पावसाच्या प्रदेशातच खालावतोय पाऊस!

पावसाच्या प्रदेशातच खालावतोय पाऊस!

सातारा - भौगोलिकदृष्ट्या भिन्न असलेल्या जिल्ह्याचा पश्‍चिम भाग पर्जन्यजन्य म्हणून ओळखला जातो; पण याच पश्‍चिमेकडील पाटण तालुक्‍यात गत १६ वर्षांतील तब्बल १२ वर्षे पावसाने सरासरीही गाठली नाही. शिवाय, जावळीतही निम्मे वर्ष सरासरी इतकाही पाऊस झाला नाही. कोरेगाव, माणमध्ये केवळ सहा वर्षे पावसाने सरासरी ओलांडली आहे. मात्र, पर्जन्यमान खालावत असतानाही त्यावर अभ्यास करण्याचे, उपाय शोधण्याचे धाडस दाखविले जात नाही.

पश्‍चिमेकडील महाबळेश्‍वरमध्ये राज्यातील सर्वाधिक पाऊस पडतो, तर पूर्वेकडील माण तालुक्‍यात राज्यातील सर्वाधिक कमी पाऊस पडत असल्याची परस्पर टोकाची भिन्नता सातारा जिल्ह्यात पाहण्यास मिळते. जिल्ह्यात सरासरी ९१९ मिलिमीटर इतका पाऊस होत असतो. २००२ पासून जिल्ह्यात केवळ २००३ आणि २०१५ या दुष्काळी वर्षी सरासरीपेक्षा कमी (अनुक्रमे ८०४.३, ७७५.३ मिलिमीटर) कमी पाऊस झाला आहे, तर सर्वाधिक २०८७.७ मिलिमीटर इतका पाऊस २००५ आणि २००६ मध्ये १९५०.९ मिलिमीटर इतका पाऊस झाला आहे. या काळात जिल्ह्यात महापुराची स्थिती उद्‌भवली होती. 

तीन वर्षे सरासरी ओलांडली
२००५, २००६, २००७ मध्ये जिल्ह्यात पावसाने कहर केला होता. या वर्षी सर्वच ११ तालुक्‍यांत पावसाने सरासरी ओलांडली होती. मात्र, २००३, २०१५ मध्ये तीव्र दुष्काळी परिस्थिती उद्‌भवली असल्याने जिल्ह्यात सरासरीपेक्षाही कमी पाऊस झाला; परंतु २०१२ मध्येही दुष्काळाची दाहकता टोकला गेली असतानाही महाबळेश्‍वरमध्ये जास्त पाऊस झाल्याने जिल्ह्याने सरासरी ओलांडली होती. 

कारणे शोधावीत
पाटण तालुक्‍यातील कोयनानगर, मोरगिरी भागात जास्त पाऊस पडतो. मात्र, जिल्ह्यात सर्वाधिक जास्त वर्षे पाटणमध्ये पावसाने सरासरी गाठली नाही. त्यापाठोपाठ जावळी तालुक्‍यानेही आठ वर्षे सरासरी ओलांडली नाही. त्याचे दैनंदिन अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत हवामान खाते, पर्यावरण खाते, मंत्रालयातील आपत्ती नियंत्रण कक्षाला दिले जात आहेत. मात्र, विचित्र परिस्थितीचा अभ्यास करण्याचे, त्यावर उपाययोजना राबविण्याचे धाडस कोणी केली नाही. वृक्षतोड, जागतिक तापमान ही प्रमुख कारणे असली तरी इतर स्थानिक कारणांचा अभ्यास केला पाहिजे.

...त्यामुळे जिल्ह्यावर अन्याय
महाबळेश्‍वर तालुका वगळता तर सर्वत्र सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. महाबळेश्‍वरची सरासरी २२२३ मिलिमीटर असून, पाऊस मात्र दुप्पट, चारपट पडत असतो. २००६ मध्ये पावसाची सरासरी ठरविली असली, तरी ती आता बदलण्याची नितांत आवश्‍यकता आहे. महाबळेश्‍वरमधील जास्त पर्जन्यामुळे जिल्ह्याची सरासरी वाढत आहे. परिणाम, दुष्काळी सवलती मिळताना जिल्ह्यातील इतर भागांवर अन्याय होत असल्याची भावना लोकांमध्ये आहे. याकडे शासनाने गांभीर्याने लक्ष द्यायला हवे.

२००२ पासून तालुकानिहाय इतकी वर्षे कमी पाऊस
सातारा - ६
जावळी - ८
कोरेगाव - १०
कऱ्हाड - ८
पाटण - १२
फलटण - ७
माण - १०
खटाव - ६
वाई - ५
खंडाळा - २

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com