आमदनी अठन्नी... खर्चा रुपैया!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 मार्च 2018

सातारा - सुमारे अडीच कोटी रुपये खर्चून बांधलेल्या भवानी पेठेतील युनियन भाजी मंडईकडे नगरपालिकेचे दुर्लक्ष झाले आहे. पालिकेने मंडई बांधण्यासाठी केलेली गुंतवणूक व मिळणारे उत्पन्न याचा मेळ बसेना झाला आहे. वर्षाला सुमारे सात लाख रुपये व्याज भरणाऱ्या या इमारतीमधून दोन- अडीच लाख रुपये उत्पन्न पालिका तिजोरीत पडत आहे. 

सातारा - सुमारे अडीच कोटी रुपये खर्चून बांधलेल्या भवानी पेठेतील युनियन भाजी मंडईकडे नगरपालिकेचे दुर्लक्ष झाले आहे. पालिकेने मंडई बांधण्यासाठी केलेली गुंतवणूक व मिळणारे उत्पन्न याचा मेळ बसेना झाला आहे. वर्षाला सुमारे सात लाख रुपये व्याज भरणाऱ्या या इमारतीमधून दोन- अडीच लाख रुपये उत्पन्न पालिका तिजोरीत पडत आहे. 

नगरपालिका ही फायदा कमविणारी व्यापारी संस्था नव्हे तर सेवा पुरविणारी संस्था आहे, हे खरे असले तरी किमान गुंतवणूक, देखभाल खर्च व उत्पन्न याचा ताळमेळ बसवावा लागेल. अन्यथा तोट्याचा हा कारभार फार दिवस चालणार नाही. त्यातून संस्थाच धोक्‍यात येण्याचा संभव अधिक असतो. पालिकेने भवानी पेठेत अडीच कोटी रुपये खर्चून युनियन भाजी मंडई बांधली. जून २०१४ मध्ये तिचे लोकापर्ण झाले. अंडरग्राऊंड साडेबारा हजार चौरस फुटांचे प्रशस्त पार्किंग, अप्पर बेसमेंटमध्ये १२५ विक्रेते बसू शकतील असे कट्टे. त्याच्यावर, पहिल्या मजल्यावर ४२ विक्रेत्यांसाठी फ्रूट स्टॉल, कट्ट्यांमध्ये माल ठेवण्यासाठी जागा, दुसऱ्या मजल्यावर साडेचार हजार चौरस फुटांचा प्रशस्त हॉल, स्वच्छतागृह, पालिका ऑफिससाठी खोल्या अशी इमारतीची रचना आहे.

१५ लाखांचे व्याज भरले
या मंडईतून विक्रेता शुल्कातून पालिकेला पावणेतीन लाख रुपये उत्पन्न मिळते. महिन्याला मंडईचे वीज बिल १८ ते २० हजार रुपये येते. वर्षाला सव्वादोन ते अडीच लाख रुपये वीज बिलापोटीच खर्च होतात. पालिकेचे तीन कर्मचारी या ठिकाणी काम करतात. त्यांच्या पगारावर होणारा खर्च पाहता पालिकेला या इमारतीची  देखभाल करण्यासाठी आणखी कर्ज काढावे लागेल, अशी परिस्थिती आहे. गेल्या अडीच वर्षांत पालिकेने या इमारतीसाठी काढलेल्या ३० लाख रुपयांच्या कर्जापोटी २१ लाख रुपयांची परतफेड केल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यातील सहा लाख रुपये मुद्दलापोटी जमा करण्यात आले. तब्बल १५ लाख रुपयांचे व्याज पालिकेला भरावे लागले, हे अधिक धक्कादायक आहे.

पार्किंगमधून मिळू शकते जादा उत्पन्न
या इमारतीला तब्बल साडेबारा हजार चौरस फुटांचे प्रशस्त पार्किंग आहे. हाकेच्या अंतरावर राजवाडा आहे. पार्किंगसाठी एवढी मोठी व सुरक्षित जागा अन्य कोणतीही नाही. मंडईतील ग्राहकांबरोबरच राजवाडा परिसरातील वाहनांसाठी ही जागा ‘पे अँड पार्क’ म्हणून उपलब्ध करून दिल्यास पालिकेला यातून दीड लाख रुपये उत्पन्न मिळू शकते. तसा ठरावही पालिकेने यापूर्वी केला आहे. मात्र, त्याच्यावरील धूळ झटकण्याची गरज आहे.

दोन हॉलमधून भाडे मिळणे शक्‍य
पहिल्या मजल्यावरील नियोजित फ्रूट मार्केटसाठी कट्टे उभे केले आहेत. फळ विक्रेत्यांचा या ठिकाणी बसण्यास तीव्र विरोध आहे. त्यांना ही जागा नको असेल तर कट्टे हटवून पालिकेने हा हॉल अन्य खासगी संस्थेला मॉल, बझार, प्रदर्शन वा अन्य कारणासाठी भाड्याने द्यावा. असे दोन हॉल याठिकाणी उपलब्ध आहेत. एका हॉलमधून महिन्याला २० ते ३० हजार रुपये या दराने वर्षाला सात लाख रुपये भाडे पालिकेच्या तिजोरीत सहज जमा होऊ शकते. 

Web Title: satara news Satara Municipal