गड्या, आपले सरपंचपदच बरे!

गुरुवार, 14 सप्टेंबर 2017

निवडणूक होणारी महत्त्वाची गावे
भुईंज, किकली, अपशिंगे, काशीळ, क्षेत्र माहुली, चिमणगाव, करंजखोप, पिंपोडे बुद्रुक, केळघर, कुसुंबी, आटके, कुसुर, रेठरे खुर्द, कासारशिरंबे, शामगाव, वडगाव हवेली, येळगाव, मारुल तर्फ पाटण, हेळवाक, मारुल हवेली, ढेबेवाडी, शिरवळ, बरड, गिरवी, ललगुण, मायणी, म्हासुर्णे, बिदाल, मलवडी, पांढरवाडी, वरकुटे मलवडी, महिमानगड.

सातारा -  आगामी ग्रामपंचायती निवडणुकीत सरपंचपदाची निवड थेट मतदानाने होणार असल्याने या निवडणुकीचे महत्त्व वाढले आहे. त्यातच नव्या नियमांमुळे सरपंचांवर अविश्‍वास ठराव आणणे सोपे राहिलेले नाही. स्थानिक पातळीवर मजबूत झालेली खुर्ची आणि मिळणाऱ्या भरमसाट निधींमुळे अनेक नवी राजकीय समीकरणे व नेतृत्व उदयाला येणार आहे. 

जिल्ह्यातील ३१९ ग्रामपंचायतींसाठी पुढील महिन्यात (ऑक्‍टोबर) निवडणूक होत आहे. त्यासाठी गावागावांतील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. सरकारच्या नवीन अध्यादेशानुसार सरपंचांवर मोठी जबाबदारी टाकण्यात आली आहे. सर्व ग्रामसभा व ग्रामविकास समित्यांचा अध्यक्ष हा सरपंच असेल. चौदाव्या वित्त आयोगाचा विकास निधी, तसेच विविध योजनांसाठी मिळणारा निधी आता थेट ग्रामपंचायतींनाच मिळणार आहे. त्यामुळे आपल्या गावाचा विकास करण्याची मोठी संधी सरपंचाला मिळेल. जिल्हा परिषद सदस्य किंवा पंचायत समिती सदस्यांना मिळणाऱ्या निधीपेक्षाही जास्त निधी खर्चाची जबाबदारी सरपंचावर असेल. त्यामुळे गट व गणातील खर्चिक निवडणूक लढवण्यापेक्षा सरपंचपदाच्या खुर्चीकडे अनेक स्थानिकांचा डोळा आहे. त्यातून येणाऱ्या स्थानिक निवडणुकीत मोठी चुरस दिसेल. सर्वच राजकीय पक्ष सरपंचपदासाठी ‘योग्य’ व ‘वजनदार’ उमेदवाराच्या शोधात आहेत. 

अनेक तरतुदींमुळे स्थान मजबूत
गावातील अंतर्गत राजकारणामुळे अनेकदा सरपंचाला पद सोडावे लागत होते; परंतु आता सरपंचावर निवडणुकीनंतर पहिली दोन वर्षे अविश्‍वास ठराव आणता येणार नाही. अविश्‍वास ठराव बारगळल्यास पुन्हा दोन वर्षे असा ठराव आणता येणार नाही. त्याचबरोबर पाच वर्षांची मुदत संपण्याच्या सहा महिने अगोदर सरपंचावर अविश्‍वास ठराव आणता येणार नाही. ग्रामपंचायत सदस्यांच्या तीन चतुर्थांश बहुमताने अविश्‍वास ठराव झाल्यावर विशेष ग्रामसभेत तो मंजूर करावा लागेल. या अनेक तरतुदींमुळे स्थानिक पातळीवर सरपंचाचे स्थान मजबूत राहणार आहे. त्यातूनच इच्छुकही वाढले आहेत.

पक्षांकडून ‘योग्य’ उमेदवाराचा शोध
जिल्ह्याचा विचार केल्यास ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसमध्येच खरी लढत होईल, असे सध्याचे राजकीय चित्र आहे. काही तालुक्‍यांत दोन्ही काँग्रेसला शह देण्याची रणनीती भाजपकडून आखलेली दिसते.  त्यादृष्टीने महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून पडद्याआडून हालचाली सुरू दिसतात. शिवसेनेकडूनही काही गावांमध्ये चांगली फाईट मिळण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. तरीही संघटनेतील विस्कळितपणामुळे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनाही स्थानिक पातळीवर भरघोस यशाबद्दल साशंकताच आहे. ग्रामपंचायत जिंकण्यापेक्षा सरपंच आपला कसा असेल, यावरच सर्व पक्षांनी लक्ष केंद्रित केलेले दिसते. त्यातही भाजप आघाडीवर आहे. त्यादृष्टीने उमेदवारांचा ‘शोध’ सुरू आहे. गावपातळीवरचे राजकारण हे ‘गावकी-भावकी’वर अवलंबून असते. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीच्या या रणधुमाळीत नवी आघाडी, नवा चेहरा, नवे नेतृत्व उदयाला येण्याची शक्‍यताही नाकारता येत नाही.

सरपंचाची कॉलर टाइट!
 सरपंच सादर करणार ग्रामपंचायतीचे अंदाजपत्रक
 चौदावा वित्त आयोग व विविध योजनांसाठी थेट निधी मिळणार
 गट व गणांच्या निवडणुकीपेक्षा कमी खर्चिक निवडणूक
 जिल्हा परिषद सदस्यापेक्षा जास्त निधी मिळणार
 अविश्‍वास ठरावाची धाकधुकी कमीच 
 गावचा विकास करण्याची मोठी संधी

Web Title: satara news sarpanch