स्वयंचलित यंत्रे आता मोजणार पाऊस 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 जून 2018

सातारा - महसूल विभागामार्फत पाऊसमान मोजली जाणारी वर्षानुवर्षांची तीच यंत्रणा, त्यातून अचूक पाऊस मोजण्यात येणारी अडचण, त्यातून नागरिकांना शासकीय मदत मिळण्यावर होणारे दुष्परिणाम आता थांबू शकतील. कृषी विभागामार्फत जिल्ह्यातील 91 महसूल मंडलांत स्वयंचलित हवामान केंद्रे कार्यान्वित केली असून, त्याद्वारे आता पावसाचे मोजमाप होणार आहे. 

सातारा - महसूल विभागामार्फत पाऊसमान मोजली जाणारी वर्षानुवर्षांची तीच यंत्रणा, त्यातून अचूक पाऊस मोजण्यात येणारी अडचण, त्यातून नागरिकांना शासकीय मदत मिळण्यावर होणारे दुष्परिणाम आता थांबू शकतील. कृषी विभागामार्फत जिल्ह्यातील 91 महसूल मंडलांत स्वयंचलित हवामान केंद्रे कार्यान्वित केली असून, त्याद्वारे आता पावसाचे मोजमाप होणार आहे. 

महसूल विभागामार्फत 2008-09 पासून जिल्ह्यातील 91 महसुली मंडलांमध्ये पर्जन्यमापके बसविण्यात आली आहेत. त्यापूर्वी ही तालुकास्तरावर होती. मात्र, त्यामुळे पावसाचे अचूक मोजमाप होत नसल्याने ती पुढे मंडलस्तरावर बसविण्यात आली. सध्या याच पर्जन्यमापकांद्वारे पावसाचे मोजमाप होऊन त्याचा अहवाल वरिष्ठ कार्यालयांना दिला जातो. त्याच्या मोजमापावरून आपत्ती निवारण निधीतून शेतकरी व नागरिकांना अतिपाऊस, पुरामुळे नुकसान झाल्यास त्याला भरपाई दिली जाते. जेवढ्या प्रमाणात पाऊस होईल, त्यानुसार मदतीचा मार्ग ठरत असतो. मात्र, ही यंत्रणा कित्येकदा बिघडलेल्या स्वरूपात असते. कोतवालांमार्फत पर्जन्याचे मोजमाप घेतले जाते. त्यातून चुकीची आकडेवारीही महसूल विभागाकडे  प्राप्त होत असते. 

आता मात्र राज्य शासनाच्या विभागामार्फत स्वयंचलित हवामान केंद्रे (ऍटोमेटिक वेदर स्टेशन) 91 महसूल मंडलांत कार्यान्वित करण्यात आली आहेत. या पावसाळ्यात त्याद्वारे पर्जन्याचे मोजदाद केले जाणार आहे. त्यामुळे किती पाऊस झाला, याची अचूक माहिती प्रशासनाला मिळण्यास मदत होईल, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुनील बोरकर यांनी सांगितले. 

गावनिहाय यंत्रे हवीत  
बहुतांशवेळा मंडलच्या ठिकाणी पाऊस कमी होतो; परंतु मंडलामधील इतर गावे, वाड्यावस्त्यांवर जास्त पाऊस पडतो. त्यामुळे आपत्तीग्रस्तांना नुकसान भरपाई मिळत नाही. अथवा मंडलच्या ठिकाणी अतिपाऊस झाल्यास त्याचा लाभ इतरांनाही मिळतो. त्यामुळे अतिपाऊस होऊनही इतर गावांतील आपत्तीग्रस्तांना नुकसानभरपाई मिळत नाही, तर इतर गावांमध्ये कमी पाऊस होऊनही मंडलाच्या ठिकाणी अतिपाऊस झाल्याने त्याचा फायदा इतरांना होतो. हे टाळून योग्य आपत्तीग्रस्तांना मदत देण्यासाठी गावनिहाय पर्जन्यमापक यंत्रे बसविणे आवश्‍यक आहे. 

...हे समजणार 

तापमान 
पर्जन्यमान 
वाऱ्याचा वेग, दिशा 
आर्द्रता

Web Title: satara news Rainfall will measure automatic devices