शिक्षक बदल्यांवर ‘ग्रामविकास’ ठाम

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 27 मे 2017

अवघड शाळांची माहिती ‘सरल’वर भरण्याचे काम सुरू
सातारा - जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या ऑनलाइन पद्धतीने, तेही सुगम (साधारण) व दुर्गम (अवघड क्षेत्र) या धोरणानुसार करण्यावर ग्रामविकास विभाग ठाम आहे. प्राथमिक शिक्षकांच्या अनेक संघटनांनी उच्च न्यायालयाची दारे ठोठावून बदली प्रक्रियेला स्थगिती आणली आहे, तरीही ग्रामविकास विभागाने अवघड व आदिवासी भागातील शाळांचे मॅपिंग सरल पोर्टलवर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या कधी नव्हे इतक्‍या यावर्षी चर्चेचा विषय ठरल्या आहेत. ग्रामविकास विभागाने यावर्षी प्रथम ऑनलाइन पद्धतीने बदल्या करण्याचे धोरण राबविले. त्यातही अवघड व सर्वसाधारण क्षेत्रातील शाळा अशी विभागणी करून, त्यात दुर्गम शाळांतील अधिकार पात्र शिक्षकांना सुगम, तर सुगम शाळांमध्ये दहा वर्षांपेक्षा जास्त सेवा झालेल्यांना दुर्गम क्षेत्रात अथवा इतर शाळांमध्ये बदली करण्याचे आदेश निर्गमित केले आहे. 
 
त्यात शिक्षकांच्या विविध संघटनांनाही सूट देण्यात आली नाही. प्रथम काही संघटनांनी या अध्यादेशाला विरोध केला नसल्याची चर्चा आहे.

मात्र, पुन्हा सर्व संघटनांनी एकत्रितपणे विरोधही सुरू केला, तसेच अनेक संघटनांनी मुंबई, नागपूर, औरंगाबाद उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केला. या बदल्या जूनपर्यंत स्थगित ठेवण्याचे आदेशही उच्च न्यायालयाने दिले आहेत. शासनाने ३१ मेपर्यंत बदल्या करण्याचे आदेश दिले असल्याने या बदल्या होणार की नाही, याबाबत शिक्षकांत संभ्रमावस्था झाली आहे. असे असतानाही ग्रामविकास विभाग, प्राथमिक शिक्षण विभागाने बदल्या करण्याची प्रक्रिया कायम ठेवली आहे. नुकतीच प्राथमिक शिक्षण विभागाने सर्व शिक्षकांची सेवा ज्येष्ठता यादी प्रसिद्ध केली आहे. 

त्यात ग्रामविकास विभागाचे कक्ष अधिकारी संजय कुडवे यांनी सरल प्रणालीद्वारे अवघड आणि आदिवासी क्षेत्रातील शाळांचे मॅपिंग करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी, प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. ही कार्यवाही जिल्हाअंतर्गत बदलीसाठी आवश्‍यक असल्याने अवघ्या दोन दिवसांत पूर्ण करण्याचा उल्लेखही त्या पत्रात केला आहे. यामुळे ग्रामविकास विभाग बदली अध्यादेशाबाबत ठाम असल्याची चर्चा शिक्षकांत सुरू आहे.

Web Title: satara news rural development on teacher transfer