गावकारभारी आज कळणार; प्रथमच जनतेतून ठरणार सरपंच 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 ऑक्टोबर 2017

सातारा - जिल्ह्यातील 256 ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उठलेली रणधुमाळी आज मतपेटीत बंद झाली. जिल्ह्यात सरासरी 85 टक्‍के मतदान झाले. उद्या सकाळी दहा वाजता मतमोजणीस प्रारंभ होणार असून, प्रथम सदस्य, नंतर सरपंचपदाचा निकाल बाहेर पडणार आहे. त्यामुळे गावकारभारी कळण्यास आता अवघे काही तास शिल्लक राहिले असून, जनतेतून थेट निवडून जाणारा कारभारी कोण, याची उत्सुकता ताणली आहे. 

सातारा - जिल्ह्यातील 256 ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उठलेली रणधुमाळी आज मतपेटीत बंद झाली. जिल्ह्यात सरासरी 85 टक्‍के मतदान झाले. उद्या सकाळी दहा वाजता मतमोजणीस प्रारंभ होणार असून, प्रथम सदस्य, नंतर सरपंचपदाचा निकाल बाहेर पडणार आहे. त्यामुळे गावकारभारी कळण्यास आता अवघे काही तास शिल्लक राहिले असून, जनतेतून थेट निवडून जाणारा कारभारी कोण, याची उत्सुकता ताणली आहे. 

नोव्हेंबरमध्ये मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील 319 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया सध्या सुरू आहे. त्यातील 256 ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले. ग्रामपंचायत निवडणुकीत प्रथमच सरपंच थेट जनतेतून निवडला जाणार असल्याने बहुतांश नेत्यांच्या गावांतील निवडणुका चुरशीच्या बनल्या आहेत. त्यामुळे या नेत्यांचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे. दहा ग्रामपंचायतींमध्ये सदस्य बिनविरोध झाले असतानाही केवळ सरपंच पदासाठी मोठी ईर्ष्या असल्याने तेथे निवडणूक लागली आहे. काही गावांत नेत्यांचे नातेवाईकच या पदासाठी रिंगणात उतरल्याने त्यांच्या नेतृत्वाचा कस लागणार आहे. 

शिरवळ, असवली (ता. खंडाळा), आंधळी (ता. माण), मायणी (ता. खटाव), काशीळ, वडूथ, बोरखळ, अपशिंगे, बेंडवाडी (ता. सातारा), बरड, गिरवी, विडणी (ता. फलटण), पिंपोडे बुद्रुक, वाघोली (ता. कोरेगाव), मारुल हवेली, सणबूर, ढेबेवाडी (ता. पाटण), सुपने, येळगाव, दुशेरे, तळबीड, चरेगाव, कुसूर, दुशेरे (ता. कऱ्हाड) आदी ग्रामपंचायतींमध्ये चुरस लागली असल्याने या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

राजकीय प्रतिष्ठा पणाला लागल्याने सकाळी सात वाजल्यापासून मतदारांना मतदानासाठी बाहेर काढताना कार्यकर्त्यांची धावपळ सुरू होती. नोकरी, शेतात जाणारे सकाळी नऊ वाजेपर्यंत मतदानासाठी आल्याने सकाळच्या सत्रात मतदानाची आकडेवारी चांगली होती. सकाळी साडेसात ते 9.30 पर्यंत 70 हजार 10 (17.53 टक्‍के), सकाळी 11.30 वाजेपर्यंत एक लाख 61 हजार 634 (40.48 टक्‍के), दुपारी दीड वाजेपर्यंत दोन लाख 43 हजार 879 (61.08 टक्‍के), दुपारी 3.30 वाजेपर्यंत 2,96,552 (74.27 टक्‍के), रात्री 7.30 वाजेपर्यंत.... (.... टक्‍के) मतदान झाले. एकूण मतदार तीन लाख 99 हजार 267 होते. 

दरम्यान, काही ठिकाणी मतदान यंत्रात किरकोळ बिघाड झाल्याने मतदान प्रक्रियेत अडथळेही आले. मात्र, कर्मचाऱ्यांनी दक्ष राहून तत्काळ दुरुस्त केल्याने पुन्हा मतदान प्रक्रिया सुरू झाल्या. 

तालुकानिहाय निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायती (कंसात बिनविरोध) : सातारा 28 (9), जावळी 10 (5), कोरेगाव 38 (10), वाई 7, खंडाळा 2, महाबळेश्‍वर 1 (5), कऱ्हाड 40 (4), पाटण 70 (16), माण 24 (6), खटाव 13 (2), फलटण 23 (1). 

तालुकानिहाय मतदान (टक्‍क्‍यांत) 
सातारा 85.10, जावळी 80.04, कोरेगाव 84.16, वाई 85.00, खंडाळा 80.94, महाबळेश्‍वर 84.70, कऱ्हाड 87.14, माण, खटाव 78.93, फलटण 84.74 . 

तालुकानिहाय मतमोजणी केंद्रे अशी : 
भूविकास बॅंक सभागृह, सातारा, तहसील कार्यालय, जावळी, सरस्वती विद्यामंदिर, कोरेगाव, किसन वीर सभागृह, वाई, किसन वीर सभागृह, खंडाळा, तहसील कार्यालय, महाबळेश्‍वर, यशवंतराव चव्हाण बहुद्देशीय केंद्र, कऱ्हाड, शासकीय धान्य गोदाम, शिरळ, ता. पाटण, डी. एस. पाटील सभागृह, माण, नवीन प्रशासकीय इमारत, वडूज- खटाव, नवीन धान्य गोदाम, फलटण. 

दृष्टिक्षेपात निवडणूक 

जिल्ह्यातील एकूण ग्रामपंचायती - 1494 
निवडणूक लागलेल्या ग्रामपंचायती - 319 
बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायती - 58 
प्रत्यक्ष मतदान झालेल्या ग्रामपंचायती- 256 
मतदान न होणाऱ्या ग्रामपंचायती - 62 
बिनविरोध सरपंच - 68

Web Title: satara news sarpanch