लोकसंख्या वाढीला ‘ब्रेक’!

विशाल पाटील
मंगळवार, 11 जुलै 2017

दर निम्म्याने घटला; ८३ टक्‍के जनता ग्रामीण रहिवाशी

सातारा - लोकसंख्या वाढीचा भस्मासूर रोखणे हे देशापुढील मोठे आव्हान असले तरी सातारा जिल्ह्यात मात्र, वेगळी स्थिती आहे. २०११ च्या जनगणनेनुसार गत दहा वर्षांच्या तुलनेत जिल्ह्याचा लोकसंख्या वाढीचा वेग निम्म्याने घटला आहे. जनगणनेनुसार जिल्ह्याची लोकसंख्या ३० लाख तीन हजार ७४१ इतकी असून, सुमारे ८३ टक्‍के जनता ग्रामीण भागात राहात आहे.

देशातील लोकसंख्या वाढीचा दर जास्त असल्याने काही वर्षांत भारत चीनला मागे टाकत जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश ठरण्याची शक्‍यता आहे. लोकसंख्या वाढीमुळे बेरोजगारी, आर्थिक दारिद्य्र, शैक्षणिक दुर्लक्ष, नैसर्गिंक संपत्तीचा ऱ्हास यासह अनेक समस्या उद्‌भवत आहेत. त्यामुळे केंद्र सरकार लोकसंख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी कायदे करत आहे. ‘हम दो, हमारे दो’ ही कुटुंबाची नियमावलीच शासनाने ठरविली आहे.

तिसरे अपत्य असल्यास संबंधित दांपत्य लोकशाहीत निवडणूक लढविण्यास अपात्र ठरते, शिवाय तिसऱ्या अपत्याला शासकीय सुविधाही दिल्या जात नाहीत. 

ग्रामीण भाग असलेल्या सातारा जिल्ह्याची स्थिती यापेक्षा वेगळी आहे. १९५१ पासून सुरू असलेल्या जनगणनेच्या अभ्यासानुसार लोकसंख्या वाढीचा दर सातारा जिल्ह्यात कमी होत आहे. १९५१-६१ मध्ये २१.६८ टक्‍के असलेली दरवाढ २००१-२०११ मध्ये तब्बल ६.९३ टक्‍के इतकी कमी झाली आहे. १९९१-२००१ मध्ये झालेल्या जनगणनेत ती १४.५९ टक्‍क्‍यांवर होती. लोकांमध्ये वाढलेली जनजागृती, ‘हम दो, हमारा एक’ या धर्तीवरचे कुटुंब नियोजन, उच्च वर्गीयांपासून ते सर्वसामान्यांपर्यंत ‘स्त्री-पुरुष समानते’चे रुजलेले बीज, शिक्षणावरील वाढता खर्च, वाढलेली आर्थिक अस्थिरता, महागाई, शासकीय कायदे यासह विविध कारणांमुळे लोकसंख्या वाढीला आळा बसत आहे. २०११ च्या जनगणनेनुसार जिल्ह्याच्या ग्रामीण भागात २४ लाख ३३ हजार ३६३, तर शहरी भागात पाच लाख ७० हजार ३७८ लोक राहत आहेत.

...ही आहेत कारणे
स्त्री-पुरुष समानता
कुटुंब नियोजन
आर्थिक परिस्थिती
संगोपनातील अडचणी
शासकीय कायदे

लोकसंख्या वाढीचा दर
वर्ष              लोकसंख्या वाढ

२००१-२०११      ०६.९३
१९९१-२००१      १४.५९
१९८१-१९९१      २०.२४
१९७१-१९८१      १८.०२
१९६१-१९७१      २०.७९
१९५१-१९६१      २१.६८

Web Title: satara news population increased break