मायणी, विखळे, चितळीत वाळूउपसा जोमात 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 13 जानेवारी 2018

मायणी - विखळे, मायणी व चितळी (ता. खटाव) हद्दीतील ओढा (चांद नदी) व येरळा नदीपात्रात बेसुमार वाळूउपसा सुरू असून पोलिस व महसूल प्रशासन त्याकडे कानाडोळा करीत आहे. नागरिकांच्या तक्रारींनंतर किरकोळ तोंडदेखली कारवाई करण्यात येत आहे. तोडपाणी व अर्थपूर्ण संबंधामुळे वाळू तस्करांना पोलिसांची कसलीच भीती राहिलेली नाही.

मायणी - विखळे, मायणी व चितळी (ता. खटाव) हद्दीतील ओढा (चांद नदी) व येरळा नदीपात्रात बेसुमार वाळूउपसा सुरू असून पोलिस व महसूल प्रशासन त्याकडे कानाडोळा करीत आहे. नागरिकांच्या तक्रारींनंतर किरकोळ तोंडदेखली कारवाई करण्यात येत आहे. तोडपाणी व अर्थपूर्ण संबंधामुळे वाळू तस्करांना पोलिसांची कसलीच भीती राहिलेली नाही.

राष्ट्रीय हरित लवादाने नदीपात्रातील वाळू उपशावर बंदी आणली. तेव्हापासून वाळूला सोन्याचा भाव आला आहे. हजार-बाराशे रुपये ब्रासने मिळणाऱ्या वाळूसाठी आता सहा ते सात हजार रुपये मोजावे लागत आहेत. वाळूबंदी ही सुवर्णसंधी समजून अनेकांनी वाळू व्यवसायामध्ये घट्ट पाय रोवले, जम बसविला. त्यातून लाखोंची माया जमवली. सर्वसामान्य कुटुंबातील अनेक तरुणांनी पिकअप, लेलॅंड, ट्रॅक्‍टर, जेसीबी, डंपर आदी वाहने खरेदी केली आहेत. बहुतांशी वाळूउपसा करणारे व्यावसायिक हे विटा आणि मायणी परिसरातील आहेत. सुमारे ३५ वाहने वाळूउपसा व वाहतूक करत आहेत. 

तक्रारी करूनही संबंधितांवर कारवाई होत नसल्याचा नागरिकांचा अनुभव आहे. ‘तेरी भी चूप अन्‌ मेरी भी चूप’ म्हणत जबाबदार अधिकारी त्यांना अभय देत आहेत. राजकारणी लोकांकडूनही त्यांची पाठराखण होताना दिसत आहे. रात्री सुरू झालेला वाळूउपसा पहाटेपर्यंत चालत असून मागणीनुसार ग्राहकांना घरपोच वाळूचा पुरवठा केला जात आहे. तर काहीजण सुरक्षित ठिकाणी वाळूचा साठा करून कऱ्हाड भागातील वाळू व्यावसायिकांना गाड्या भरून देत आहेत. रात्रीच्या वेळी वाळूउपसा करताना अधिकारी व संशयास्पद हालचालींवर 

लक्ष ठेवण्यासाठी वाळू व्यावसायिकांकडून शाळकरी मुलांचा वापर होत आहे. कमी वयात हाती शंभर ते पाचशेच्या नोटा खेळू लागल्याने मुलांना शिक्षणापेक्षा वाळूचीच गोडी अधिक लागत आहे. अनेक शाळकरी, महाविद्यालयीन तरुण वाळूच्या गाड्या भरण्यासाठी जात आहेत, हे चिंताजनक आहे. गतवर्षी तहसीलदार, प्रांताधिकारी व पोलिस अधिकाऱ्यांनी संयुक्त मोहीम राबवून भरारी पथके कार्यान्वित केली होती. स्थानिक नागरिकांच्या बैठका घेतल्या होत्या. वाळू तस्करांवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल केले होते. त्यामुळे वाळू तस्करांना चाप बसला होता. सध्या त्यांना कोणाचेही भय राहिले नाही. काही पोलिस अधिकारी वाळूउपसा होत असलेल्या ठिकाणी रात्री भेट देऊन गप्पा मारून येत असल्याचीही चर्चा आहे. खूपच तक्रारी झाल्या, मीडियात वृत्त झळकले तर तोंडदेखली कारवाई करण्यात येते. मोठ्या प्रमाणात वाळूउपसा वा वाहतूक करताना गाड्या पकडल्या तरी एखाद्या ब्रास वाळूचा दंड आकारला जातो. त्यामुळे वाळूवाल्यांचे फारसे नुकसान होताना दिसत नाही. नुकताच एका वाळू व्यावसायिकाचा वाढदिवस भरचौकात साजरा करण्यात आला. त्यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत तलवारीने केक कापण्यात आल्याची सर्वत्र चर्चा असून पोलिसांनी घेतलेली बघ्याची भूमिका सर्वसामान्यांना त्रस्त करणारी आहे. 

Web Title: satara news sand issue