राजे वेढे कसे भेदणार याकडे जनतेचे लक्ष!

प्रवीण जाधव
सोमवार, 2 ऑक्टोबर 2017

सातारा - खंडणीप्रकारणातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधल्यानंतर मोकळे झालेल्या खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर टोल नाका हस्तांतराच्या माध्यमातून राष्ट्रवादीच्या धुरिणांनी दुसरा डाव टाकला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत खासदार भोसले यांची कोंडी करण्याच्या व्यूहरचनेचा हा एक भाग असल्याचे जाणकरांचे म्हणणे आहे. एकामागून एक पडणारे वेढे राजे कसे भेदतात याकडे जिल्हावासीयांचे लक्ष आहे.

सातारा - खंडणीप्रकारणातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधल्यानंतर मोकळे झालेल्या खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर टोल नाका हस्तांतराच्या माध्यमातून राष्ट्रवादीच्या धुरिणांनी दुसरा डाव टाकला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत खासदार भोसले यांची कोंडी करण्याच्या व्यूहरचनेचा हा एक भाग असल्याचे जाणकरांचे म्हणणे आहे. एकामागून एक पडणारे वेढे राजे कसे भेदतात याकडे जिल्हावासीयांचे लक्ष आहे.

खासदार उदयनराजे भोसले राष्ट्रवादीचे असले, तरी जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या धुरिणांशी त्यांची फारशी जवळीक होऊ शकली नाही. मागील लोकसभा निवडणुकीवेळीच त्यांचे तिकीट कापण्याचा प्रयत्न झाला; परंतु जनतेची नस आणि राजकारणातील वाऱ्याची दिशा जाणणाऱ्या पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या निर्णयापुढे कोणाला जाता आले नाही. उदयनराजे खासदार झाले. त्यानंतरही राष्ट्रवादीच्या नेत्यांशी त्यांचे जमले नाही.

विशेषत: विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्यासोबत त्यांचे वारंवार खटके उडाले. एकमेकांची जिरविण्याचे हरप्रकारचे प्रयत्न सुरू झाले. जिल्हा बॅंक असो किंवा जिल्हा परिषद, प्रत्येक ठिकाणी हा वाद जिल्हावासीयांना पाहायला मिळाला. मात्र, साताऱ्यातील मनोमिलनामुळे या वादाला टोकदारपणा येत नव्हता. सातारा पालिकेच्या निवडणुकीनंतर ही परिस्थिती बदलली. मनोमिलनाची धुसफूस बाहेर येऊन दोन्ही आघाड्यांनी स्वतंत्र निवडणुका लढविल्या. नगरविकास आघाडीला हा परभाव जिव्हारी लागणारा असाच होता. उदयनराजेंची फलटण असो वा साताऱ्यातील वक्तव्ये सभापतींच्याही जिव्हारी लागलीच होती. 

अडचण तर सर्वांचीच होती. अंगावर घ्यायचे कोणी असा प्रश्‍न होता. फलटणकरांनी ते पाऊल उचलले. त्यांना धाकट्या वाड्याची साथ मिळणार अशी परिस्थिती निर्माण झाली. त्यातूनच उदयनराजेंभोवतीचे वेढे आवळायला सुरवात झाली. उदयनराजेंना पहिला धक्का बसला तो लोणंद औद्योगिक वसाहतीमधील कंपनीच्या मालकाला धमकावल्याच्या प्रकरणात. रामराजे आणि उदयनराजे यांना मानणाऱ्या संघटनांच्या वादातून खरी या प्रकरणाला सुरवात झाली. उदयनराजेंना खऱ्या अर्थाने जखडण्याचा प्रयत्न या प्रकरणात झाला. तब्बल तीन महिने उदयनराजेंना साताऱ्याबाहेर राहावे लागले. ही कोंडी उदयनराजेंनी आपल्या स्टाइलने फोडली. अटक प्रक्रियेतील स्टंटमुळे या प्रकरणाचा होणारा तोटा दूर करत उदयनराजेंनी फायदाच करून घेतला. हा डाव उलटला. 

आता टोल नाक्‍याच्या माध्यमातून उदयनराजेंच्या कोंडीचा दुसरा डाव मांडला गेला आहे. उदयनराजेंचे नेतृत्व मानणाऱ्या व्यवस्थापनाच्या ताब्यातून टोलनाका काढून घेतला गेला. करार संपल्याचे कारण पुढे केले जात आहे. मात्र, या सर्व फलटणकरांच्याच युक्‍त्या असल्याचे बोलले जात आहे. ही कोंडी फोडण्यासाठी स्थानिक कामगारांचा मुद्दा पुढे करून उदयनराजेंनी टोलनाका व्यवस्थापनाला इशारा दिला. मात्र, त्याला तोंड देण्यासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या कार्यकर्त्यांना पुढे आणले जाण्याची शक्‍यता आहे. उदयनराजेंना अडविण्याबरोबर जावळी व साताऱ्यातील कार्यकर्त्यांच्या हाताला काम देऊन त्याचा राजकीय फायदाही आमदारांना होऊ शकतो. त्यामुळे उदयनराजेंची कोंडी करण्यासाठी फलटण व धाकटे सातारकर एकत्र आलेले आगामी काळात दिसू शकतात. उदयनराजे हा वेढा कसा सोडवतात, हे पाहणेही महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे साताऱ्यातील राजकीय वातावरण आगामी काळात तापणार हे नक्की.

Web Title: satara news politics