श्रमदानातून वेचला 50 पोती कचरा 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जानेवारी 2018

सातारा - लोकसहभागातून सुरू झालेल्या कास स्वच्छता मोहिमेत 100 नागरिकांनी श्रमदान करत सुमारे 50 पोती कचरा वेचला. कास ग्रामस्थांनी श्रमदानामध्ये खारीचा वाटा उचलत कास बंगल्यात नियोजित पोलिस चौकीची स्वच्छता केली. कास परिसरातील व्यावसायिकांना कचरा साठविण्यासाठी मोठ्या पिशव्यांचे मोफत वाटप करण्यात आले. 

सातारा - लोकसहभागातून सुरू झालेल्या कास स्वच्छता मोहिमेत 100 नागरिकांनी श्रमदान करत सुमारे 50 पोती कचरा वेचला. कास ग्रामस्थांनी श्रमदानामध्ये खारीचा वाटा उचलत कास बंगल्यात नियोजित पोलिस चौकीची स्वच्छता केली. कास परिसरातील व्यावसायिकांना कचरा साठविण्यासाठी मोठ्या पिशव्यांचे मोफत वाटप करण्यात आले. 

सातारकरांचा अभिमान असलेल्या, निसर्गसंपन्न कास तलावाचे सौंदर्य टिकविण्यासाठी दै. "सकाळ'च्या पुढाकाराने लोकसहभागातून कास स्वच्छता मोहीम आखण्यात आली आहे. गेल्या रविवारी (ता. 21 जानेवारी) मोहिमेला मोठ्या उत्साहात व अलोट प्रतिसादात सुरवात झाली. यावेळी नगराध्यक्षा माधवी कदम, पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांच्यात झालेल्या चर्चेत कास बंगल्यातील काही खोल्या नियोजित पोलिस चौकीसाठी भौतिक सुविधांसह उपलब्ध करून देण्याची तयारी सौ. कदम यांनी दर्शविली होती. याबाबतच्या वृत्ताने कास पंचक्रोशीत समाधान व उत्साहाचे वातावरण आहे. कासमध्ये अनेक उपद्रवी लोकांचा त्रास पर्यटक व स्थानिकांना होतो. मेढा तालुक्‍यात समावेश असलेल्या बामणोलीपर्यंतच्या गावांना पोलिस ठाण्यातील साध्या साध्या तक्रारींसाठी मेढ्यापर्यंत हेलपाटा मारावा लागतो. हा त्रास नियोजित चौकीमुळे टळणार आहे. पोलिस अधीक्षकांनी याबाबतच्या प्रस्तावास तत्त्वत: मान्यता दिल्याने उत्साहाच्या भरात आज कास ग्रामस्थांनी कास बंगल्याची स्वच्छता केली. त्याचबरोबर बंगल्याबाहेर "नियोजित पोलिस चौकी' असा फलकही लावला. 

आज सकाळी साडेसात वाजता श्रमदानास सुरवात झाली. हवेतील गारवा आणि सूर्याने नुकतेच दिलेले दर्शन अशा उत्साही वातावरणात कचरा गोळा करण्यासाठी आवश्‍यक साहित्य घेऊन कार्यकर्ते कासच्या जंगलात गेले. सुमारे अडीच तासांत या 100 कार्यकर्त्यांनी नेमून दिलेल्या भागातील कचऱ्याचा कपटा अन्‌ कपटा वेचून आणला. साडेदहा वाजण्याच्या सुमारास कास बंगल्याजवळ श्रमदानाची सांगता झाली. 

श्रमदानातील आजचे वाटेकरी... 
यशवंतराव चव्हाण शास्त्र महाविद्यालयातील प्रा. प्रतिमा पवार-भोईटे यांच्यासह प्राणिशास्त्र विभागाचे सुमारे 30 विद्यार्थी, मेहता सेल्युलर्स व ब्रदर्सचे भुपेन शहा यांच्यासह 30 सहकारी, सत्यसाई सेवा संस्थेच्या शीतल शिंदे व त्यांचे दहा सहकारी, सराफ कट्टा ग्रुपचे मामा नागोरी व कार्यकर्ते, वात्सल्य सामाजिक संस्था व हॅपी पीपल सेवाभावी संस्था, धर्मवीर युवा मंचचे शशिकांत पवार, डॉ. दीपक निकम यांच्यासह त्यांचे सहकारी, सामाजिक कार्यकर्ते उदय चव्हाण, विजयसिंह बर्गे, संकेत घाडगे, अशोक बिराजदार, महेश नलवडे आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते. 

इंगळे उद्योग समूहातर्फे अल्पोपाहार 
हुतात्मा शंकरराव इंगळे उद्योग समूहाचे विरेंद्र व धनंजय इंगळे आणि इंगळे ग्रुपच्या वतीने श्रमदानासाठी आलेल्या नागरिकांसाठी अल्पोपाहाराची व्यवस्था केली होती. कास येथे तयारीने येऊन त्यांनी श्रमदान करणाऱ्या नागरिकांसाठी गरमागरम नाष्ट्याची व्यवस्था केली. निशांत गवळी यांनी या अभियानात विद्यार्थ्यांसाठी अरविंद गवळी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगची बस मोफत उपलब्ध करून दिली होती. कन्हैयालाल राजपुरोहित यांनी कास परिसरातील व्यावसायिकांना जाड प्लॅस्टिकच्या पिशव्या भेट दिल्या. तलाव परिसरात येणाऱ्या पर्यटकांना स्वत:चा कचरा या पिशव्यांमधून सोबत आणण्यासाठी या पिशव्यांचा वापर होणार आहे.

Web Title: satara news sakal garbage social