वाळूउपशाने जमीन खचण्याचा धोका

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 जून 2018

सातारा - जिहे (ता. सातारा) येथे पोकलेनच्या साहाय्याने बेसुमार वाळू उपसा होत असल्याने कृष्णा नदीपात्राची अक्षरश: चाळण होत आहे. २५ ते ३० फुटापेक्षा जास्त खड्ड्यांमुळे पात्र बदलून नदी काठची जमीन खचण्याची शक्‍यता आहे. आवाज उठविणाऱ्यांना दडपण्याची ठेकेदाराची भूमिका आणि प्रशासनाच्या धृतराष्ट्री भूमिकेमुळे नदीपात्र व लगतच्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे.

सातारा - जिहे (ता. सातारा) येथे पोकलेनच्या साहाय्याने बेसुमार वाळू उपसा होत असल्याने कृष्णा नदीपात्राची अक्षरश: चाळण होत आहे. २५ ते ३० फुटापेक्षा जास्त खड्ड्यांमुळे पात्र बदलून नदी काठची जमीन खचण्याची शक्‍यता आहे. आवाज उठविणाऱ्यांना दडपण्याची ठेकेदाराची भूमिका आणि प्रशासनाच्या धृतराष्ट्री भूमिकेमुळे नदीपात्र व लगतच्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे.

जिहे येथे कृष्णा नदीपात्रात गेल्या काही महिन्यांपासून वाळूचा बेकायदेशीर उपसा सुरू आहे. प्रशासनाने आखून दिलेल्या जागेपेक्षा अधिक ठिकाणी खुदाई सुरू आहे. वाळू उपशासंदर्भात प्रशासनाचे काही नियम आहेत. मात्र, या नियमांची खुलेआम पायमल्ली सुरू आहे. नदीपात्रातून वाळू काढण्यासाठी पोकलेन किंवा जेसीबी वापराला परवानगी नाही, तरीही जिहे येथे दोन- तीन पोकलेन आणि जेसीबीच्या साहाय्याने नदीपात्र खणण्याचे काम सुरू आहे. शासकीय नियमानुसार तीन मीटरपेक्षा जास्त खोलीवरील वाळू काढता येत नाही. मात्र, प्रत्यक्षात या ठिकाणी २५ ते ३० फूट खोल खड्डे काढून वाळूची बेसुमार लूट सुरू आहे. या प्रकारामुळे लगतच्या शेतकऱ्यांची मोठी अडचण निर्माण झाली आहे. जनावरांना पाणी पाजायला नेता येत नाही, की पूर्वापार असलेल्या रस्त्याने साधी बैलगाडीही नेता येत नाही. मोठ्या खड्ड्यांमुळे नदीपात्र बदलण्याचा धोकाही निर्माण झाला आहे. याबाबत आवाज उठविल्याच्या कारणावरून गावात काही दिवसापूर्वी भांडणेही झाली. त्यामध्ये सरपंचांच्या पतीला मारहाण झाली. या वेळी झालेल्या भांडणामध्ये खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा त्यांच्यावर दाखल झाला. त्याचा तपास पोलिस करत आहेत. त्यात वस्तुस्थितीसमोर येईलच. मात्र, या भांडणानंतर महसूल अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊनही वाळूच्या बेसुमार उपशाकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे गावामध्ये बोलायचे कोणी असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 

प्रशालनाच्या या धृतराष्ट्री भूमिकेमुळे वाळू उपसा करणाऱ्यांना बळ मिळत आहे. अधिकाऱ्यांची पाठ फिरल्यानंतर पुन्हा रात्रंदिवस वाळूचा उपसा जोरदारपणे सुरू झाला आहे. त्याकडे तलाठ्यापासून सर्वांचेच दुर्लक्ष आहे. त्यामुळे तहसीलदार, प्रांताधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांनी या ठिकाणच्या वाळू उपशाकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्‍यक आहे. अन्यथा नदीपात्राची होणारी चाळण अनेकांच्या जिवावर उठू शकते. जिहे येथील वाळू उपशाची परवानगी, प्रत्यक्षात झालेला उपसा याचा संपूर्ण तपास होणे आवश्‍यक आहे. त्यातून वाळू चोरीचा मोठा घोटाळा समोर येण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. 

पोलिस अधीक्षकांनी चौकशी करावी 
दरम्यान, पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनीही वाळूमाफियांना लगाम लावण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे जिहे येथील वाळू उपशाच्या व त्यातून निर्माण झालेल्या भीतीच्या वातावरणाची त्यांनी चौकशी करणे आवश्‍यक आहे. 

Web Title: satara news The risk of land depletion