सॅनिटरी पॅडस्‌वरील जीएसटी रद्द करा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 जानेवारी 2018

सातारा - स्त्रियांच्या जिव्हाळ्याच्या वस्तूंवर जीएसटी शून्य टक्के आहे. मात्र, आरोग्य, स्वच्छता आणि सोयीसाठी महत्त्वाचा असलेल्या सॅनिटरी पॅडस्‌वर १२ टक्के जीएसटी लावला आहे. तो तातडीने रद्द करावा,
अशी मागणी राष्ट्रवादी महिला आघाडीने निवेदनाद्वारे सेवाकर आयुक्त प्रांजली खडसे यांच्याकडे आज केली.

सातारा - स्त्रियांच्या जिव्हाळ्याच्या वस्तूंवर जीएसटी शून्य टक्के आहे. मात्र, आरोग्य, स्वच्छता आणि सोयीसाठी महत्त्वाचा असलेल्या सॅनिटरी पॅडस्‌वर १२ टक्के जीएसटी लावला आहे. तो तातडीने रद्द करावा,
अशी मागणी राष्ट्रवादी महिला आघाडीने निवेदनाद्वारे सेवाकर आयुक्त प्रांजली खडसे यांच्याकडे आज केली.

राष्ट्रवादी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा समिंद्रा जाधव, कार्याध्यक्षा जयश्री पाटील, सेवा दल प्रदेश संघटिका सीमा जाधव यांच्या नेतृत्वाखाली महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आज  खडसे यांची भेट घेतली व निवेदन दिले. निवेदनात महिला आघाडीने म्हटले की, जीवनावश्‍यक वस्तूंचा वापर व विक्री वाढावी आणि हानिकारक वस्तूंची विक्री कमी व्हावी, म्हणून जीएसटी एक प्रभावी साधन आहे.

स्त्रियांच्या जिव्हाळ्याच्या वस्तूंवर जीएसटी दर शून्य टक्के आहे. परंतु, स्त्रियांचे आरोग्य, स्वच्छता आणि सोय यासाठी अतिमहत्त्वाच्या असलेल्या सॅनिटरी पॅडस्‌वर जीएसटी परिषदेने १२ टक्के दर लावला आहे. स्त्रीचा सन्मान करण्याची आपल्या देशात संस्कृती आहे. पण, ती बोलण्यात असून उपयोगी नाही, याचा विचार होणे गरजेचे आहे. स्त्रियांच्या आरोग्याच्या दृष्टीने सॅनिटरी पॅडस्‌ महत्त्वाची गोष्ट असून याचा वापर वाढविणे गरजेचे आहे. त्यासाठी सॅनिटरी पॅडस्‌वरील जीएसटी शून्य टक्के करावा व स्त्रीच्या आकांक्षाचा उचित सन्मान सरकारने करावा, अन्यथा नाईलाजाने राष्ट्रवादी महिला आघाडीला लोकशाही मार्गाने आंदोलन करावे लागेल, असे म्हटले आहे. यावेळी उपमुख्य संघटिका सविता शिंदे, हेमलता पवार, कुसूमताई भोसले, वैशाली सुतार, सुनीता शिंदे, सुजाता घोरपडे, सुनीता संकपाळ, सुवर्णा पवार, नंदिनी जगताप, रशिदा शेख, नलिनी जाधव, कल्पना जवळ, श्‍वेताली मोहिते, पूजा काळे, उषा पाटील आदींसह महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

Web Title: satara news request for sanitary pad gst cancel