राहुल गांधींच्या नेतृत्वाखालीच पुढील निवडणुका: पृथ्वीराज चव्हाण

Prithviraj Chavan
Prithviraj Chavan

कऱ्हाड : सर्व राज्यांच्या काँग्रेस समित्यांनी राहुल गांधीच पक्षाध्यक्ष व्हावे असे ठराव केले आहेत. त्यामुळे लवकरच काँग्रेसची धुरा त्यांच्याकडे जावुन त्यांच्याच नेतृत्वाखाली पुढील निवडणुका होतील, अशी माहिती माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज दिली.

सध्या भाजपला उतरती कळा लागली असुन देशात सध्या परिवर्तनाची प्रक्रीया सुरु झाली आहे. सर्व जातीयवादी विरोधी पक्षांनी एकत्र येवुन भाजपविरोधात मोठ बांधली पाहिजे. पुढील अडीच वर्षात बदल दिसावा यासाठी आम्ही तयारी सुरु केली आहे, असेही त्यांनी सांगितले. 

देशातील घडामोडीसंदर्भात चव्हाण यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. अमित शहा यांच्या मुलाची कंपनी काळा पैसा पांढरा करण्यासाठी सुरु करण्यात आली होती असा आरोप करुन चव्हाण म्हणाले, २००४ साली सुरु झालेल्या कंपनीची उलाढाल देशातील सरकार बदलल्यावर अचानक कोटींच्या घरात कशीकाय गेली ? हा मनी लॉंड्रींगचाच प्रकार आहे. याप्रकरणी अमित शहा यांनी राजीनामा द्यावा अशी आमची मागणी आहे. नोटाबंदी ही पंतप्रधानांचा अविचारी निर्णय आहे. अमेरिकन बहुउद्देशीय कंपन्यांच्या फायद्यासाठी आणि त्यांच्या दबावाखाली नोटाबंदीचा निर्णय घेण्यात आला आहे.

त्यातुन दीड ते दोन टक्के कमिशन मिळते. देशातील ९७ टक्के लोक रोखीने व्यवहार करतात. त्यांना कॅशलेसमध्ये अडकवुन त्यांची गैरसोय सुरु आहे. नोटाबंदीने देशाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. जीएसटीचा निर्णयही घाईने घेतला आहे. त्यामुळे उद्योग, व्यापार अडचणीत आला आहे. कर किती प्रमाणात असावा याचे सुत्रच राहिलेले नाही. नोटाबंदी आणि जीएसटीमुळे छोटे व्यापारी दुकान बंद करुन बसले आहेत. सरकारी धोरणामुळे कंपन्या बंद पडत असल्याने लाखो तरुणांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. सरकार मात्र दरवर्षी एक कोटी नोकऱ्या देण्याचे फसवे आश्वासन देत आहे.

देशाचा आर्थिक विकास दरही ढासळला आहे. देशाचा आर्थिक विकास दर हा ५.७ टक्के सांगितला जात असला तरी तो प्रत्यक्षात ३.७ टक्केच आहे असे अर्थतज्ञांचे मत आहे. त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था सध्या अडचणीत आली आहे. राज्य सरकारने केलेली मेकइन महाराष्ट्र हे अपयशी ठरले असुन घोषणाही हवेत विरली आहे. केवळ घोषणा करायची, आश्वासने द्यायची सुरु आहेत.      

मुख्यंत्री हे कर्जमाफीच्या विरोधात असुन त्यांना अजुनही सरसकट कर्जमाफी द्यायची नाही असा आरोप करुन श्री. चव्हाण म्हणाले, राज्य सरकारने कर्जमाफीसाठी जाचक अटी घातल्या आहेत. त्यामुळे अनेक शेतकरी त्यापासुन वंचीत राहणार आहेत. आमची मागणी सरसकट कर्जमाफी व्हावी अशी आहे. सरकारने कर्जमाफीसाठी ३४ हजार कोटींची तरतुद केली आहे. ते पैसे शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि शेतीशी संबंधित बाबींसाठीच खर्च झाला पाहिजे अशी आमची मागणी असुन तो पैसे अन्यत्र वळवल्यास आमचा त्यास विरोध असेल. केंद्र व राज्यातील सरकारच्या धोरणामुळे व्यापारी, शेतकरी, कामगार, तरुण, उद्योजक यांच्यामध्ये सरकार विरोधी प्रचंड संतापाचे वातावरण आहे. त्यामुळे देशात सध्या भाजपला उतरतीकळा लागली आहे असे सांगुण श्री. चव्हाण म्हणाले,  पंजाब, नांदेडसह ग्रामपंचायतींच्या निवडणुकीतही काॅंग्रेसला चांगले यश मिळाले आहे. सर्व राज्यांच्या काॅंग्रेस समित्यांनी राहुल गांधीच पक्षाध्यक्ष व्हावे असे ठराव केले आहेत. त्यामुळे लवकरच ते अध्यक्ष होतील. त्यानंतर राज्य, प्रदेश, जिल्हाध्यक्षांच्या निवडणुका होतील. त्यानंतर देशातील एक प्रबळ विरोधी पक्ष म्हणुन आम्ही जनतेसमोर जाणार आहोत. सध्या परिवर्तनाची प्रक्रीया वेळेवर सुरु झाली आहे. सर्व जातीयवादी विरोधी पक्षांनी एकत्र येवुन भाजपविरोधात मोठ बांधली पाहिजे. पुढील अडीच वर्षात बदल दिसावा यासाठी आमचा पक्ष सज्ज आहे. जगाच्या इतिहासात निवीदा न काढताच कोट्यावधी रुपयांचे बुलेट ट्रेनचे कंत्राट देण्याचा प्रकार या सरकारच्या काळात झाला आहे. त्याला आमचा विरोध आहे. 

२५ वर्षे सत्तेतच राहणार?
काॅंग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार असताना माझ्याकडेच परिवहन खाते होते. त्यावेळीही प्रश्न होतेच मात्र आम्ही ते पर्यायी व्यवस्था करुन सोडवले असे सांगुण श्री. चव्हाण म्हणाले, एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्याचे सोडुन परिवहन मंत्री त्यांनाच २५ वर्षे सातवा वेतन आयोग देणे शक्य नसल्याचे सांगत आहेत. त्यामुळे तुम्हीच २५ वर्षे सत्तेत राहणार आहात की काय ? अशी कोपरखळीही त्यांनी परिवहन मंत्र्यांना मारली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com