अखेर "नो यू टर्न'चा फलक बदलला 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 जून 2018

सातारा - पोवई नाक्‍यावर सायली हॉटेलसमोर चुकीच्या पद्धतीने बसविलेला "नो यू टर्न'चा फलक वाहतूक शाखेने आज बदलला, तसेच तेथे वाहन वळविण्याचा प्रयत्न करणाऱ्या चालकांना रोखण्यासाठी वाहतूक पोलिसही तैनात करण्यात आले. या "यू टर्न'च्या ठिकाणी अपघातप्रवण  क्षेत्र निर्माण झाल्याचे वृत्त "सकाळ'ने प्रसिद्ध केले होते. 

सातारा - पोवई नाक्‍यावर सायली हॉटेलसमोर चुकीच्या पद्धतीने बसविलेला "नो यू टर्न'चा फलक वाहतूक शाखेने आज बदलला, तसेच तेथे वाहन वळविण्याचा प्रयत्न करणाऱ्या चालकांना रोखण्यासाठी वाहतूक पोलिसही तैनात करण्यात आले. या "यू टर्न'च्या ठिकाणी अपघातप्रवण  क्षेत्र निर्माण झाल्याचे वृत्त "सकाळ'ने प्रसिद्ध केले होते. 

ग्रेड सेपरेटरच्या कामामुळे पोवई नाक्‍यावरील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. त्यात राजवाड्याकडे येण्यासाठी मोनार्क हॉटेलसमोरचा रस्ता एकेरी वाहतुकीसाठी बंधनकारक करण्यात आला आहे, तसेच राजवाड्याकडून पोवई नाक्‍याकडे जाण्यासाठी मराठा खानावळमार्गे रस्ता सुरू ठेवण्यात आला आहे. आयडीबीआय बॅंकेसमोर वाहनचालकांनी गाडी वळवू नये, यासाठी मरिआई कॉम्प्लेक्‍स ते सायली हॉटेलपर्यंत बॅरेकेटिंग करण्यात आले आहे. वाहनचालकांनी रविवार पेठेकडे जाण्यासाठी, तसेच आयडीबीआय बॅंकेकडे जाण्यासाठी तेथून वळू नये, यासाठी ही उपाययोजना करण्यात आली होती. मात्र, वाहनचालक सायली हॉटेलसमोर यू टर्न घेत होते. त्यामुळे काल वाहतूक शाखेने नो यू टर्नचा फलक बसवला मात्र, तो चुकीचा होता. त्याकडे दुर्लक्ष करत वाहनचालकांचे वळण घेणे सुरूच होते. पावसाळ्यामुळे रस्ते ओले आहेत, तसेच राजवाड्याकडून येताना उतार असल्याने अचानक ब्रेक दाबल्यास याठिकाणी अपघात होण्याचा धोका निर्माण झाला होता. याबाबत "सकाळ'ने आज वृत्त प्रसिद्ध केले. त्याची दखल घेत वाहतूक विभागाने तातडीने या ठिकाणचा यू टर्नचा फलक बदलला, तसेच अपघात होऊ नये यासाठी वाहनचालकांना यू टर्न घेण्यास बंदी घालण्यात आली. याची अंमलबजावणी होण्यासाठी याठिकाणी वाहतूक पोलिस व होमगार्डची नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे आज याठिकाणची वाहतूक सुरळीत होत होती. 

वाहतूक शाखेसमोरून वळा 
पोवई नाक्‍याकडून राजवाड्याकडे जाणाऱ्या वाहनांना वळायचे असल्याचे त्यांनी वाहतूक शाखेच्या कार्यालयासमोर असलेल्या वळणाचा उपयोग करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. 

Web Title: satara news sakal news impact