एकमेका साह्य करू... मध्ये हवा विकासाचा अजेंडा

सिद्धार्थ लाटकर
शनिवार, 13 जानेवारी 2018

मनोमिलन तुटल्यानंतर सुमारे वर्षभराने काल पालिकेच्या सभागृहात सत्ताधारी व विरोधकांत अभूतपूर्व समन्वय पाहायला मिळाला. सत्ताधारी आघाडीत एकीचे चित्र दिसले. विरोधी नगर विकास आघाडीच्या तंबूतही समोपचाराने विषयांची चर्चा घडवून आणली जात होती. भाजपच्या बाकावरही विकासाच्या कामांना प्राधान्य दिले जात होते. सभागृहातील कालचे हे खेळीमेळीचे चित्र असेच कायम राहिले पाहिजे. मात्र अशा पद्धतीच्या मनोमिलनात ‘शहराचा विकास’ हा सर्वांचा अजेंडा एक असायला हवा. नाहीतर ते ‘मनीमिलन’ ठरू शकते! 

सातारा पालिकेत खासदार उदयनराजे भोसले यांच्या नेतृत्वाखालील सातारा विकास आघाडीची सत्ता आहे. विरोधी पक्ष म्हणून आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखालील नगर विकास आघाडी कार्यरत आहे, तर भारतीय जनता पक्षाने केलेला शिरकाव सत्ताधाऱ्यांना काही वेळेस अडचणीचा ठरत आहे. गेल्या वर्षभरात सत्ताधाऱ्यांनी विरोधी पक्षाचा, तसेच भाजपचा मुलाहिजा न ठेवता मंजूर मंजूरच्या आरोळ्या ठोकत सभा पार पाडल्या. कधी विनोद खंदारे विरुद्ध ॲड. दत्ता बनकर, तर कधी अशोक मोने विरुद्ध वसंत लेवे अशा शाब्दिक चकमकी सभागृहाने पाहिल्या. मोने आणि लेवे यांच्यातील ‘तु तु मैं मैं’ अगदी धरपकडीपर्यंत गेली. भाजप सदस्यांनी टीका करताना सत्ताधाऱ्यांमध्ये एकालाही सोडले नाही. देशात व राज्यात सत्तेवर असताना सरकारचा निधी आपण सुचविलेल्या विकासकामांवर खर्च होत नाही. सत्ताधारी आपल्याला जमेत धरत नसल्याची खंत वेळोवेळी भाजपच्या सदस्यांनी उघडपणे बोलून दाखविली आहे. 

सत्ताधाऱ्यांचे सभागृहातील वागणे, समित्यांच्या बैठकीत विरोधकांचे विषय न घेणे, निधीतील होणारा दुजाभाव आदी गोष्टी उदयनराजेंपर्यंत पोचत होत्या. आघाडीच्या बैठकीत ते कधी त्यावर भाष्य करत असत तर कधी मौन बाळगत. दुसरीकडे सत्ताधाऱ्यांवर रोख ठेवण्यासाठी आपल्या आघाडीने क्रियाशील राहावे, असा प्रयत्न नेहमी शिवेंद्रसिंहराजेंचा राहिला; परंतु अपेक्षित परिणाम साधत नसल्याचे वृत्त त्यांच्यापर्यंत पोचत होते. भाजप सदस्यांनी तर त्यांच्या व्यथा जिल्हाधिकारी, पालकमंत्री, महसूलमंत्र्यांपासून थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत पोचविल्या. 

या सर्व गोष्टींत आपल्या शहराला काय हवे, नागरिकांच्या नेमक्‍या काय समस्या आहेत आदी गोष्टींचा विसर सर्वांनाच पडू लागला होता. जो तो आपली कामे, त्यातून स्वतःची प्रतिमा उंचविण्यासाठी प्रयत्न करीत होता. दरम्यानच्या काळात शहरातील वाढणारी अतिक्रमणे, अनधिकृत बांधकामे, पदपथांवरील वाढत्या टपऱ्या, अपुरी पार्किंग व्यवस्था, उजाड बागा, ऐतिहासिक स्थळांची दुरवस्था आदी प्रश्‍नांवर सत्ताधाऱ्यांकडून काहीच काम होत नसल्याने नागरिकांतून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. 

पालिका निवडणुकीत बहुमतात आल्यानंतर ‘माझ्यासाठी सर्व एकच आहेत. कोण कुठल्या आघाडीचा, पक्षाचा आहे हे मी पाहणार नाही. सर्वांची कामे करणार,’ असे उदयनराजेंनी सांगून टाकले; परंतु आपण बोलल्याप्रमाणे पालिकेतील पदाधिकारी कृती करत नाहीत, अशी जाणीव बहुधा त्यांना असावी. म्हणूनच कदाचित्र त्यांनी आघाडीच्या एका बैठकीत ‘पालिकेत भांडत बसू नका. लोकांची कामे करा,’ असा सल्ला पदाधिकाऱ्यांना दिला. एका दगडात अनेक पक्षी मारण्याची कला उदयनराजेंना अवगत आहे. अगदी तसेच घडल्याचे चित्र कालच्या (गुरुवार) सर्वसाधारण सभेत दिसले. सत्ताधारी सातारा विकास आघाडी सभागृहात एकवटलेली पाहायला मिळाली. किमान काल तसे चित्र उभे करण्यात पदाधिकारी यशस्वी झाले, असेच म्हणता येईल. आपल्या सदस्याच्या विषयावर संक्रांत येत आहे, असे पाहून लगेच आघाडीतील दुसरा सदस्य त्यांच्या मदतीला धावून जात होता. एवढेच नव्हे तर विरोध होणाऱ्या विषयासंदर्भात लगेच सत्ताधारी विरोधकांच्या बाकाजवळ जाऊन त्यांच्याशी गुजगोष्टी करून विषय मंजूर करून घेत होते. भाजप सदस्यही आपल्या भागातील विषय मार्गी लागावा, यासाठी सत्ताधारी व विरोधकांना खुणवाखुणवी करून आपले साध्य करून घेत होते. एकंदरीतच पालिकेची सभा अशीच खेळीमेळीत झाली, तर त्यातून जनेतला काय मिळेल? याची शाश्‍वती आता तर लगेच कोणी देऊ शकणार नाही; पण ‘एकमेका साह्य करू...’ हे सदस्यांनी बहुधा ओळखल्यानेच त्यांनी सुचविलेली विकासकामे मात्र पदरात पाडून घेतली.

Web Title: satara news politics development