सरकार जनतेसाठी; बॅंडवाल्यांसाठी नाही - सदाभाऊ खोत

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 जून 2017

सातारा - भाजप व मित्रपक्षाचे सरकार सत्तेवर आल्यापासून शेतकऱ्यांचे भले झाले आहे. जनतेच्या भल्यासाठीच सरकार विविध योजना राबवत आहे. गेल्या 15 वर्षांत मुख्यमंत्र्यांची दारे जनतेसाठी खुली नव्हती. आता आमच्या मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर जात आहेत. आम्ही बॅंडवाल्यांकडे पाहून सरकार चालवत नाही, तर शेतकरी व सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी सरकार चालवत आहोत, असा टोला कृषी व पणन राज्यमंत्री तसेच साताऱ्याचे सहपालकमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज येथे विरोधकांना लगावला. 

सातारा - भाजप व मित्रपक्षाचे सरकार सत्तेवर आल्यापासून शेतकऱ्यांचे भले झाले आहे. जनतेच्या भल्यासाठीच सरकार विविध योजना राबवत आहे. गेल्या 15 वर्षांत मुख्यमंत्र्यांची दारे जनतेसाठी खुली नव्हती. आता आमच्या मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर जात आहेत. आम्ही बॅंडवाल्यांकडे पाहून सरकार चालवत नाही, तर शेतकरी व सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी सरकार चालवत आहोत, असा टोला कृषी व पणन राज्यमंत्री तसेच साताऱ्याचे सहपालकमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज येथे विरोधकांना लगावला. 

कर्जमाफीचा निर्णय झाल्यानंतर प्रथमच श्री. खोत जिल्ह्यात आले होते. त्यांनी पोवई नाक्‍यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर शासकीय विश्रामगृहात त्यांचे भाजप व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 

सदाभाऊ म्हणाले, ""राज्यातील जनता आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी आम्ही ही कर्जमुक्ती ठेवलेली आहे. हे सरकार शेतकऱ्यांचे असून त्यांच्यासाठीच काम करत आहे. कर्जमुक्तीमुळे दोन व चार पायाचे प्राणी सुखी झाले असून, आता या सर्वांनी या मुक्तीचा आनंद घ्यावा. तसेच कर्जमुक्तीचे श्रेय घेऊन ज्यांना आनंद घ्यायचा असेल, त्यांनीही घ्यावा. हे सरकार आनंद देणारे सरकार आहे.'' 

ते म्हणाले, ""नियमित कर्ज परतफेड करणारांबाबतही योग्य निर्णय हे सरकार घेणार आहे. कर्जमुक्तीतून 40 लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार आहे. मागील कर्जमुक्ती ही पाच एकरांपर्यंतची होती. याचा सर्वांत मोठा फटका विदर्भ, मराठवाड्यातील शेतकऱ्यांना बसला. पण, आमची कर्जमुक्ती ही एक ते 54 एकर शेती असलेल्यांना होणार आहे. 2016 पर्यंतचे थकबाकीदार शेतकरी आम्ही यामध्ये ग्राह्य धरले आहेत. पुनर्गठन केलेल्यांनाही लाभ दिला जाणार आहे. मध्यम व दीर्घ मुदतीच्या कर्जदार शेतकऱ्यांसाठी एकरकमी परतफेडीची योजना आम्ही आणली आहे. यामध्ये 25 टक्के रक्कम सरकार भरणार आहे.'' 

कृषी सहायकांच्या आंदोलनाबाबत ते म्हणाले, ""या आंदोलनाला मी भेट दिली आहे. त्यांच्या मागण्यांबाबत येत्या मंगळवारी (ता. 27) तीन वाजता मंत्रालयात बैठक होणार असून, त्यामध्ये निर्णय होईल.'' 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेत दुफळी झाली आहे का, या प्रश्‍नावर राज्यातील सर्व शेतकरी कर्जमाफीच्या माध्यमातून एकसंघ झालेले आहेत, असे सांगून त्यांनी बगल दिली. ते म्हणाले, ""गेल्या 15 वर्षांत मुख्यमंत्र्यांचे दार कधीही शेतकरी व सर्वसामान्यांसाठी उघडे नव्हते. पण, गेल्या अडीच वर्षांत थेट मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रश्‍नांची जाणीव करून घेत आहेत. तलाठ्यांच्याआधी मंत्र्यांना शेतकऱ्याचे किती नुकसान झाले हे समजते. कर्जमाफीचे नेमके श्रेय कोणाचे, या प्रश्‍नावर त्यांनी अगदी मिश्‍किलपणे उत्तर दिले. ते म्हणाले, ""लग्नाचा खर्च कसा वाचवायचा, हे आपण ठरवायचे असते. कोण मंडप घालत नाही, कोण दागिने घेत नाही, तर कोण बॅण्ड लावत नाही. म्हणून काय मंडपवाले व बॅंडवाल्यांच्या दारावर लग्नासाठी बॅण्ड व मंडप लावाच असा बोर्ड लावलेला नसतो. त्यामुळे अशा बॅंडवाल्यांकडे पाहून आम्ही सरकार चालवत नाही, शेतकरी व सर्वसामान्य जनतेच्या हिताकडे पाहून सरकार चालवितो.'' 

सदाभाऊंची नाराजी... 
मंत्री असूनही शासकीय विश्रामगृहात सदाभाऊ खोत यांची कोणतीही व्यवस्था करण्यात आली नव्हती. त्यांना आमदार बसतात, त्या प्रतापगड सूटमध्ये बैठक व पत्रकार परिषद घ्यावी लागली. याबद्दल त्यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली. 

Web Title: satara news sadhabhau khot