शिक्षकांच्या बदल्याच ‘अवघड’

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 मे 2017

सातारा - ग्रामविकास विभागाने प्रथमच जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांबाबत नवीन धोरण ठरवून ३१ मेपर्यंत बदली प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, शिक्षक संघटना, शिक्षकांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावत बदल्यांना स्थगिती आणली. त्यातही ‘ग्रामविकास’ने शासकीय प्रक्रिया पुढे ढकलण्याचा प्रयत्न केला. आता मात्र, बदली प्रक्रियेची मुदत संपल्याने, न्यायालयाचा निर्णय होईपर्यंत शाळा सुरू होणार असल्याने यावर्षीची बदली प्रक्रियाच ‘अवघड’ झाली आहे. 

प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या करण्यासाठी ग्रामविकास विभागाने यावर्षी साधारण (सुगम) क्षेत्र व अवघड (दुर्गम) क्षेत्र असे शाळांचे वर्गीकरण केले. त्याद्वारे अवघड क्षेत्रातील शाळांत तीन वर्षे सेवा झालेल्यांना बदलीचा अधिकार दिला, तर सुगम अथवा अवघड शाळांमध्ये दहा वर्षे सेवा पूर्ण झालेल्यांना बदलीस पात्र केले. त्याचा परिणाम, शिक्षण क्षेत्रात कधी नव्हे इतकी उलथापालथ होणार आहे. तसेच या बदली अध्यादेशात अनेक बाबी संदिग्ध असल्याने प्राथमिक शिक्षकांच्या विविध संघटनांनी मुंबई, नागपूर, औरंगाबाद उच्च न्यायालयांचे दरवाजे ठोठावले. त्यासंदर्भात वेगवेगळ्या न्यायालयांनी वेगवेगळे आदेश दिले आहेत. काही न्यायालयांनी बदली प्रक्रियेस स्थगिती देण्याचे सुचविले आहे. 

तरीही ग्रामविकास विभागाने २१ मेपासून बदली प्रक्रिया राबविण्याचे सूचित केले होते. त्यानुसार शिक्षण विभागाने कामकाजही सुरू ठेवले आहे.

शिक्षकांची सेवाज्येष्ठता यादी तयार केली असून, पुढील टप्प्यात संवर्गनिहाय यादी प्रसिध्द केली जाणार आहे. परंतु, ‘ग्रामविकास’ने ३१ मेपर्यंत बदली प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. आता ही मुदत उद्या (ता.३१) संपणार आहे. काही न्यायालयांच्या आदेशात १५ जूनपर्यंत बदली करू नये, प्रक्रिया जैसे थे ठेवण्याचे सूचित केले आहे. त्यामुळे पुढील प्रक्रिया करावयाची झाल्यास शैक्षणिक वर्ष उलटणार आहे. त्यामुळे यावर्षी बदली प्रक्रियाच ‘अडचणी’त आली आहे. बदल्या होणार की नाही, 
याबाबत शिक्षकांतही संभ्रम निर्माण झाला आहे.

हजारभर शिक्षकांचे आक्षेप
प्राथमिक शिक्षण विभागाने आठ हजार ६०० शिक्षकांची सेवाज्येष्ठता यादी प्रसिध्द केली होती. त्यावर तब्बल एक हजारांहून अधिक शिक्षकांनी आक्षेप घेतले. त्यानुसार आता नवीन, संवर्गानुसार यादी तयार करण्याचे काम प्राथमिक शिक्षण विभागात सुरू आहे. तीही यादी लवकरच प्रसिध्द केली जाईल, असे शिक्षण विभागातून सांगण्यात आले. 

Web Title: satara news problem in teachers transfer