सावित्रींच्या लेकींचे पाऊल पडते पुढे!

सावित्रींच्या लेकींचे पाऊल पडते पुढे!

सातारा - सावित्रीबाई फुले यांचे माहेर असलेल्या नायगाव (ता. खंडाळा) येथील मुलींना शिक्षणातून उभे राहण्याचे बळ नायगावातून मिळत आहे. अनेक लेकींनी शिक्षणाच्या जोरावर गुणवत्तापूर्ण भरारी घेतली आहे. विविध क्षेत्रांत कर्तृत्वाचा आलेख उंचावत ठेवला आहे. सावित्रीबाईंचा वारसा मुली अंगीकारत असून, स्पर्धा परीक्षांतही अनेकींनी यश संपादले आहे. लोकसेवा आयोगाच्या परीक्षांतही झेंडा फडकवण्याची स्वप्ने मुली पाहू लागल्या आहेत.

गावाने क्रांतिज्योतींचा संदेश प्रत्यक्षात उतरविण्यास सुरवात केली. येथील मुली शाळेत जाऊ लागल्या आणि काही वर्षात त्यांनी विविध क्षेत्रांत नायगावचा झेंडा रोवला. गावात शैक्षणिक वातावरण चांगले आहे. सध्या अनेक मुली शिक्षणासाठी बाहेरगावी आहेत. अगदी कोटापासून (राजस्थान) पुणे, मुंबई, कोल्हापूरसारख्या शहरात शिक्षण घेत आहेत. गावातील मुलींबरोबरच सुनाही डी. एड. करीत आहेत. अगदी स्पर्धात्मक परीक्षांतही उज्ज्वल यश येथील मुलींनी मिळवले आहे. गावात सावित्रीबाई फुले अध्यापिका विद्यालय १९९७ मध्ये सुरू झाले. तेव्हापासून मुलींचा सावित्रीबाईंप्रमाणे शिक्षण क्षेत्राकडे कल वाढला. आजपर्यंत गावातील १५ मुली शिक्षिका झाल्या आहेत. यंदाही गावातील दोन विद्यार्थिनी शिकत आहेत. मनीषा मिरजकर ही प्रशासकीय अधिकारी झाली असून, त्रुतुजा गवळी मंत्रालयात, तर रूपाली पोळ नायब तहसीलदार झाली. पंचशीला चव्हाण तुरुंग अधीक्षक झाली आहे. प्राचार्या मंगल नेवसे सावित्रीबाईंच्या विचारांची ज्योत मुलींमध्ये रुजविण्याचे काम करतात. अध्यापिका विद्यालयातील मुलींना शिक्षणातील येणाऱ्या अडचणी सोडवून त्यांना बळ देण्याचे काम प्रा. शर्मिला जायकर (नेवसे) करतात. त्यांनी कृतीने सावित्रीबाईंचा वारसा चालवला आहे. शिक्षिका असलेल्या शालन नेवसे (शिंदे) यांनी शिवाजीनगर (ता. खंडाळा) येथे उपक्रमशील शिक्षिका म्हणून ओळख निर्माण केली आहे. 

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात पाचवी ते बारावीपर्यंत ४४८ विद्यार्थी असून, २११ मुली आहेत. गुणवत्तेत व विविध स्पर्धांत मुलींची आघाडी आहे. विविध स्पर्धांतूनही त्यांनी बक्षिसे मिळविली आहेत. सहावीतील किरण नेवसेने कराटे स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले आहे. प्रज्ञाशोध परीक्षेत श्रुतिका संतोष नेवसे भूगोल विषयात प्रथम आली. 

