‘सेफ सिटी’कडे साताऱ्याची वाटचाल

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 नोव्हेंबर 2017

सातारा - शासनाच्या नवीन नियमावलीनुसार पोलिस अधीक्षक संदीप पाटील हे सातारा शहरातील सीसीटीव्ही प्रकल्पाचा अभ्यासपूर्ण प्रस्ताव तयार करत आहेत. महिला, युवतींची सुरक्षितता व अन्य गुन्हेगारीला नियंत्रणात आणण्यासाठी हे महत्त्वपूर्ण पाऊल ठरू शकते. 

सातारा - शासनाच्या नवीन नियमावलीनुसार पोलिस अधीक्षक संदीप पाटील हे सातारा शहरातील सीसीटीव्ही प्रकल्पाचा अभ्यासपूर्ण प्रस्ताव तयार करत आहेत. महिला, युवतींची सुरक्षितता व अन्य गुन्हेगारीला नियंत्रणात आणण्यासाठी हे महत्त्वपूर्ण पाऊल ठरू शकते. 

सकाळ यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्कतर्फे ‘आवाज परिवर्तनाचा’ हा कार्यक्रम साताऱ्यात घेण्यात आला होता. त्यामध्ये महिला व युवतींच्या सुरक्षिततेसाठी जिल्ह्यातील प्रमुख शहरांत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी युवतींनी केली होती. या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन पालकमंत्री विजय शिवतारे यांनी नियोजन समितीच्या निधीद्वारे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येतील, असे जाहीर केले होते. त्यानंतर झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत याबाबत सर्वानुमते ठरावही करण्यात आला. मात्र, नियोजन समितीतून या कारणासाठी निधी खर्च करण्याबाबत नियमावली, तसेच गृह विभागाचे निश्‍चित धोरण नव्हते.

सीसीटीव्हीबाबत गृह विभागाचे धोरण निश्‍चित होईपर्यंत या प्रकल्पाला नियोजन समितीतून निधी देऊ नये, अशी अट गृह विभागाने घातल्याने सीसीटीव्हीचा हा प्रकल्प मार्गी लागण्याआधीच अडचणीत आला होता. मात्र, पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी या नियमावलीबाबत पाठपुरावा सुरू ठेवला. तसेच शहरांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याबाबत त्यांनी गणेशोत्सव मंडळांनाही आवाहन केले होते. त्यानुसार शहरातील मंडळांनी स्वयंस्फूर्तीने काही ठिकाणी सीसीटीव्ही बसविले. त्यामुळे सीसीटीव्ही बसविण्याचा श्रीगणेशा झाला. त्याला आता सीसीटीव्हीसाठी बसविण्याच्या व देखभालीच्या नियमावलीची जोड मिळाली आहे. त्यामुळे पोलिस दलाला नियोजन समितीमधून सीसीटीव्ही बसविण्यासाठी व देखभालीसाठी पालिकेच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून घेता येणार आहे. पोलिस अधीक्षकांच्या अध्यक्षतेखालील समिती त्यासाठी स्थापन होत आहे. त्यामुळे जिल्हा पोलिस दलाने शहरामध्ये सीसीटीव्ही बसविण्याबाबतच्या हालचालींना वेग दिला आहे. पोलिसांनी सातारा शहरातील कुठे- कुठे सीसीटीव्ही बसवावा लागतील याबाबतचे सर्वेक्षण यापूर्वीच केलेले आहे. त्यामुळे पुढील कामाला वेग येणार आहे. सीसीटीव्हीच्या माध्यमातून सातारा लवकरच ‘सेफ सिटी’ झालेले दिसेल, अशी आशा करायला हरकत नाही.

सीसीटीव्ही बसविण्याबाबतची नियमावली मिळाली आहे. त्यानुसार पोलिस दलाने काम सुरू केले आहे. शहरामध्ये लवकरच सीसीटीव्हीचा प्रकल्प सुरू होण्याचे काम प्रत्यक्षात येईल. शहराची कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी त्याचा मोठा उपयोग होईल.
- संदीप पाटील, पोलिस अधीक्षक, सातारा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: satara news safe city