हवालदार ते मेजर जनरलपर्यंत प्रवास 

 हवालदार ते मेजर जनरलपर्यंत प्रवास 

सातारा - शूरवीर, सैनिकी परंपरा असलेल्या सातारा जिल्ह्यातील अनेक कुटुंबांत पिढ्यान्‌पिढ्या सैन्य दलात रुजू होणारी कुटुंबीय भेटतात. त्यापैकी एक म्हणजे मूळचे आर्वी (ता. कोरेगाव) व सध्या साताऱ्यात स्थायिक असलेले जाधव कुटुंबीय. विशेष म्हणजे आजोबांचा सैन्यदलात प्रवास हवालदार पदावरून सुरू झाला, तो प्रवास नातू मेजर जनरल पदापर्यंत नेत आहे. 

सैनिकी परंपरा असलेला व स्वातंत्र्यसैनिकांची पंढरीच ठरलेला सातारा जिल्हा होय. अपशिंगे (ता. सातारा) येथील घरटी एक व्यक्‍ती सैन्य दलात आहे. त्यामुळे या गावाचे नावच आता मिलिटरी अपशिंगे असेच सर्वपरिचित आहे. स्वातंत्र्यपूर्वी १९४१ पासून भारत- चीन, पाक यासह विविध युद्धांमध्ये जिल्ह्यातील जवानांनी देशसेवा केली आहे. या १३ मोहिमांत तब्बल २५२ जवानांनी देशासाठी प्राणाचे बलिदान दिले आहे. त्यात सातारा तालुक्‍यातील सर्वाधिक ९५, खटावमधील ३४, कोरेगावमधील ३० जवानांचा सहभाग आहे. हुतात्मा कर्नल संतोष महाडिक यांच्या पत्नी स्वाती यांनी तर जिद्दीने लेप्टनंट होऊन देशापुढे आदर्श निर्माण केला. त्याशिवाय, हुतात्मा जवानांच्या पत्नी सामाजिक कार्यातही अग्रभागी असतात. 

या सैनिकी परंपरा असलेल्या जिल्ह्यात अनेक कुटुंबांतील अनेक व्यक्‍ती सैन्यदलात देशसेवेसाठी रुजू होत असतात. त्यापैकी जाधव कुटुंब. शंकर बाळा जाधव यांनी हवालदारपदापासून सैन्य दलात नोकरी सुरू केले. त्यांना दुसऱ्या महायुद्धात लढताना गोळी लागून ते जखमीही झाले होते.  त्यानंतर त्यांचे पुत्र साहेबराव शंकर जाधव यांनी शिपाई ते मेजरपदापर्यंतचा सैन्य दलात प्रवास केला. सैन्यात कार्यरत असतानाच त्यांचे अपघाती निधन झाले. त्यांचाही १९६५, १९७१ च्या भारत-पाक युद्धात सहभाग होता. तिसऱ्या पिढीतील त्यांचे पुत्र राजकुमार साहेबराव जाधव हे कर्नल असून, ते कारगील युद्धात सहभागी होते. द्वितीय पुत्र नंदकिशोर हे सध्या ब्रिगेडिअर असून, ते लवकरच मेजर जनरल बनणार आहेत. तृतीय पुत्र गुरुदत्त हे कर्नल असून, ते लवकरच ब्रिगेडिअर होतील. शिवाय, साहेबराव जाधव यांच्या पत्नी सुभ्रदा यांनी मिलिटरी गर्ल होस्टेलमध्ये वसतिगृह अधीक्षक म्हणून २६ वर्षे सेवा केली आहे. आता चौथी पिढी शिक्षण घेत असून, तीही सैन्य दलात जाण्यास उत्सुक आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com