अनेक मुली शिक्षण घेऊन सासरीही स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या आहेत. आश्‍विनी नेवसे (ससाणे) एम.एस्सी. ॲग्री. होऊन फलटणच्या मालोजीराजे कृषी महाविद्यालयात प्राध्यापक आहेत. नम्रता नेवसे ( पिंगळे) एम.डी. आयुर्वेदिक झाल्या आहेत. शुभांगी नेवसे (माळी) संगणकाच्या प्राध्यापिका असून, गौरी पळशीकर स्पर्धात्मक परीक्षेतून बॅंकेत कृषी अधिकारी आहेत. लतिका कोरडे (नेवसे) तलाठी असून, शीला अडसूळ (नेवसे) पोलिस आहेत. कविता महादेव कांबळे कृषी सहायक आहेत. शिल्पा ननावरे अभियंता होऊन नोकरीत आहेत. नीशा बुनगे औषध निर्माणशास्त्र पदवी करत असून, प्रतीक्षा कोरडे अभियंत्रिकी शाखेत शिकत असून, प्राजक्ता यादव बी.एस्सी. करत आहे. 

पारंपरिक शिक्षणापेक्षा वेगळ्या वाटेनेही मुली जात आहेत. कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात प्रियांका कृष्णाजी  झगडे फूड टेक्‍नॉलॉजीमध्ये एम. टेक करीत असून, त्याठिकाणीच अस्मिता अनिल नेवसे बी. टेक फूड टेक्‍नॉलॉजी करीत आहे. श्‍यामली नेवसे मुंबईत अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असून, मृणाल नेवसे बी.एस्सी. ॲग्री. करीत आहे. तेजश्री नेवसे पुण्यात बी.एस्सी. करत असताना, संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षांकरता अभ्यास करीत आहे. 

सख्ख्या बहिणी उच्चशिक्षित
सावित्रीबाईंच्या घरातील सख्ख्या बहिणी उच्चशिक्षित आहेत. विद्या कानडे प्रशासकीय अधिकारी झाल्या आहेत. त्यांची बहिण सारिका कानडे अभियंता आणि शुभांगी कानडे डॉक्‍टर आहे. गावातील इतर मुलींना त्यांच्यापासून प्रेरणा मिळत आहे. त्यांची आजी (कै.) यमुनाबाई नेवसे शिक्षिका म्हणून सावित्रीबाईंचा वारसा चालवत होत्या. विद्या कानडे (पाथरे) पुण्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून एम. टेक झाल्या आहेत. राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवून सहायक अभियंता वर्ग एक म्हणून निवड झाली. सध्या अकोला येथे उपकार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत आहेत. डॉ. शुभांगी नेवसे (गार्डे) बालरोगतज्ज्ञ म्हणून इंदापूरमध्ये काम करतात. सारिका कानडे (उत्तुरे) संगणक अभियंता म्हणून काम करतात.

मुलींच्या शिक्षणाकडे मुलांइतकेच आजचे पालक लक्ष देत आहेत. कोणत्याही हालअपेष्टांत मुलींना शिकवण्याचे बाळकडूच या मातीत आहे. तनिष्का व्यासपीठामुळे महिलांच्या सक्षमीकरणाला मोठे बळ मिळत आहे.
- शुभांगी नेवसे,  तनिष्का गटप्रमुख, नायगाव 
 
मुलींच्या शिक्षणासाठी खर्च करण्यास पालक मागेपुढे पाहत नाहीत. माझी मुलगी कोटा (राजस्थान) येथे अकरावीला असून, हा पालकांच्या मानसिकतेत मोठा बदल झाला आहे.
- स्वाती नेवसे, शिक्षिका

गावात मुलगा व मुलगी असा फरक केला जात नाही. मुलींना कोणत्याही क्षेत्रात करिअर करण्यासाठी संधी दिली जाते. शिक्षणाला गावात महत्त्व दिल्यामुळे विचारात बदल झाला आहे. गावातील मुली सावित्रीबाईंप्रमाणे शिक्षिका होत आहेत. आमच्या गावात येणाऱ्या सुनांनाही डी.एड.साठी आम्ही प्रोत्साहन देतो.
- मीनाक्षी नेवसे, माजी सरपंच 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com