लोकप्रतिनिधींनो...जनता सारे पाहते आहे..!

गुरुवार, 14 सप्टेंबर 2017

सातारा - खासगी सावकारी विरोधात पोलिसांनी सुरू केलेल्या लढ्यामध्ये अनेक गब्बर मोहरे ढेर होत चालले आहेत. यातील काहींचे लोकप्रतिनिधींच्या आश्रयाखाली प्रस्थ वाढत होते. त्यांचे लोकसेवकाचे बुरखे फाटले गेले आहेत. जनता हे सर्व काही शांतपणे पाहत आहे. त्यामुळे कोणत्या प्रकारच्या कार्यकर्त्यांना बळ द्यायचे, कोणाच्या पाठीशी उभे राहायचे, कोणाला सांभाळायचे, याचा विचार लोकप्रतिनिधींनी करणे आवश्‍यक बनले आहे.

सातारा - खासगी सावकारी विरोधात पोलिसांनी सुरू केलेल्या लढ्यामध्ये अनेक गब्बर मोहरे ढेर होत चालले आहेत. यातील काहींचे लोकप्रतिनिधींच्या आश्रयाखाली प्रस्थ वाढत होते. त्यांचे लोकसेवकाचे बुरखे फाटले गेले आहेत. जनता हे सर्व काही शांतपणे पाहत आहे. त्यामुळे कोणत्या प्रकारच्या कार्यकर्त्यांना बळ द्यायचे, कोणाच्या पाठीशी उभे राहायचे, कोणाला सांभाळायचे, याचा विचार लोकप्रतिनिधींनी करणे आवश्‍यक बनले आहे.

कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी प्रत्यक्षात पोलिस यंत्रणेवर असली, तरी लोकप्रतिनिधी हे त्यातील महत्त्वाचे भाग आहेत. लोकशाही व्यवस्थेमध्ये लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींमार्फतच राज्याचा कारभार चालतो. तो चालविण्याची यंत्रणा म्हणजे पोलिस व इतर विभाग आहेत. त्यामुळे आपल्या परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेची, त्यांना आवश्‍यक असणाऱ्या सुविधा पुरविण्याची, कायदा व सुव्यवस्था राखण्याची, गुंडगिरीला आळा घालण्याची सर्वांत पहिली जबाबदारी लोकप्रतिनिधींवर आहे. स्वातंत्र्यानंतर लोकप्रतिनिधींनी आपले हे कर्तव्य चोखपणे पार पाडण्याचे कर्तव्य व दायित्व जपले होते. कोणाला कुठपर्यंत ठेवायचे, याच्या मर्यादा ठेवल्या होत्या. त्यामुळे चांगल्या वर्तणुकीच्या, सामाजिक जाण असणाऱ्या कार्यकर्त्यांना बळ दिले जात होते.

काळाच्या ओघात पैसा आणि मनगटशाहीला निवडणुकीमध्ये महत्त्व येऊ लागले. किंबहुना चांगल्या प्रवृत्तींच्या, विचारांच्या व्यक्तींना दाबण्यासाठी काही राज्यकर्त्यांकडूनच अशा प्रवृत्तींना थारा देण्याची वृत्ती बळावत गेली. त्यामुळे गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींना उघड राजाश्रय मिळू लागला. जिल्ह्यामध्ये सध्या अशा प्रवृत्तींना भलताच जोर चढला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील उमेदवारांची नावे पाहिली तरी, कोणाकडून कोणाला पसंती दिली जात आहे, ते स्पष्ट होते. खासगी सावकारी विरोधात पोलिसांनी छेडलेल्या लढाईमध्येही ही गोष्ट समोर येऊ लागली आहे. लोकप्रतिनिधींच्या आश्रयाखालीच या सावकारांची पाळेमुळे बहरत होती हे बोलले जायचे. पोलिसांच्या कारवाईने ते चव्हाट्यावर आले आहे. या सर्व गोष्टी जनता पाहत आहे. त्याचा नक्कीच विचार होत आहे. मात्र, जिंकण्याच्या राजकारणासाठी कोणाला बळ द्यायचे, याचा लोकप्रतिनिधींनीही विचार करण्याची वेळ आली आहे. सर्वसामान्यांना अशा व्यक्तींकडून कशा प्रकारे नाडले व प्रसंगी नागवले जाते, याची माहिती लोकप्रतिनिधींनी घेणे आवश्‍यक आहे. 

कार्यकर्त्यांनाही त्यातून धडा मिळाला पाहिजे, अशी कृती लोकप्रतिनिधींकडून अपेक्षित आहे. वैयक्तिक स्वार्थासाठी काळ सोकावता कामा नये, याचे भान त्यांनी ठेवले पाहिजे. आपण लोकांचा विचार करतो, हा विश्‍वास त्यांनी जनतेच्या मनात निर्माण केला पाहिजे; अन्यथा कितीही पैसे खर्च करून निवडून येण्याचे मार्ग उघडणार नाहीत, याचे भान लोकप्रतिनिधींनी ठेवले पाहिजे.

जनतेला हवे सुरक्षित वातावरण
राजाश्रयाच्या जोरावर सर्वसामान्यांची पिळवणूक करणाऱ्यांना लोकप्रतिनिधींनीच धडा शिकविण्याची वेळ आली आहे. आजवर झाले ते झाले; परंतु यापुढे तरी सर्वसामान्य जनतेला सुरक्षित वातावरण मिळवून देण्यासाठीचे प्रयत्न होणे आवश्‍यक आहे. त्यासाठी पोलिसांनी कारवाई केलेल्यांची पाठराखण करणे, त्यांना मदत करणे या गोष्टी लोकप्रतिनिधींनी सोडल्या पाहिजेत. उलट त्यांच्यावर अधिक कडक कारवाई होण्यासाठी पोलिस यंत्रणेच्या मागे खंबीर राहिले पाहिजे. त्यासाठी नागरिकांना प्रवृत्त केले पाहिजे.

Web Title: satara news Public representatives