आमदार (कै.) भाऊसाहेब गुदगे यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण, मायणी अर्बन बॅंकेच्या मुख्य शाखेच्या नूतन इमारतीचे उद्‌घाटन व माजी जिल्हा परिषद सदस्या शोभना गुदगे यांच्या म्युझिकल अल्बमचे प्रकाशन अशा एकत्रित कार्यक्रमाचे आयोजन सुरेंद्र गुदगे यांनी केले होते. दरम्यान, त्याच कार्यक्रमाबाबत चर्चा सुरू असताना आम्ही पण कमी नाही. डॉक्‍टरांनीही तोडीस तोड कार्यक्रमाचे नियोजन केले असून लवकरच त्याबाबत कळेल, अशा प्रतिक्रिया येळगावकर गटाचे कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत. टेंभूचे पाणी मायणी तलावात आणण्यासाठीच्या कामाचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. त्यासाठी शक्‍यतो मुख्यमंत्र्यांसह विविध मंत्री येथे आणण्यात येणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे डॉ. येळगावकर गटातर्फे होणाऱ्या नियोजित कार्यक्रमाची लोकांमध्ये उत्सुकता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com