आरसी बुक पुन्हा ‘स्मार्ट कार्ड’ रूपात

प्रवीण जाधव
शनिवार, 17 मार्च 2018

दोन दिवस शुल्क स्वीकारणे बंद
बुधवारपासून (ता. २१) स्मार्ट कार्डसाठी शुल्क स्वीकारणे सुरू होणार आहे. त्यामुळे सोमवार व मंगळवारी नवीन वाहन नोंदणी, वाहनाचे हस्तांतरण, दुय्यम नोंदणी प्रमाणपत्र, कर्ज बोजा नोंद करणे किंवा उतरविणे, नोंदणी प्रमाणपत्रावरील पत्ता बदल अशा कामांकरिता शुल्क स्वीकारले जाणार नाही. बुधवारपासून नेहमीप्रमाणे ही प्रक्रिया सुरू होणार असल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय धायगुडे यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

सातारा - ‘स्मार्ट कार्ड’ बंद करून पुन्हा कागदावर आरसी बुक (नोंदणी पुस्तक) देण्याचा परिवहन विभागाने टाकलेला ‘रिव्हर्स गिअर’ तब्बल चार वर्षांनी बदलला आहे. आता पुन्हा आरसी बुक ‘स्मार्ट कार्ड’ स्वरूपात देण्यात येणार आहे. बुधवारपासून (ता.२१) सातारा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात याबाबतची कार्यवाही सुरू केली जाणार आहे. 

सर्व शासकीय व्यवहार ऑनलाइन करण्यासाठी केंद्र व राज्य पातळीवरून घोषणा होत आहेत. त्यानुसार बहुतांश शासकीय कामकाज ऑनलाइन केले गेले आहे. आधुनिक पद्धतींचा वापर वाढत असताना उपप्रादेशिक परिवहन विभागाने मात्र, ‘रिव्हर्स गिअर’ टाकलेला होता. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात केलेल्या वाहन नोंदणीची माहिती व वाहन चालविण्याचा परवाना पूर्वी कागदाच्या लहान पुस्तकाच्या स्वरूपात दिला जात होता. 

वाहनचालकाने ही कागदपत्रे वाहनाबरोबर ठेवणे कायद्याने बंधनकारक असते. त्यामुळे कागदाच्या स्वरूपातील ही कागदपत्रे जपून ठेवण्यासाठी वाहनधारकाला कसरत करावी लागत होती. वाहनधारकांचा हा त्रास ‘स्मार्ट कार्ड’ मुळे संपला होता. वाहन नोंदणी व लायसन्स दोन्हीही कागदपत्रे ‘स्मार्ट कार्ड’ स्वरूपात देण्याचा निर्णय 

परिवहन विभागाने आठ वर्षांपूर्वी घेतला होता. त्यानुसार प्रत्येक उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात ‘स्मार्ट कार्ड’ देण्याची व्यवस्था सुरू झाली होती.

मात्र, हा उपक्रम चार वर्षेच चालला. नोव्हेंबर २०१४ मध्ये या कामाचे एका खासगी कंपनीला दिलेले टेंडर संपले. त्यामुळे आरसी बुक पुन्हा कागदावर देण्यास सुरवात झाली. त्यामुळे कागदपत्रे सांभाळण्याची कसरत पुन्हा सुरू झाली. लाल फितीच्या कारभारात तब्बल चार वर्षांनी टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली. त्यामुळे आता आरसी बुक पुन्हा ‘स्मार्ड कार्ड’च्या स्वरूपात मिळणार आहे. या कार्डमध्ये नव्या वाहनांच्या सर्व नोंदी असणार आहेत.

दोनशे रुपये शुल्क
स्मार्ट कार्ड सुविधा पुन्हा सुरू झाली आहे. त्यासाठी वाहनधारकाला नोंदणी शुल्काव्यतिरिक्त २०० रुपये हे स्मार्ट कार्डचे शुल्क म्हणून भरावे लागणार आहे.

Web Title: satara news rc book smart card