कातकरी वस्ती रस्ता दंडेलशाहीमुळे रखडला

कातकरी वस्ती रस्ता दंडेलशाहीमुळे रखडला

सायगाव - महिगाव (ता. जावळी) येथील शंभर ते दीडशे लोकवस्ती असलेल्या आदिवासी कातकरी समाजाला आजही दंडलशाहीला सामोरे जावे लागत आहे. येथे गट नंबर ३९७ मध्ये कातकरी समाजाला शासनाने घरकुले बांधून दिली आहेत. मात्र, या वस्तीकडे जाणारा रस्ता निधी मंजूर होऊनही चिखलातच राहिला आहे. शेतकऱ्यांच्या आडमुठ्या धोरणामुळे हा रस्ता रखडला आहे. महसूल प्रशासनाने लक्ष देऊन या रस्त्याचे काम पूर्ण करावे, अशी मागणी या समाजाच्या वतीने होत आहे.

अनेक वर्षांपासून महिगावात हा समाज कायमस्वरूपी वास्तव्यास आहे. गट नंबर ३९७ मध्ये जवळपास २० ते २५ घरकुले बांधून या समाजाचे माळरानावर पुनर्वसन करण्यात आले आहे. मात्र, रस्त्याच्या गैरसोयीमुळे गावापासून दूर राहिलेल्या या समाजातील मंडळींना आजही दळणवळणाच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. ओढ्याच्या कडेने वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यावर पावसाळ्यात गुडघाभर चिखल 

होतो. त्यामुळे पावसाळा संपेपर्यंत चिखल तुडवतच येथील शाळकरी मुले, महिलांना जावे लागते. वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी दहा लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मात्र, रस्त्याकडेला असलेल्या शेतकऱ्यांचे आडमुठे धोरण, विरोधामुळे रस्त्याच्या कामाला खो बसला आहे. परिणामी या ठिकाणी रस्ता होऊ न शकल्याने या समाजाला चिखलातून आपला मार्ग काढावा लागत आहे. 

प्रांताधिकारी, तहसीलदारांनीही रस्त्याला परवानगी देऊनही शेतकरी महसूल प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन करीत आहेत. त्यामुळे हा रस्ता खऱ्या अर्थाने रखडला आहे, असा आरोप कातकरी समाजाने केला आहे. शेतकऱ्यांच्या दंडेलशाहीची तक्रार मेढा पोलिसात करूनही कोणतीही कारवाई होत नाही, असा देखील आरोप कातकरी समाजाकडून होत आहे.

कुडाळ-महिगाव रस्त्याच्या पश्‍चिमेकडे असलेल्या कातकरी समाजवस्तीकडे जाणाऱ्या रस्त्याबाबत प्रांत, तहसीलदारांकडे लगतच्या शेतकऱ्यांनी तक्रार केली होती. त्यावर रस्त्याच्या खडीकरण, डांबरीकरणात अडथळा आणू नये, असा मनाई हुकूम प्रांताधिकारी, तहसीलदारांनी दिला आहे. या आदेशामुळे स्वखर्चातून श्रमदानाद्वारे रस्त्याचे मुरुमीकरण करण्याचे समाजातील मंडळींनी ठरवले 

असता दमदाटी करण्यात आली. समाजाने श्रमदानातून रस्त्यावर मुरुमीकरण करताना पोलिस संरक्षण मिळावे, असा अर्ज करूनही पोलिसांकडून दुर्लक्ष करण्यात आले. तेव्हा येथे कुंपणच शेत खात असल्यामुळे जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनीच या रस्त्याकडे लक्ष देऊन संबंधित आडकाठी आणणाऱ्या शेतकऱ्यांवर योग्य ती कारवाई 

करून रस्ता पूर्ण करण्यासाठी सहकार्य करावे व या समाजाची होणारी गैरसोय दूर करावी, अशी मागणी होत आहे.

कातकरी समाजाला मी माझी जमीन घरकुलासाठी दिली आहे. मात्र, या वस्तीकडे जाणारा रस्ता तरी किमान आता महसूल प्रशासनाने आडकाठी आणणाऱ्या शेतकऱ्यांना योग्य ती समज देऊन पूर्ण करावा.
-बाळासाहेब सणस, शेतकरी, महिगाव.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com