सर्जा-राजाची सजावटही महागली

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 जुलै 2017

बेंदरासाठी लागणाऱ्या साहित्याच्या दरात पाच ते दहा टक्‍क्‍यांनी वाढ

सातारा - पेरण्या बऱ्यापैकी पूर्ण झाल्याने शेतकरी वर्गात उद्याच्या (ता. ८) बेंदूर सणासाठी काहिसे उत्साहाचे वातावरण दिसत आहे. वर्षभर शेतीत कष्टाला साथ देणाऱ्या सर्जा-राजाच्या कौतुकासाठी ग्रामीण भागात शेतकरी सज्ज झाले आहेत. साताऱ्यासह जिल्ह्यातील बाजारपेठेत बैलांना सजविण्यासाठी झुलींसह, विविध प्रकारच्या माळा घेण्यास गर्दी होती. यंदा या साहित्याच्या दरात पाच ते दहा टक्के वाढ झाली आहे.

बेंदूर सणादिवशी बैलांची वाजत-गाजत मिरवणूक काढली जाते. बैलांना सजवण्यासाठी बाजारपेठांतून विक्रेत्यांनी झुली, माळा, फुलांच्या माळा, चकचकीत प्लॅस्टिकच्या फुलांच्या माळा, घुंगरू पट्टे, किणकिणणाऱ्या घंटासह गोफ, बाशिंगे अशा विविध वस्तू विक्रीस आणल्या असून, खरेदीसाठी आज दिवसभर बाजारपेठांत गर्दी होती. या वर्षी बैल सजावटीच्या साहित्याच्या किमतीही वाढल्या आहेत. साध्या बेगडी फूल कागदासाठी २० ते २५ रुपये द्यावे लागत आहेत. शिंगांना लावण्याचे रंगांच्या किमतीतही सुमारे दहा टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. भिंगाची बाशिंगे त्याच्या कलाकुसरीप्रमाणे दोनशे रुपयांपासून पुढे विक्रीस आहेत. 

बेंदरादिवशी घरगुती पूजेसाठी लागणारे मातीचे बैल शहरी भागात प्राधान्याने ‘प्लॅस्टर ऑफ पॅरिस’पासून केले जातात. ते सुबकही असतात. मात्र, ग्रामीण भागातील कुंभारवाड्यात आजही नदी-तलावातील गाळाच्या मातीपासून बैल केले जातात. ते न रंगवताच शेतकऱ्यांना पूजेसाठी दिले जातात. ग्रामीण भागात आजही बलुते पद्धतीने मातीचे बैल कुंभार समाजातील कलाकारांकडून देण्यात आले आहेत. बेंदरादिवशी चावर वाहण्यास प्राधान्य दिले जाते. त्याचे गोंडे तयार केले जातात. दुर्गम भागातील नागरिक हे चावर विक्रीसाठी आणतात. काही शेतकरी स्वतः चावराच्या मुळ्यापासून चावर काढतात. पश्‍चिम भागात उत्साह जास्त दिसत असला, तरी पूर्वेकडील तालुक्‍यांतही ८० ते ९० टक्‍के पेरण्या झाल्याने शेतकरी वर्गात उत्साहाचे वातावरण आहे.

बैलांच्या मिरवणुकांचे आकर्षण कायम
बेंदरानिमित्त सजवलेल्या बैलांची मिरवणूक काढण्याची प्रथा आहे. ग्रामीण भागात ती आजही सुरू असलेली दिसते. अनेक शेतकरी हौसेने या मिरवणुका वाजत-गाजत काढतात. गुलालाची उधळण व फटाक्‍यांच्या आतषबाजीत होणाऱ्या मिरवणुकांसाठी हजारो रुपये खर्च केले जातात. अनेक शेतकरी बेंदरादिवशीच बैलांची पूजा करून मिरवणूक काढतात, तर काही जण सवडीप्रमाणे दोन-तीन दिवसानंतर मिरवणूक काढतात. ग्रामीण भागात भावकीनुसारही या मिरवणुका निघतात. 

Web Title: satara news Sarja-Raja decorations too expensive