‘कास’ धरणाची उंची... डोंगरी भागात रस्त्यांचे जाळे

शैलेंद्र पाटील
मंगळवार, 31 ऑक्टोबर 2017

सातारा - सातारा शहराला मुबलक पाणी देण्यासाठी कास धरण क्षमता वाढीच्या कामाला मिळालेली गती, पर्यटनवाढीसाठी कास-महाबळेश्‍वर राज्यमार्गाचे डांबरीकरण, अजिंक्‍यतारा सहकारी साखर कारखाना गाळप क्षमतेत वाढ, जावळीसह डोंगरी भागात डांबरी रस्त्यांचे जाळे, मतदारसंघातील वाढता जनसंपर्क, लोकांच्या प्रश्‍नांच्या सोडवणुकीसाठी प्रयत्नात सातत्य... या आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या तीन वर्षांतील कामातील जमेच्या बाजू आहेत. 

सातारा - सातारा शहराला मुबलक पाणी देण्यासाठी कास धरण क्षमता वाढीच्या कामाला मिळालेली गती, पर्यटनवाढीसाठी कास-महाबळेश्‍वर राज्यमार्गाचे डांबरीकरण, अजिंक्‍यतारा सहकारी साखर कारखाना गाळप क्षमतेत वाढ, जावळीसह डोंगरी भागात डांबरी रस्त्यांचे जाळे, मतदारसंघातील वाढता जनसंपर्क, लोकांच्या प्रश्‍नांच्या सोडवणुकीसाठी प्रयत्नात सातत्य... या आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या तीन वर्षांतील कामातील जमेच्या बाजू आहेत. 

बोंडारवाडी धरण, सातारा औद्योगिक वसाहतीची दुरवस्था, साताऱ्यातील ढासळलेली शहर बस वाहतूक व्यवस्था, सातारा व परिसराचा अनियंत्रित विस्तार... आदी प्रश्‍नांचे आव्हान त्यांच्यापुढे असेल. आगामी काळात त्याच्या सोडवणुकीच्या दिशेने त्यांना ठोस पावले उचलावी लागतील.

नगरपालिकेचा अपवाद वगळता सातारा व जावळी तालुक्‍यांतील सत्ता एकहाती सांभाळणारे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा करून कास धरणाची उंची वाढीच्या कामाला ४२ कोटींचा निधी मिळवला. या कामामुळे नजीकच्या काळात सातारकांना कमी खर्चात, अधिक शुद्ध पाणी मिळणार आहे. गेल्या काही वर्षांत उसाच्या उत्पादन वाढीमुळे ऊस गाळपाचा प्रश्‍न निर्माण झाला होता. शिवेंद्रसिंहराजेच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या ‘अजिंक्‍यतारा’ कारखान्याची गाळप क्षमता अडीचवरून चार हजार मेट्रिक टनांपर्यंत वाढविली. नुकतेच हे काम पूर्ण झाल्याने भागातील गाळपाविना राहिलेल्या उसाचा प्रश्‍न निकाली निघाला आहे. कारखान्याच्या नवीन डिस्टिलरी प्रकल्प उभारणीचे काम पूर्ण झाले असून इथेनॉल, ईएनए आणि रेक्‍टीफाईड स्पिरीट उत्पादन घेतले जाते. कारखान्याची क्षमता वाढल्याने परिसरातील, विशेषत: ग्रामीण भागातील लोकांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळाला आहे. 

पालिकेच्या ‘आयएचएसडीपी’ योजनेच्या निकषाबाहेर राहिलेल्या झोपडपट्टीवासीयांना पंतप्रधान आवास योजनेतून घरकुले बांधून देण्याचे प्रस्तावित आहे. हा प्रकल्पही लवकर मार्गी लागणे अपेक्षित आहे. जावळी तालुक्‍यातील बोंडारवाडी धरण, साताऱ्यातील तिसरी देगाव औद्योगिक वसाहत, पालिका हद्दीबाहेरील वसाहतींसाठी भाजी मंडई, नव्याने झालेल्या मेढा नगरपंचायतीअंतर्गत नागरी सुविधांच्या विकासाला गती द्यावी लागेल. नजीकच्या दोन वर्षांत ते कसे मार्गी लागतील, असे शिवेंद्रसिंहराजेंचे म्हणणे आहे. 

विद्यमान आमदारांनी स्वत:चा फंड वाटण्याशिवाय कोणतीही मोठी कामे केली नाहीत. धरण व कालव्यांची कामे, पुनर्वसनाचे प्रश्‍न प्रलंबित आहेत. उरमोडी कालव्याचे पाणी शेतकऱ्यांना मिळाले नाही. गेली १७ वर्षे ते सत्तेत आहेत. मनात आणले असते तर त्यांना ते शक्‍य होते, परंतु त्यांनी ते केले नाही. 
- दीपक पवार, जिल्हा परिषद सदस्य, भाजप

काय कमावले...
कास उंचीवाढीमुळे सातारकरांना लवकरच मुबलक शुद्ध पाणी 
उरमोडीच्या कामटी-आंबवडे लिफ्ट इरिगेशनची कामे सुरू 
कुसुंबी-कोळघर रस्त्याचे काम मार्गी 
आमदार निधीतून तीन कोटी रुपयांची विविध विकासकामे
डोंगरी भागात डांबरी रस्त्यांचे जाळे

आगामी नियोजन
साताऱ्यात साहित्य संमेलनासाठी प्रयत्नशील 
साताऱ्यातील मेडिकल कॉलेजसाठी पाठपुरावा
सातारा शहरात भुयारी गटार योजनेसाठी प्रयत्न 

Web Title: satara news politics & work